हाकोडाटे :जपानमधील होक्काइडो बेटावरील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या २,७८,८५१ (२०११ अंदाजे). हे होक्काइडो बेटाच्या दक्षिणेस, होन्शू बेटावरील आवोमोरी बंदराच्या उत्तरेस सु. १०० किमी.वर, त्सुगारू सामुद्रधुनीवर वसलेले आहे. हाकोडाटे होक्काइडोतील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून ते ऐतिहासिक, औद्योगिक, व्यापारी व वाहतुकीचे केंद्र आहे. हे बंदर वर्षातील १५०–२०० दिवस धुकेविरहित असल्याने यास विशेष महत्त्व आहे. होक्काइडो बेटावरील लोहमार्गाचे हे अंतिमस्थानक असून होन्शू बेटावरील आवोमोरी बंदराशी त्सुगारू सामुद्रधुनीतून काढलेल्या सीकान बोगद्याने (१९८८) जोडलेले आहे.

 

अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे ऐनूंच्या आधिपत्याखाली होते. होक्काइडो बेटाची राजधानी येथे होती. दुसऱ्या महायुद्धानंतर याचे महत्त्व कमी झाले तथापि होक्काइडो व होन्शू बेटांच्या दरम्यानच्या दळणवळणातील मोक्याचे स्थान म्हणून यास महत्त्व होते. १७८९ मध्ये येथे खोल समुद्रातील मासेमारीचा तळ करण्यात आला, त्यामुळे शहराची भरभराट झाली. हे बंदर अमेरिकन जहाजांसाठी १८५४ मध्ये व परदेशी व्यापारासाठी १८५७ मध्ये खुले करण्यात आले होते. १ ऑगस्ट १९२२ रोजी यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. मार्च १९३४ मध्ये लागलेल्या आगीत शहराची हानी झाली, तद्नंतर शहराची पुनर्बांधणी करण्यात आली.

 

येथे पर्यटन, दुग्धशाळा उद्योग, जहाजबांधणी, मासेमारी व सॅमन मत्स्यप्रक्रिया इ. उद्योग विकसित झाले आहेत. येथून रासायनिक खते, मासेमारी साहित्य, लाकूड, यंत्रसामग्री इत्यादींची निर्यात होते. येथे होक्काइडो विद्यापीठाचा मत्स्यविभाग कार्यरत आहे. नजीकच्या हाकोडाटे शिखरावरून (उंची ३३५ मी.) रात्री शहराचे दृश्य विलोभनीय दिसते. येथे ट्रॅपिस्ट ननरी (जोगिणींचा मठ, १८९८) आहे. येथील ओनूमा नॅशनल पार्क, हाकोडाटे ऑर्थोडॉक्स चर्च, युनोेकवा गरम पाण्याचे झरे, उद्यानम्हणून प्रसिद्ध असलेला एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील पाश्चिमात्य पद्धतीचा गोर्योकाकू किल्ला इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.