व्हर्जिनिया : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिण अटलांटिक राज्यांपैकी एक घटक राज्य. विस्तार ३६० ३२’ ते ३९० २७’ उ. अक्षांश व ७६० १५’ ते ८३० ४१’ प. रेखांश यांदरम्यान. भूक्षेत्र १,०२,५५८ चौ. किमी. लोकसंख्या ६६,१८,४०० (१९९५ अंदाज). रिचमंड (लोकसंख्या २,०३,०५६ – १९९०) ही राज्याची राजधानी आहे. व्हर्जिनियाच्या वायव्येस वेस्ट व्हर्जिनिया राज्य, ईशान्येस मेरिलंड राज्य, पूर्वेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस नॉर्थ कॅरोलायना व नैर्ऋत्येस टेनेसी, तर पश्चिमेस केंटकी ही राज्ये आहेत. व्हर्जिनिया ही ग्रेट ब्रिटनची अमेरिकन भूमीवरील, म्हणजेच नव्या जगातील, पहिली कायमस्वरूपी वसाहत असून तिची स्थापना १६०७ मध्ये जेम्सटाउनी येथे करण्यात आली होती. या राज्याने संयुक्त संस्थानांना आठ राष्ट्राध्यक्ष दिले. त्यामुळे व्हर्जिनियाला ‘मदर ऑफ प्रेसिडेंट्स’ असे संबोधले जाते. इंग्लंडची पहिली एलिझाबेथ राणी ही कुमारिका (व्हर्जिन क्वीन) होती तिच्या गौरवार्थ या राज्याला व्हर्जिनिया असे नाव देण्यात आले. काही वेळा ‘मदर ऑफ स्टेट्स’, ‘ओल्ड डोमिन्यन’ या नावांनीही याचा उल्लेख केला जातो.

संयुक्त संस्थानांच्या इतिहासात व्हर्जिनियाने फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमेरिकेतील पहिल्या प्रतिनिधी विधानसभेची स्थापना व्हर्जिनियन लोकांनीच केली. अमेरिकन राज्यक्रांतीच्या चळवळीत व्हर्जिनियन लोकांचा सक्रिय सहभाग होता. संविधान व हक्कांच्या मसुद्याची (बिल ऑफ राइट्सची) रचना व्हर्जिनियन लोकांनीच केलेली असून त्यावरच संयुक्त संस्थानांची शासनव्यवस्था आधारित आहे. व्हर्जिनिया ही यादवी युद्धाचीही मुख्य युद्धभूमी होती. संघीय शासनाकडून राज्यांच्या हक्कांवर होणार्याच अतिक्रमाणाच्या विरोधात एक राज्य म्हणून व्हर्जिनिया नेहमीच अग्रेसर असे. सुरुवातीला तंबाखू या एकमेव पिकावर अर्थव्यवस्था आधारित होती. परंतु नंतर शासकीय सेवेतील मोठ्या प्रमाणावरील रोजगाराच्या उपलब्धतेमुळे अर्थव्यवस्थेत विविधता आली. येथील बहुतांश लोकांच्या परंपरा दक्षिणी राज्यांशी निगडित राहिल्या आहेत. त्यामुळे केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही व्हर्जिनिया हे दक्षिणी राज्यच राहिले आहे.

भूवर्णन : राज्याचे भूमिस्वरूप, नदीसंहती, मृदा, नैसर्गिक साधनसंपत्ती व हवामान या सर्व घटकांत विविधता आढळते. ॲपालॅचिअन पर्वताचा विस्तार या राज्यात आहे. राज्याचे नैर्ऋत्य – ईशान्य दिशेत पसरलेले प्रमुख पाच नैसर्गिक विभाग आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे हे विभाग पुढीलप्रमाणे आहेत : (१) ॲपालॅचिअन पठार, (२) ग्रेट ॲपालॅचिअर व्हॅली, (३) ब्ल्यूरिज पर्वत, (४) पीडमाँट पठार, (५) अटलांटिक किनार्या वरील मैदानी प्रदेश (टाइड वॉटर रीजन).

