डंडी –२ : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या नाताळ प्रांतातील कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले शहर. लोकांख्या १६,६०० (१९६७). हे लेडिस्मिथ–जोहॅनिसबर्ग या लोहमार्गावर, पीटरमॅरित्सबर्गच्या उत्तरेस सु. १६० किमी., सु. १,२४७ मी. उंचीवर आहे. हे कोळसा व लोखंडाच्या खाणींचे केंद्र व शेतमालाची बाजारपेठही आहे. याची स्थापना सु. १८८० मध्ये झाली. स्कॉटलंडमधील डंडी शहरातील मूळ शेतमालकांच्यावरून याचे नाव पडले. येथे काच, विटा, कौले, साबण, खडीसाखर, दुधदुभत्याचे पदार्थ बनविणे इ. उद्योग आहेत. येथे एक विमानतळही आहे. याच्या शेजारच्या तालाना टेकडीजवळ १८७९ मध्ये झूलू युद्धे आणि १८९९ व १९०२ मध्ये बोअर युद्धे झाली.

कांबळे, य. रा.