बल्लारपूर : माहराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या चंद्रपूर तालुक्यातील एक इतिहासप्रसिद्ध आणि औद्योगिक शहर. बल्लारशा म्हणूनही ते ओळखले जाते. लोकसंख्या ३४,२६८ (१९७१). हे चंद्रपूर शहराच्या आग्नेयीस १६ किमी. नागपूर-मद्रास लोहमार्गावर, वर्धा नदीकाठी वसले आहे. येथील कागदकारखाना, कोळसाखाणी व लाकडाची बाजारपेठ यांमुळे हे विशेष प्रसिद्ध आहे.

गोंड राजा खांडक्या बल्लाल शाह याच्या कारकीर्दीत गोंड राज्याची राजधानी (इ. स. १४३७ — ६२) येथे होती. येथील झरापत नदीच्या पाण्यामुळे या गोंड राजाच्या अंगावरील व्रण व अर्बुदे गेली आणि म्हणून या गावी त्याने आपली राजधानी वसविली, अशी एक दंतकथा रूढ आहे. खांडक्या बल्लाल शाहच्या कारकीर्दीत शहराची भरभराट झाली होती. येथील ऐतिहासिक किल्ला, राजवाडा, बल्लाल शाह व त्याच्या राणीच्या स्मारकांचे अवशेष इ. गोष्टी गतकालीन वैभवाची साक्ष देतात.

बल्लारपूर येथे १९४९ पासून नगरपालिका आहे. शहराच्या आसमंतात १८७१ मध्ये कोळशाची खाण सापडली त्याचप्रमाणे लोहखनिजही उपलब्ध असल्याने शहराचा विकास होऊन बल्लारपूर हे खाणकामाचे एक केंद्र बनले. कोळशाच्या विपुलतेमुळे औष्णिक वीजनिर्मितीसही मदत झालेली आहे. ‘बल्लारशा पेपर अँड स्ट्रॉ बोर्ड मिल’ या नावाने भारतभर प्रसिद्ध असलेला कागदकारखाना येथेच आहे. शहराच्या परिसरात जंगल असल्याने बल्लारपूर हे शहर इमारती लाकडांची प्रमुख बाजारपेठ बनले आहे. शहराजवळ उत्तम प्रकारची माती असल्याने मृत्पात्री व इतर घरगुती उद्योगांचा विकास झालेला आहे. व्यापारी व हौशी पर्यटक यांची येथे सतत वर्दळ असते.

खांडवे, म. अ.