(१) राज्याच्या नैर्ऋत्य भागात केंटकी सरहद्दीजवळ ॲपालॅचिअन पठार हा दऱ्याखोर्यांयचा व उंच पर्वतीय प्रदेश आहे. यांपैकी सरहद्दीवरील काही प्रदेश कंबर्लंड पर्वत किंवा कंबर्लंड फ्रंट या ओबडधोबड प्रदेशाने व्यापला आहे. या प्रदेशाची सस. पासूनची उंची ६०० – ९०० मी. च्या दरम्यान आहे. येथील नद्यांनी काही ठिकाणी खोल निदऱ्या निर्माण केल्या आहेत.

(२) ॲपालॅचिअन पठाराच्या पूर्वेस ग्रेट ॲपालॅचिअन व्हॅली हा कटक, पठारे व दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. यालाच ‘व्हॅली ऑफ व्हर्जिनिया’ असे संबोधले जाते. हा प्रदेश सलग एकच खोरे नसून अनेक एकाकी गोलाकार टेकड्या, कटक व दऱ्या यांमध्ये विभागला गेला आहे. ॲलेगेनी पर्वत हा यांतील सर्वांत पश्चिमेकडील कटक पश्चिम सरहद्दीवर आहे. मॅसनटन पर्वताने येथील शेनँडोआच्या वरच्या खोऱ्याचे दोन भाग केले असून त्या प्रत्येकाचे शेनॅडोआ नदीच्या शाखांनी जलवाहन केले आहे. या भागातील शेनँडोआ नदीखोरे हा सुपीक व समृद्ध प्रदेश आहे. जेम्स रोअनोक, न्यू व होलस्टन या येथील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. नॉर्थ, शेनँडोआ, बॉकर व क्लिंच पर्वत इत्यादी कटक येथे आहेत. यांपैकी बहुतांश कटक ९०० ते १,२०० मी. उंचीचे आहेत.

(३) ग्रेट ॲपालॅचिअन व्हॅलीच्या पूर्वेस ब्ल्यूरिज पर्वत हा घनदाट अरण्यांनी आच्छादलेला वैशिष्ट्यपूर्ण असा प्राकृतिक विभाग आहे. ब्ल्यूरिज ही ॲपालॅचिअन पर्वतश्रेण्यांमधील सर्वांत पूर्वेकडील महत्त्वाची श्रेणी आहे. उत्तरेस पोटोमॅक नदीतीरावरील हार्पर्स फेरी (वेस्ट व्हर्जिनिया) पासून दक्षिणेस नॉर्थ कॅरोलायना सरहद्दीपर्यंत या प्रदेशाचा विस्तार झाला आहे. त्याची लांबी ४८० किमी. आहे. रोअनोक नदीच्या उत्तरेस ब्ल्यूरिजची रुंदी कमी, तर दक्षिणेस ती जास्त आढळते. दक्षिणेतील १,७४६ मी. उंचीचे मौंट रॉजर्झ (राज्यातील सर्वोच्च शिखर) १,६८२ मी. उंचीचे व्हाइट टॉप मौंटन यांसारखी काही उंच शिखरे या प्रदेशात आहेत.

(४) ब्ल्यूरिज पर्वत विभागाच्या पूर्वेस व राज्याच्या मध्यवर्ती भागात पीडमाँट पठार हा घरंगळणी उच्चभूमीचा प्रदेश आहे. या प्रदेशाने राज्याचा एक तृतीयांश भाग व्यापलेला आहे. याची उंची सस. पासून ९० ते ३०० मी. च्या दरम्यान असून ती पश्चिमेकडे ब्ल्यूरिजपर्यंत वाढत गेलेली आहे. रुंदी उत्तरेस ६५ किमी., तर दक्षिणेस २६५ किमी. आहे. अधूनमधून असणाऱ्या कटक व टेकड्यांमुळे हा प्रदेश खंडित झालेला दिसतो. काही कटकांच्या दरम्यान सुपीक व सखल प्रदेशांचे पट्टे आढळतात. त्यांपैकी पोटोमॅक व रॅपहॅनक नद्यांदरम्यानचा मैदानी प्रदेश विशेष महत्त्वाचा आहे. या प्रदेशाची पूर्व कड ‘फॉल लाइन’ (धबधब्यांची रेषा) म्हणून ओळखली जाते. पीडमाँट पठारावरील ग्रॅनाइट व नीस खडकांची भक्कम स्तररचना व किनारी मैदानी प्रदेशातील कमकुवत खडकस्तररचना या धबधब्यांच्या रेषेवर एकत्र आलेल्या आहेत. पीडमाँट पठारावरील नद्या ही रेषा जेथे पार करतात, तेथे धबधबे तयार झालेले आहेत. आर्लिंग्टन, फ्रेडरिक्सबर्ग, रिचमंड व एम्पोरिया या ठिकाणांवरून धबधब्यांची रेषा गेलेली आहे.

