साउथ बेंड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी इंडियाना राज्यातील एक प्रमुख औद्योगिक शहर आणि सेंट जोसेफ परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,०७,०८१ महानगरीय–३,१६,६६३ (२०१०). साउथ बेंड हे सेंट जोसेफ नदीकाठावर वसले असून ते शिकागोच्या आग्नेयीस १५१ किमी.वर आहे.

फ्रेंच समन्वेषक सिउर दे ला साल व रेने रॉबर्ट कॅव्हेलिअर यांनी १६७९ मध्ये या प्रदेशाला प्रथम भेट दिली होती. दोन वर्षांनंतर ला साल परत येथे आला आणि त्याने मिआमी व इलिनॉयी इंडियनांच्या राजसंघाबरोबर येथील कौन्सिल ओक वृक्षाखाली तह केला. सदर ओक वृक्ष अद्याप अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. अमेरिकन फर कंपनीचा प्रतिनिधी पिअरी फ्रि स्टयूझ नव्हरे याने या ठिकाणी व्यापारी ठाणे स्थापन केले (१८२०). पुढे तीन वर्षांनंतर ॲलेक्सीस काँक्विलर्ड व त्याचा व्यवसायातील भागीदार फ्रान्सिस काँपॅरेट यांनी हे ठाणे आपल्या ताब्यात घेतले. काँक्विलर्डने या ठिकाणास बिग सेंट जोसेफ स्टेशन असे नाव दिले व या ठिकाणी यूरोपियनांच्या वसाहतीसाठी उत्तेजन दिले. १८२९ मध्ये ही वसाहत साउथ होल्ड नावाने ओळखली जाऊ लागली. या ठिकाणी सेंट जोसेफ नदीला एक मोठे वळण असून त्या वळणाच्या दक्षिण काठावर हे शहर वसले असल्याने त्याचे साउथ बेंड असे नामकरण करण्यात आले (१८३०). १८३५ मध्ये याला नगराचा, तर १८६५ मध्ये शहराचा दर्जा देण्यात आला.

स्ट्यूडबेकर ब्रदर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (१८५२), ऑलिव्हर चिल्ड प्ले वर्क्स (१८५५) व सिंगर सोईंग मशीन कंपनी (१८६८) हे येथील प्रमुख उद्योग आहेत. १९५० ते १९७० च्या दशकात साउथ बेंडची अर्थव्यवस्था प्रामुख्याने उद्योगप्रधान राहिली आहे. दक्षिण मिशिगन आणि उत्तर इंडियाना प्रदेशांतील हे प्रमुख व्यापारी व वित्तीय केंद्र असल्यामुळे हा महानगरीय प्रदेश मिशियाना नावाने ओळखला जातो. विमाने व मोटारी आणि त्यांचे सुटे भाग, लष्करी वाहने, मूलधातू उत्पादने, कृषी अवजारे, विद्युत् उपकरणे, स्वयंचलित यंत्रे, मालडबे, इलेक्ट्रॉनिकी साहित्य, इथेनॉल, रबर, प्लॅस्टिक उत्पादन इत्यादींच्या निर्मितीचे उद्योग येथे चालतात. येथे रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई वाहतूक यांच्या सुविधा आहेत.

नोत्रदाम विद्यापीठ (१८४२), सेंट मेरीज कॉलेज (१८४४), इंडियाना विद्यापीठ (१९३३), होली क्रॉ स (ज्युनिअर) कॉलेज (१९६६) या येथील मुख्य शैक्षणिक संस्था आहेत. नॉर्दर्न इंडियाना हिस्टॉरिकल म्युझियम व डिस्कव्हरी हॉल म्युझियम या वस्तुसंग्रहालयांत स्ट्यूडबेकर ऐतिहासिक वाहनसंग्रह आहे. साउथ बेंड कला केंद्र, नोत्रदाम कलावीथी, सिंफनी वाद्यवृंद तसेच कला व रंगमंदिर संस्था येथे आहेत.

चौधरी, वसंत