वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण व अरबी समुद्रकिनाऱ्यावरील एक बंदर. हे सावंतवाडीच्या पश्चिमेस ३३ किमी. वर आहे. लोकसंख्या १२,४७१ (२००१). इ. स. १६३८ मध्ये डचांनी फिंगेर्ला नावाने याची स्थापना केली. डचांची मुख्य व्यापारी वसाहत येथे होती. त्या ठिकाणी सध्या न्यायालय व शासकीय कार्यालये आहेत. १६६० च्या सुमारास याचा मिंगेर्ला (मिंग्रेला) असाही उल्लेख आढळतो. याच वर्षी शिवाजी महाराजांनी येथे आपले सैन्य ठेवले होते. त्याकाळात येथून बंगाल, सुरत यांशिवाय बटेव्हिया, जपान, श्रीलंका, हॉर्मझ (इराण), बसरा (इराक) व तांबडया समुद्रालगतचे प्रदेश यांच्याशी व्यापार चालत असे. अतिशय उत्तम प्रतीच्या वेलदोडयाच्या उत्पादनासाठी वेंगुर्ल्याचा परिसर त्याकाळी प्रसिध्द होता. १६७५ मध्ये मोगलांनी या शहराची जाळपोळ केली. १६९६ मध्ये ते सावंतवाडीच्या सावंतांकडे आले. पूर्वी वेंगुर्ल्यास चाचे लोकांचे वास्तव्य असे. १८१२ साली सावंतवाडीच्या संस्थानिकांनी वेंगुर्ला हे इंग्रजांस दिल्यामुळे चाचे लोकांचा बंदोबस्त झाला. १८६९ मध्ये येथील दीपगृह बांधण्यात आले. १८७६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. ब्रिटिशांच्या कारकीर्दीत हे एक भरभराटीस आलेले नगर होते.

    वेंगुर्ल्याच्या परिसरात फणस, काजू, नारळ व आंब्याच्या बागा आहेत. येथे नारळ, आंबा, काजू, कोकमचे तेल, मीठ, काथ्या इत्यादींचा व्यापार चालतो. शहरात आंबा व काजू संशोधन केंद्र असून काजू प्रक्रियेचे चार कारखाने आहेत. नारळाच्या झाडापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा व्यवसायही येथे चालतो. येथील समुद्रात मासेमारी चालते. वेंगुर्ला हे रस्त्यांनी सावंतवाडीशी व पुढे कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणांशी जोडलेले आहे. येथील कँडी दवाखाना व सेंट ल्यूक्स रुग्णालय उल्लेखनीय आहे.                                    

चौधरी, वसंत