ओक्लाहोमा : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी दक्षिण-मध्य भागातील एक राज्य. ३३ ३९’ उ. ते ३७ उ. आणि ९४ ३०’ प. ते १०३प. क्षेत्रफळ १,८१,०८७ चौ. किमी. लोकसंख्या २५,५९,२५३ (१९७०). याच्या दक्षिणेस टेक्सस, पश्चिमेस टेक्सस व न्यू मेक्सिको, उत्तरेस कोलोरॅडो व कॅनझस आणि पूर्वेस मिसूरी व आर्‌कॅन्सॉ ही राज्ये आहेत. ओक्लाहोमा सिटी ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : अमेरिकेच्या मध्य भागातील ‘ग्रेट प्‍लेन्स’ चा भाग असलेला हा गवताळ प्रदेश, वायव्येकडील ‘पॅनहँडल’ विभागातल्या १,५०० मी. उंचीपर्यंतच्या पर्वताकडून दक्षिणसीमेच्या रेड नदीकडे उतरत आला आहे. काही ठिकाणी दृष्ठी पोहोचेपर्यंत सपाट जमीन, तर काही ठिकाणी पाऊस-वार्‍याच्या मार्‍याने कोरलेली विचित्र आकाराची टेकाडे, असे येथील सर्वसाधारण भूस्वरूप आहे. पश्चिम भागातील माती लोहांशामुळे गडद तांबडी झालेली आहे. पूर्व भागातील एकेकाळची दाट झाडी जाऊन आता फक्त डोंगराळ प्रदेशात थोडा वनविभाग शिल्लक राहिलेला आहे. पश्चिमेकडील मैदानातील चुनखडीमिश्रित मातीची सुपीक जमीन आहे. त्याचप्रमाणे नदीखोर्‍याचीही जमीन कसदार आहे. पूर्व भागात शेजारच्या राज्यातून आलेले ओझार्क पठार व वॉशिटॉ डोंगराचे भाग पसरले आहेत. त्यांच्यामधून जाणार्‍या आर्‌कॅन्सॉ नदीचे विस्तृत खोरे राज्याच्या ईशान्य भागात आहे. कानेडिअन, सिमारॉन अशा इतर नद्या वायव्येकडून आग्‍नेयीकडे या राज्यातून वाहात गेल्या आहेत. ओक्लाहोमा हे सर्व राज्याच मिसिसिपीला मिळणार्‍या उपनद्यांचे क्षेत्र आहे. या प्रदेशात नैसर्गिक सरोवरे नसली, तरी नद्या अडवून झालेले २२ लहानमोठे जलाशय आहेत. खनिजांपैकी पेट्रोलियम, ज्वलनवायू, नरम कोळसा व ॲस्फाल्ट प्रमुख असून जस्त. शिसे, जिप्सम, वाळू व खडक ही दुय्यम होत. राज्याचा अगदी पश्चिमेकडचा सपाट प्रदेश कोरडा, पण पूर्व व आग्‍नेय भाग पुरेशा पावसाचा व सौम्य हवामानाचा आहे. सरासरी तपमान हिवाळ्यात ३·३ से. व उन्हाळ्यात २८·३ से. असून वार्षिक सरासरी पर्जन्य ८० सेंमी. आहे. सपाट प्रदेशात तृणे, द्विदल धान्ये, रानफुले ४१,८०५ चौ. किमी. वनप्रदेशात पाइन, ज्यूनिपर, कॉटनवुड, ओक, विलो, रेडवुड, हिकरी, पॉपलर, लोकस्ट, एल्म, मॅपल, डॉगवुड, पेकन, सायप्रस, ॲश, वॉलनट इ. जातींचे वृक्ष आढळतात. बॅजर, मिंक, ऑपोसम, हरिण, कोल्हा, खार, ससा हे प्राणी व पारवा, रानबदक, वुडकॉक, क्केल हे पक्षी राज्यात आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : गोर्‍या लोकांच्या आगमनाआधी या भागात सहा जमातींचे आदिवासी रेड इंडियन होते. इकडे येऊन गेलेले पहिले यूरोपीय, स्पेनचे १५४१ मध्ये कोरोनँडो, १५९० मध्ये बॅनिला, १६०१ मध्ये ओनेट आणि १६३० मध्ये कॉस्टिलो. हे सर्व सोन्याच्या शोधार्थ फिरणारे. १६८२ मध्ये फ्रेंच समन्वेषक ल साल याने सार्‍या मिसिसिपी नदीखोर्‍यावर फ्रेंचांचा हक्क जाहीर केला, तेव्हा हा मुलूख त्यांच्या निशाणाखाली गेला. केसाळ कातड्यांसाठी फ्रेंच व्यापारी मिसिसिपीच्या उपनद्यांतून जलमार्गाने इकडे येऊ लागले. १८०२ मध्ये सध्याच्या सलीना गावाचे जागी शूतो या फ्रेंच व्यापार्‍याने गोर्‍यांची पहिली कायम वसाहत केली. १८०३ साली लुइझिॲना खरेदीमुळे ओक्लाहोमाचा बहुतेक प्रदेश अमेरिकेला मिळाला. फक्त पश्चिमेकडचा पॅनहँडल हा चिंचोळा पट्टा-जो मूळ स्पॅनिश, नंतर मेक्सिकन, मग टेक्ससच्या लोकराज्याचा भाग व १८४५ मध्ये अमेरिकेने खालसा केला तो – १८९० मध्ये ओक्लाहोमाला जोडण्यात आला. ओक्लाहोमा वेळोवेळी इंडियन मिसूरी व आर्‌कॅन्सॉ प्रदेशाचा भाग होता. त्याला राज्यदर्जा प्राप्त होण्याआधी इंडियन प्रदेश किंवा ओक्लाहोमा प्रदेश म्हणतात. इतर प्रदेशांच्या धतींवर याची रचना बरीच वर्षे झाली नव्हती. कारण त्याला राज्यस्वरूप येईल, अशी कोणाची कल्पना नव्हती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीस टेनेसी, नॉर्थ कॅरोलायना आणि मेक्सिकोच्या आखाताकाठच्या राज्यातील चीरोकी, चिकसाँ, चॉक्टॉ, क्रीक आणि सेमिनोल या सुधारलेल्या व शांतपणे व्यापार करणाऱ्या जमातींच्या जमिनींकडे त्या त्या राज्यातल्या गोर्‍या वसाहतवाल्यांची लोभी नजर वळली. सरकारमार्फत त्यांनी इंडियनांना जमिनी सोडून पश्चिमेकडे ओक्लाहोमात घालवले. या नव्या भूमीवरही १८२५ ते १८४२ पर्यंत स्थलांतरित इंडियनांनी आपापली स्वायत्त राज्ये चालू केली. त्यांच्यात सीक्कोया व चीरोकी नेता जॉन रॉस असे कित्येक लोकोत्तर पुरूष होते. त्यांना शिक्षण व इतर साहाय्य देण्यास ख्रिस्ती मिशनरी झटले. यादवी युद्धात काही इंडियन तटस्थ राहिले, पण गुलामांचे मालक असलेले मात्र बंडखोर दक्षिणेच्या बाजूने लढले त्याचेच निमित्त करून उत्तरेचा जय झाल्यावर सरकारने लढाऊ इंडियनांशी केलेले सारे करार रद्द केले आणि त्यांच्या जमिनी घेण्यास गोर्‍या वसाहतवाल्यांना मुभा दिली. त्याअगोदरच नजीकच्या कॅनझस, मिसूरी, आर्‌कॅन्सॉ आणि टेक्सस राज्यांतले गोरे इकडे शिरू लागले होते. तशा ‘सूनर्स’ किंवा अधिर्‍या लोकांखेरीज ‘बूमर्स’ नावाच्या गोऱ्यांच्या टोळीने इंडियनांच्या जमिनीसाठी सरकारमागे सारखा लकडा लावला. १८८९ पासून इंडियनांकडून जमिनी विकत घेऊन सरकार त्या वसाहतवाल्यांना देऊ लागले. त्या जमिनी व्यापण्यासाठी इतकी धक्काबुक्की होई की नियंत्रणासाठी सैनिक ठेवावे लागत. १८८९ मध्येच राज्यातील पहिली तेलविहीर तुलसा येथे एडवर्ड बर्डने खोदल्यावर तर जमिनीसाठी मागणी आणखी वाढली. काही इंडियन जमाती त्यांच्या जमिनीत तेल सापडल्यामुळे श्रीमंत झाल्या, त्या जमिनींसाठी गोर्‍यांचा हावरेपणा पुन्हा वाढला. १८९३ मध्ये पश्चिमेचा भाग इंडियन प्रदेश आणि पूर्वेकडचा ओक्लाहोमा अशी विभागणी झाली. पूर्वेकडच्या गोर्‍यांनी राज्यदर्जा मिळण्यासाठी निकड लावली तेव्हा दोन्ही भाग एकत्र झाल्यास तो मिळेल, ही अट राष्ट्रसंसदेने घातली. अखेर १९०७ मध्ये पूर्व पश्चिम भाग एकत्र येऊन शेहेचाळीसावे राज्य म्हणून ओक्लाहोमाला राष्ट्रात प्रवेश मिळाला. तुलसाजवळील विहीरीतून १९०५ मध्ये तेल जोरात निघू लागले. १९१५ मध्ये कशिंग व १९१८ मध्ये सेमिनोल क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात तेलउत्पादन सुरू झाले, तेव्हा इकडच्या सकस शेतजमिनींवर आणखी वसाहतवाले लोटले. १९३० मध्ये वार्‍याच्या माराने जमिनींची माती उडून जाऊन अनेक शेते निकामी झाली पश्चिम भाग तर अवर्षणाने आणि सोसाट्याच्या वार्‍याने धुळीचा खळगा बनला. अनेक शेतकर्‍यांनी जमिनी टाकून राज्य सोडले, नंतर भूसंरक्षणाच्या सरकारी योजनांनी जमिनीची पुष्कळ सुधारणा झाली. शेतकर्‍यांना पुन्हा सुस्थिती आली. पेट्रोलियम धंद्यानेही युद्धप्रयत्‍नाला मोलाची मदत केली. युद्धोत्तर काळात उद्योगात विविधता वाढून राज्यात समृद्धी अधिक होत आहे. राज्यात ५१ वर्षे अमलात असलेला दारूबंदी कायदा १९५९ मध्ये सार्वमताने रद्द करण्यात आला.

