प्रेस्टन : इंग्लंडमधील लँकाशर परगण्याचे प्रशासकीय केंद्र व बंदर. लोकसंख्या १,१३,२०० (१९७६ अंदाज). हे मॅंचेस्टरच्या वायव्येस ४४·८ किमी. रिबल नदीकाठी वसले आहे. हे दळणवळण केंद्र असून याच्या पूर्वेस सु. ५ किमी. वरील सॅम्झबरी येथे विमानतळ आहे. प्रेस्टनच्या दक्षिणेकडील ३ किमी.वरील वॉल्टन-ले-डेल येथील रोमन किल्ल्याच्या अवशेषांजवळ प्रेस्टन शहराच्या वाढीस प्रारंभ झाला. ११७९ मध्ये यास दुसऱ्या हेन्ऱीकडून पहिली सनद मिळाली. इंग्लिश यादवी युद्धकाळात ऑलिव्हर क्रॉमवेलच्या संसदीय सैन्याने राजाच्या सैन्याचा येथे पराभव केला (१६४८). १७१५ व १७४५ मध्ये झालेल्या जॅकोबाइटांच्या बंडांची झळ प्रेस्टनला पोहोचली होती. १७७७ मध्ये येथे पहिली कापडगिरणी निघून उत्तरोत्तर शहराचा विकास होत गेला. १८३५ च्या सुमारास येथे ४० कापडगिरण्या होत्या. ग्लासगो-लंडन हा प्रमुख लोहमार्ग, बर्मिंगहॅम-कार्लाइल हा द्रुतमार्ग आणि जलवाहतुकीसाठी बंदर यांच्या सान्निध्यामुळे प्रेस्टनमध्ये नवनवीन उद्योगांची स्थापना शक्य झाली. अभियांत्रिकी, सुती कापड, विमाने, विणमाल, कातडी वस्तू, रसायने, विद्युत उपकरणे हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. इंग्लंडमधील सर्वांत मोठा रेयॉनचा कारखाना येथे आहे. गेली चार शतके दर वीस वर्षांनी येथे ‘गिल्ड मर्चंट फेस्टिव्हल’ हा व्यापाऱ्यांचा उत्सव साजरा केला जातो. अशा प्रकारचा उत्सव १९७२ मध्ये येथे संपन्न झाला होता.

सूतकताई यंत्रनिर्माता ⇨सर रिचर्ड आर्कराइट (१७३२- ८२) व कवी ⇨फ्रान्सिस टॉम्पसन (१८५९ – १९०७) यांचे प्रेस्टन हे जन्मस्थान होय. येथील गॉथिक शैलीतील नगरभवन, नॉर्मनांचे क्राइस्ट चर्च, सेंट जॉन चर्च, हॅरिस वस्तुसंग्रहालय व कलावीथी इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.