जळगाव शहर : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १,०६,७११ (१९७१). मुंबईच्या ईशान्येस सु. ४१८ किमी. वर गिरणा–तापी दुआबात वसलेले, १८१८ मध्ये होळकरांकडून इंग्रजांच्या ताब्यात गेलेले व १८६२ पासूनचे भारतातील सर्वांत जुन्या लोहमार्गावरील स्थानक म्हणून गेल्या २०० वर्षांत विकास पावत असलेले प्रमुख व्यापारी, शैक्षणिक, औद्योगिक आणि वाहतुकीचे केंद्र आहे. मध्य रेल्वे–पश्चिम रेल्वे प्रस्थानक असून जळगाव–अमळनेर लघुलोहमार्ग आणि जळगाव–अजिंठा राज्यमार्ग इथूनच सुरू होतात. ‘अजिंठा–प्रवेशद्वार’ म्हणून शहर प्रसिद्ध आहे. सहाव्या क्रमांकाचा धुळे–नागपूर–कलकत्ता राष्ट्रीय हमरस्ता जळगावातूनच सु. ६·५ किमी.पर्यंत असून राज्य परिवहन मार्गाचे हे एक प्रमुख केंद्र आहे. याच्या आसमंतातील शेतमालाची विशेषतः कापूस, केळी, केळपीठ, भुईमूग, तेले, मसाला, पदार्थ, धान्ये, हंगामी बोरे-पेरू-कलिंगडे, भाजीपाला तसेच गुरे, अंडी, दूध, तूप यांची मोठी बाजारपेठ आणि निर्यातकेंद्र आहे. येथे चार कापडगिरण्या, कापूस पिंजून गठ्ठे बांधण्याचे कारखाने, तेलगिरण्या, विद्युत् निर्मिती केंद्र व भारतात इतरत्र नसलेला केळपीठ कारखाना असा औद्यागिक पसारा आहे. हरतऱ्हेच्या शैक्षणिक विकासासाठी निरनिराळ्या अद्ययावत संस्थांतून भरपूर सोय आहे. महाराष्ट्रातील व भारतातील महत्त्वाच्या शासकीय व सहकारी संस्थांची कार्यालये येथे भव्य व सुबक इमारतीत आहेत. देवळे-रावळे-पीर-मशिदी व त्यांच्या यात्रा आदी सर्व जुने अवशेष व परंपरा जपणारे भूतपूर्व खानदेशाच्या राजधानीचे हे सुबक शहर, सांप्रत सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त व सुधारलेले असून सभा-संमेलने-शिबिरे-व्याख्यानमाला यांनी सतत चैतन्यशील असते. महाराष्ट्राचे जेकबाबाद म्हणून प्रसिद्धी व्हावी असा तीव्र उन्हाळा जरी येथे असला, तरी एकंदरीत हवा आरोग्यदायी असून पाणीपुरवठा भरपूर आहे. फार पूर्वीपासून भाजीपाला धान्य-दूध-तूप आदींच्या सुबत्ता व स्वस्ताईसाठी जळगाव प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दूध प्रकल्प येथे उभारण्यात येत आहे.

नाईक, शुभदा