कॉर्फ्यू : केर्किरा. ग्रीसच्या आयोनियन बेटसमूहातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्तरेकडील बेट व शेजारच्या छोट्या बेटांसह ग्रीसचा प्रांत. क्षेत्रफळ ६४१ चौ. किमी. लोकसंख्या ९२,७४२ (१९७१). हे बेट ६४ किमी. लांब व ११ ते ३२ किमी. रुंद आहे. ग्रीस व अल्बेनिया किनाऱ्याला लागून असलेल्या सु. ४८ किमी. लांबीच्या व ३ ते २५ किमी. रुंदीच्या कॉर्फ्यू सामुद्रधुनीने ते मुख्य भूमीपासून वेगळे केलेले आहे. बेटाचा बराचसा भाग डोंगराळ असून उत्तरेकडील पँटोक्रेटर ८८९ मी. उंच आहे. भूमध्यसामुद्रिक हवामान व १२५–१५० सेंमी. पाऊस ह्यांमुळे येथे ऑलिव्ह, लिंबू, मोसंबी, द्राक्षे, सफरचंद इ. फळे व धान्य होते. दारू गाळणे, गुरे व कोंबड्या पाळणे आणि मच्छीमारी हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. कॉर्फ्यू शहर (लोकसंख्या २८,६३० – १९७१) ही बेटाची राजधानी व प्रमुख बंदर असून बेटावरील प्राचीन अवशेषांमुळे महत्त्वाचे पर्यटनकेंद्र बनले आहे. होमरच्या काव्यात कॉर्फ्यूचा उल्लेख मिळतो. इ. स. पू. आठव्या शतकात कॉरिंथने येथे वसाहत स्थापली, परंतु पुढे कॉरिंथ व कॉर्फ्यू यांमध्ये अनेक वर्षे संघर्ष चालला. कॉर्फ्यूने अथेन्सबरोबर केलेल्या तहामुळे इ. स. पू. पाचव्या शतकात पेलोपोनेशियन युद्धास सुरुवात झाली. रोम, बायझंटिन व नंतर अनेक सरदारांच्या सत्तातरांनंतर शेवटी ब्रिटिशांकडून १८६४ मध्ये कॉर्फ्यू ग्रीसकडे आले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत कॉर्फ्यूस बरेच महत्त्व होते.

देशपांडे, सु. र.