तुलसा : अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील प्रसिद्ध खनिज तेल केंद्र व अमेरिकेच्या ज्युनियर चेंबर ऑफ कॉमर्सचे मुख्य ठिकाण. हे ओक्लाहोमा सिटीच्या ईशान्येस १९० किमी. आर्‌कॅन्सॉ नदीवर वसले आहे. लोकसंख्या ३,३१,६३८ (१९७०). जगाची ‘तेल राजधानी’ म्हणून हे प्रसिद्ध आहे. याच्या जवळील रेड फोर्क (१९०१), ग्लेन पूल (१९०५) येथे खनिज तेल सापडल्यामुळे याची फार भरभराट झाली. सध्या शहरात ८५० पेक्षा जास्त तेल कंपन्या, २५ तेलनळ कंपन्या व १४० तेल विहिरी आणि ठेकेदारांची कार्यालये असून येथे आंतरराष्ट्रीय खनिज तेल प्रदर्शन भरविले जाते. येथे तेलशुद्धीकरणाचे तीन प्रचंड कारखाने असून तेल संशोधन व तेलखणिकर्म यंत्रे तयार करणारे कारखाने तसेच विमाने, लोह–पोलाद, काच, रंग, खनिज तेल रसायने, प्लॅस्टिक, खाद्यपदार्थ प्रक्रिया इ. अनेक उद्योग आहेत. येथील खनिज तेल विषयावरचे खास ग्रंथालय विख्यात असून खनिज तेल तंत्रज्ञानाचा अभ्यास व संशोधन यांची सोय आहे. शहरात पाच विमानतळ, तुलसा विद्यापीठ, फिल्ब्रुक कला केंद्र, मोहॉक उद्यान आणि ‘थॉमस गिल्‌क्रिज इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकन हिस्टरी’ हे संग्रहालय रेड इंडियन लोकांच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे.

लिमये, दि. ह.