दौलताबाद : प्राचीन देवगिरी. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला व गाव. औरंगाबाद शहराच्या ईशान्येस सु. १४ किंमी. वर वेरूळच्या रस्त्यावर एका शंक्काकार डोंगरावर सु. ४·५० किमी. परीध असलेल्या तटबंदीच्या आत किल्ला व गाव आहे. त्याची उंची पायथ्याच्या पठारापासून सु. २२१ मी. आहे. याचा प्राचीन इतिहास निश्चित नाही. तथापि हेमाद्रीच्या मते पाचवा भिल्लम यादव याने ११८७ मध्ये या डोंगरावर किल्ला बांधून तेथे यादवांची राजधानी केली. अलाउद्दीन खल्जीने १२९४ मध्ये हा किल्ला घेतला आणि खंडणी मान्य झाल्यावर रामचंद्र यादव यास परत दिला. पुढे यादवांनी खंडणी बंद करताच मलिक काफूरने १३०७, १३१० व अखेरीस १३१८ अशा तीन स्वाऱ्यांत घेतला आणि अखेरच्या हरपालदेव यादवास फाशी दिले. मुहंमद तुघलकाने १३३८ साली त्याचे नाव यादवांच्या तेथील विपुल संपत्तीमुळे दौलताबाद ठेवले. दिल्लीहून राजधानी दौलताबादेस आणण्याचा यत्न झाला. १३४७ मध्ये तो किल्ला बहमनी सत्तेखाली गेला आणि १५०० नंतर अहमद निजामशाहने तो आपल्या अंमलाखाली आणला. त्यांची ती राजधानीच होती. पुढे शाहजहानने चार महिन्यांच्या वेढ्यानंतर १६३३ मध्ये घेतला आणि अखेर १७२४ मध्ये किल्ला निजामाच्या सत्तेखाली आला.

वास्तुशास्त्र दृष्ट्या येथील किल्ला वैशिष्ट्यपूर्ण असून त्याला सात (काहींच्या मते आठ) दरवाजे होते पण त्यांपैकी मक्का व रोझा या नावाचे दोनच आता उपयोगात आहेत. किल्ल्याच्या सभोवती खंदक खणलेले असून त्यांवरील साकव अशा रीतीने बांधले होते, की शत्रू आला असता खंदकातील पाण्याची पातळी कमीजास्त होई व हे साकव पाण्याखाली जात. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे. दरवाज्याच्या पायऱ्या खडकात खोदल्या असून किल्ल्यात अनेक गुप्त मार्ग, दरवाजे व संरक्षणासाठी बांधलेल्या शेकडो खोल्या आहेत. अगदी वरच्या खोल्यांत जाण्यासाठी पूर्वी चामड्याची शिडी वापरत असे इब्न बतूताने लिहिले आहे. त्याने १३४० मध्ये किल्ल्यास भेट दिली होती. बाहेरील तटाच्या आत काही अंतरावर आणखी दोन तट असून डोंगराच्या कडा इतक्या तासून गुळागुळीत केल्या आहेत, की त्यांवरून वर चढणे अशक्य होते. सर्वांत उंचीवर असणाऱ्या भागास कटक किंवा महाकोट म्हणतात, तर खालच्या भागास बालाकोट म्हणतात. किल्ल्यात अनेक इमारती आहेत. त्यांपैकी शंक्वाकार बुरुज, चांद मिनार, नगारखाना, चिनी महाल या प्रसिद्ध असून अनेक मशिदी व मंदिरेही आहेत. आज प्रवाशांचे ते एक पर्यटन केंद्र बनले आहे.

संदर्भः 1. Haig, Wolseley, Historical Landmarks of the Deccan, Allahabad, 1907.

           2.Kamalapur. J. N. The Deccan Forts, Bombay, 1961.

           3.Toy, Sidney. The Fortified Cities of India, London, 1965.

देशपांडे, सु. र.