पल्टाव्हा : यूरोपीय रशियाच्या युक्रेन प्रजासत्ताकातील याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या २,७०,००० (१९७६). हे स्टेप प्रदेशात कीव्हच्या पूर्व आग्नेयीस २९० किमी., तर खारकॉव्हच्या पश्चिम नैर्ऋत्येस १३१ किमी. वर व्हॉर् स्क  या नीपरच्या उपनदीकाठी वसले आहे. रस्ते व लोहमार्ग यांनी पल्टाव्हा महत्त्वाच्या शहरांशी जोडले आहे. पल्टाव्हाविषयीचा विश्वासनीय उल्लेख ११७४ मधील असून तो ‘ओल्टाव्हा’ वा ‘ल्टाव्हा’ या नावांनी मिळतो. तथापि पुरातत्त्वीय अवशेषांवरून याचा काळ आठव्या-नवव्या शतकांपर्यंत नेता येतो. तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात तार्तरांनी शहराचा विध्वंस केला. रशियाचा पीटर द ग्रेट व स्वीडनचा बारावा चार्ल‌्स यांच्यातील लढाई पल्टाव्हा शहराजवळच झाली ( १७०९). तीमध्ये पीटर द ग्रेटने तीन महिने शहराला वेढा घालून बसलेल्या चार्ल‌्सच्या सैन्याचा प्रचंड पराभव केला. दुसऱ्‍या महायुद्धात हे जर्मनीच्या ताब्यात होते (१९४१–४३).

पल्टाव्हाचा आसमंत सुपीक असून, शेती उत्पादनाशिवाय दुभत्या जनावरांची पैदासही मोठ्या प्रमाणावर केली जाते. साखऱ, गहू हा शेतमाल, डुकराचे मांस इ. पदार्थांचे हे मोठे केंद्र आहे. येथील उद्योगधंदे विकसित असून, त्यांत प्रामुख्याने मांस डबाबंदी, साखर व कापड उद्योग, लाकडी वस्तू, मातीची भांडी व कातडी वस्तुनिर्मिती, यंत्रे आणि त्यांचे सुटे भाग, मोटारी, ट्रॅक्टर, पादत्राणे, तंबाखू पदार्थ, अन्नप्रक्रिया, बेकरी पदार्थ, सूर्यफुलाचे तेल इत्यादींचा समावेश होतो. कृषिसंस्था, शिक्षक प्रशिक्षण, अभियांत्रिकी, चारा संशोधन संस्था इ. शैक्षणिक संस्था येथे असून, निकोलाय गोगोल या सुप्रसिद्ध रशियन लेखकाने आपले शिक्षण याच शहरात घेतले. येथील प्रादेशिक ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, अठराव्या शतकातील ‘चर्च ऑफ द रिझरेक्शन’ व ‘कॅथीड्रल ऑफ द ॲसम्प्शन’, ‘गोगोल हाउस’, १७०९ च्या लढाईतील विजयाचा १७ मी. उंचीचा स्मृतिस्तंभ, गुरुत्वाकर्षण वेधशाळा, ग्रंथालये इ. उल्लेखनीय आहेत. 

चौधरी, वसंत