ओडर : मध्य यूरोपातील एक प्रमुख नदी. लांबी सु. ९०० किमी. ही चेकोस्लोव्हाकियाच्या ओडर पर्वतात उगम पावून सामान्यतः ईशान्येकडे वाहत जाते. आग्‍नेय सुडेटन व पश्चिम कार्पेथियन पर्वतांमधील मोरॅव्हियन गेट या सखल खिंडीतून ती पोलंडमध्ये जाते. रात्सीबूश, कॉझल, ऑपॉल, ब्झेक, व्ह्‌रोट्स्लाफ (ब्रेस्लौ), कॉश्चिन वगैरे गावांवरून जाऊन ती फ्रँकफुर्ट येथे उत्तरवाहिनी होते. मग दलदलीच्या भागातून खाडी–भागात गेल्यावर तिचे दोन फाटे होतात. पश्चिम फाटा म्हणजे बर्लिन–श्टेटीन कालवा होय. श्टेटीनहून दाम सरोवरातून जाऊन पॉलीत्सेच्या आग्‍नेयीस दोन्ही फाटे पुन्हा एक होतात. नंतर ही नदी कालवा म्हणूनच श्टेटीन खारकच्छात जाते. तेथून पेनी, स्वीनी, डीफनो या नद्यांतून ओडर बाल्टिक समुद्राला मिळते. श्टेटीनपर्यंत ओडरमधून मोठ्या बोटी जातात व पुढे लहान बोटींनी नद्या–कालव्यांतून वाहतूक होते. बर्लिन–श्टेटीन कालव्याने हाफेन नदीशी, ओडर–स्प्री कालव्याने स्प्री नदीशी व वार्ता, नॉटेक व बर्डा नद्या आणि बिड्‍गॉश कालवा यांनी ओडर विश्चुला नदीशी जोडलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रेस्लौपर्यंत कालवा झाला आहे. ब्रेस्लौ व कॉझल यांमध्ये पाण्याच्या पातळीत फरक असल्यामुळे पाणशिड्यांची योजना केलेली आहे. अप्पर सायलीशियातील काटोबाइस भोवतीच्या औद्योगिक भागाशीही डॅन्यूबओडर कालव्याने वाहतूक होते. ओडरच्या प्रमुख उपनद्या ओल्झा, क्लॉड्‍नीत्सा, बारिश, वार्ता, इना, नाइसी, ओलाव्हा, बॉब्राव्हा इ. आहेत. ओडरच्या खोऱ्यात औद्योगिक व शेती उत्पादन भरपूर होते व त्याची वाहतूक नद्यांतून व कालव्यांतून होते. ओपाव्हा या एका उपनदीच्या संगमापर्यंतचा भाग पहिल्या महायुद्धानंतर १९१९ च्या व्हर्साय तहाने आंतरराष्ट्रीय ठरविण्यात आला होता. नाइसीपासून ओडरचा खालचा प्रवाह हा १९४५ च्या पॉट्सडॅम कराराने पोलंड व जर्मनी यांमधील सीमा ठरविण्यात आला आहे.

कुमठेकर, ज. ब.