चार वर्षांसाठी निवडलेले राज्यपाल व सहा खातेप्रमुख व्यवस्था पाहतात. ४८ सीनेटर चार वर्षासाठी निवडलेले व ९९ प्रतिनिधी दोन वर्षासाठी निवडलेले. यांची विधिमंडळे ओक्लाहोमा सिटी या राजधानीत विषमांकी वर्षी अधिवेशने घेतात. सर्वोच्च न्यायालयावर सहा वर्षांसाठी निवडलेले एक न्यायमूर्ती व अपील न्यायालयावर सहा वर्षासाठी तीन न्यायधीश असतात शिवाय चार वर्षासाठी निवडलेले न्यायधीश २४ जिल्हा न्यायालयांवर त्याचप्रमाणे वरिष्ठ, परगणेवार शांतिन्यायालये आणि पालिकांवर न्यायालयेही आहेत. राष्ट्रसंसदेवर राज्यातर्फे दोन सीनेटर व सहा प्रतिनिधी निवडून जातात. शासनाच्या सोयीसाठी राज्य ७७ कौंटींमध्ये विभागलेले आहे.

आर्थिक व सामाजिक जीवन : राज्यात शेतकरी व शेतकामगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकेक शेत सरासरी १२१ हेक्टरचे असून शेतीखालील क्षेत्र १,४४,००० चौ. किमी. आहे. मुख्य पीक गहू असून तो उत्तर, मध्य आणि पश्चिम भागात होते. मका मध्य आणि पूर्वेच्या नदीखोर्‍यात काढतात. यांशिवाय कापूस, राय, पावटे, बटाटा, भुईमूग, सोयाबीन ही इतर पिके राज्यात होतात. चराईवर पोसलेली गुरे व डुकरे, दुभते व अंडी यांचा मोठा उद्योग राज्यात आहे. उद्योगांपैंकी महत्त्वाचा पेट्रोलियम व ज्वलनवायूंचे उत्खनन, शुद्धीकरण व पुरवठा हा होय. यांशिवाय सिमेंट, ॲस्फाल्ट, कोळसा, शिसे, जस्त व जिप्सम या खनिजांचाही उद्योग येथे चालतो. डबाबंद मांस, पीठदळण, तेलखाणींची यंत्रसामग्री या उद्योगांची कारखानदारी येथे आहे. राज्यातील तेल मध्य-पश्चिम व उत्तर-पूर्व या देशविभागांत पोहोचविण्यासाठी ३२,००० किमी. लांबीचे नळमार्ग आहेत. राज्यात १९७२ साली लोहमार्ग ८,६३८ किमी. रस्ते १,७२,५९२ किमी. (पैकी सु. ६०% पक्के) २६५ विमानतळ ६६ नभोवाणी व १३ दूरचित्रवाणी केंद्रे १५,५४,५०० दूरध्वनियंत्रे, ५२ दैनिके व २५३ इतर वृत्तपत्रे होती. ख्रिस्ती धर्माचे प्रमुख पंथ व काही अल्पसंख्य यहुदीधर्मीय राज्यात असून, १९६० साली लोकवस्ती ६८% शहरी (पैकी निम्मी ओक्लाहोमा व तुलसा या दोन शहरांत) होती. राज्यात सु. दीड लाख निग्रो, रेड इंडियन व मिश्र इंडियन मिळून सु. पावणेतीन लाख लोक होते. इंडियन वेगळ्या राखीव प्रदेशात राहात नाहीत. राजधानी ओक्लाहोमा व तुलसा ही तेलकेंद्रे असून एनिड ही गव्हाची व्यापारपेठ आहे. लाँटन व मस्कोगी येथे कारखाने, नॉर्मन येथे विद्यापीठ व कृषिउद्योग केंद्र आहे. इंडियनांची छाप या राज्यात सर्वत्र ठळकपणे आढळते. शिक्षण मोफत व सक्तीचे असून ९ विद्यापीठे व ३९ महाविद्यालये राज्यात आहेत. केंद्र शासनाचा हस्तक्षेप होईपर्यंत शिक्षणात वर्णभेदाचे धोरण होते. प्रमुख शहरात मोठी ग्रंथालये असून राज्यात दोन वस्तुसंग्रहालये, दोन चित्रवीथी तसेच ऐतिहासिक व निसर्गशोभेची राज्यात दोन राष्ट्रीय व सहा राज्यउद्याने आहेत देशातील सर्वात उंच दूरचित्रवाणी स्तंभ (४८७ मी.) व विधानसभांच्या आवारात तेलविहीरी ओक्लाहोमा शहरात आहेत.

ओक, शा. नि.