ताकामात्सू : जपानच्या शिकोकू बेटावरील कागावा प्रांताच्या राजधानीचे मुख्य ठिकाण व अंतर्गत समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या २,७४,३६७ (१९७०). हे ओसाकाच्या पश्चिम नैर्ऋत्येस सु. १३६ किमी. आहे. पूर्वी हे टोकुगावा कुटुंबाचे १६४२ ते १८६८ पर्यंतचे किल्लेवजा शहर होते. येथील हवामान सौम्य व आल्हाददायक आहे. जलमार्गाने व्यापार करण्यात हीरोशीमानंतर याचाच क्रमांक लागतो. शिकोकूचा ८०% अंतर्गत व्यापार याच बंदरातून चालतो.सानूकीची व्यापारी पार्श्वभूमी यास लाभलेली असून हे शिकोकू बेटावरील दाट लोकवस्तीच्या भागात वसलेले आहे. १९१० मध्ये ताकामात्सू ते उनो असा लोहमार्ग सुरू झाल्यामुळे हे होन्शू बेटाशी जोडले गेले. हे शिकोकू बेटावरील प्रशासकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र व पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. बंदराजवळ सोळाव्या शतकातील किल्ल्याचे भग्नविशेष असलेले ‘तामामो’ उद्यान आणि ७५ हे. क्षेत्र असलेली ‘रित्सुरी’ बाग प्रसिद्ध असून त्यात नैसर्गिक पाइन जंगल, प्राणिसंग्रहालय, कलावीथी व वस्तुसंग्रहालय आहे. येथे सर्व प्रकारचे लघु उद्योग असून त्यांत यंत्रोत्पादन, हत्यारे, लगदा, कागद, अन्नप्रक्रिया आणि फर्निचर यांचा समावेश आहे.

क्षीरसागर,सुधा भागवत, अ. वि.