खारकॉव्ह : कारकॉफ. रशियाचे ईशान्य युक्रेनमधील एक मोठे सांस्कृतिक, औद्योगिक व लोहमार्ग केंद्र. लोकसंख्या १३,०७,००० (१९७३). नैर्ऋत्येकडे डोनेट्सचे कोळसाक्षेत्र आणि आग्नेयीकडे क्रिव्हाइ रोगचे लोहक्षेत्र यांच्या दरम्यान खारकॉव्ह, लोपान व उडी या डोनेट्सच्या उपनद्यांच्या संगमावर मॉस्कोपासून ६४० किमी.वर वसलेले खारकॉव्ह मॉस्को—क्रिमिया लोहमार्गांचे प्रस्थानक आहे. येथे ट्रॅक्टर, कृषियंत्रे, विमाने, विद्युज्जनित्रे, खनिकर्मयंत्रे, रेल्वे एंजिने, टर्बाइन्स, सायकली, पादत्राणे, कापड, तंबाखू, रंग, साबण, मद्य, पीठ इ. उद्योग चालतात. येथील गॉर्की विद्यापीठ १८०४ मध्ये स्थापन झाले आहे. खाणकाम, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, वैद्यक, कला, नाट्य, संगीत इत्यादींची विद्यालये, नाट्यगृहे, संग्रहालये येथे आहेत. खारकॉव्ह हमरस्त्यांचेही केंद्र असून येथून मॉस्को, कीव्ह, ओडेसा व बाकू येथे नियमित विमानवाहतूक चालते. १६५६ मध्ये रशियाचे दक्षिणेकडील संरक्षक ठाणे म्हणून खारकॉव्ह स्थापन झाले व रशियाने भोवतालच्या स्टेप विभागात वसाहती वाढविल्यामुळे त्याची व्यापारी वाढ झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याची औद्योगिक वाढ होऊन रशियन क्रांतीच्या वेळी ते रशियाचे पाचव्या क्रमांकाचे शहर होते. १९१९ ते ३४ पर्यंत ते युक्रेनच्या राजधानीचे ठिकाण होते. दुसऱ्या महायुद्धात ते जर्मनांनी घेतले व १९४३ मध्ये रशियनांनी परत घेतले तेव्हा त्याची खूपच नासधूस झाली होती. त्यानंतर ते पुन्हा उभारले गेले व त्याचे महत्त्व वाढतच राहिले.

लिमये, दि. ह.