वेंगी : आंध्र प्रदेश राज्याच्या कृष्णा जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले नगर. सध्याच्या एलुरु शहराच्या उत्तरेस सु. १३ किमी. वरील वेगी किंवा पेड्डा-वेगी म्हणजेच प्राचीन वेंगी मानतात. हे नगर गोदावरी व कृष्णा या नद्यांदरम्यानच्या प्रदेशात एलुरू सरोवराच्या वायव्येस वसलेले आहे.

बौद्ध आचार्य नागार्जुन यांचे शिष्ट आर्यदेव व दिङ्‌नागाचार्य यांचे प्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ वेंगीला होते. त्यामुळे येथे बरेच बौद्ध अवशेष सापडले आहेत. इ. स. चौथ्या शतकात येथे वैंगेयक नामक घराणे राज्य करीत होते. या घराण्यातील राज्यकर्त्यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. या प्रदेशावर पल्लव राजे काही काळ राज्य करीत होते. पाचव्या – सातव्या शतकांत या प्रदेशावर विष्णुकुंडी घराण्याचे राज्य होते. या घराण्यातील राजा तिसरा विक्रमेंद्रवर्मन याचा, चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने पराभव केला (इ.स. सातवे शतक) व आपला भाऊ कुब्ज विष्णुवर्धन याला तेथे राज्यपाल म्हणून नेमले. कुब्ज विष्णुवर्धनने चालुक्य घराण्याची एक स्वतंत्र शाखा स्थापन करून तिचे हे राजधानीचे ठिकाण केले. हे घराणे पूर्व चालुक्य या नावाने प्रसिद्ध आहे. ‘वेंगी – देश’ अथवा वेंगिनाडू अशी नावे तेव्हापासून रूढ झाली. याचा विस्तार कृष्णा व गोदावरी या जिल्ह्यांमध्ये होता. पश्चिमेस पूर्व घाट, उत्तरेस गोदावरी नदी व दक्षिणेस कृष्णा नदी यांनी हे राज्य सीमित झाले होते. येथे चालुक्यांच्या राजधानीचे भग्नावशेष आढळतात. वेंगीच्या चालुक्यांपैकी तिसरा विजयादित्य याने आपली राजधानी वेंगीहून विजयवाड्यास हलविली (नववे शतक). अकराव्या शतकात वेंगी चोल घराण्याच्या ताब्यात होते, असा उल्लेख मिळतो. चिनी प्रवासी ह्यूएन्‌त्संग याच्या प्रवासवर्णनातही या राज्याचे उल्लेख आले आहे. अमरावती येथील शिलालेखात वेंगीच्या राजांची काही नावे आढळतात.

चौंडे, मा. ल.