(५) धबधबा रेषेच्या पूर्वेस चेसापीक उपसागरापर्यंतचा सु. १६० किमी. रुंदीचा प्रदेश अटलांटिक किनारपट्टीचे मैदान या प्राकृतिक विभागात येतो. संयुक्त संस्थानांच्या पूर्व किनाऱ्यावरील फ्लॉरिडापासून न्यूयॉर्कपर्यंत पसरलेल्या अटलांटिक किनारपट्टीच्या मैदानाचाच हा भाग आहे. व्हर्जिनियामध्ये याला ‘टाइड वॉटर रीजन’ (भरतीच्या पाण्याचा प्रदेश) असे म्हणतात. कारण भरतीचे पाणी येथील उपसागर, खाड्या व नद्यांमधून आत वाहत येत असते. यातील बराचसा प्रदेश अगदी कमी उंचीचा असून त्याची उंची ६० ते ९० मी. च्या दरम्यान आहे. वाळू, माती व चुनामिश्रित मातीचे आच्छादन येथे आढळते. पोटोमॅक, रॅपहॅनक, जेम्स व रोअनोक नद्या व त्यांच्या उपनद्या ह्या सखल प्रदेशातून चेसापीक उपसागराकडे वाहत जातात. त्या उपसागराला जेथे मिळतात, तेथे मुखाशी भरतीच्या खोल नदीमुख खाड्या निर्माण झाल्या आहेत. त्या रुंद नदीमुख खाड्यांच्या दरम्यान उपसागरात घुसलेले द्वीपकल्प आढळतात. किनाऱ्यावर अनेक ठिकाणी पाणथळ व दलदलीचे प्रदेश निर्माण झालेले आहेत. त्यांपैकी ‘ग्रेट डिझ्मल स्वँप’ हा सर्वांत मोठा दलदलीचा प्रदेश असून त्याचा विस्तार व्हर्जिनियाच्या आग्नेय कोपऱ्यापासून ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ कॅरोलायनापर्यंत झालेला आढळतो.

हवामान : व्हर्जिनियाचे हवामान सामान्यपणे समशीतोष्ण प्रकारचे असून उंचीनुसार, तसेच चेसापीक उपसागर व अटलांटिक महासागर यांच्या सान्निध्यानुसार त्यात फरक पडत जातो. सरासरी तापमान हिवाळ्यात सु. ३० से. व उन्हाळ्यात सु. २३० से. असते. हिवाळ्यातील तापमान पर्वतीय प्रदेशात –१८० से. च्या दरम्यान असते, तर आग्नेय भागात कधीकधी – ९० से. पेक्षा खाली जाते. वार्षिक सरासरी वृष्टिमान स्थलपरत्वे ८१ ते १२० सेंमी. आढळते. वर्षातील हिमाच्छादनाचा काळ पूर्वेकडील प्रदेशात १० दिवस, पीडमाँट प्रदेशात २० दिवस व पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशात ६० दिवसांचा आहे.

मृदा : व्हर्जिनियातील मृदेत विविधता आढळते. भरती-प्रदेशात चांगली मृदा आढळते. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर तंबाखूचे उत्पादन घेतल्यामुळे ती क्षीण झालेली आहे. धबधब्याच्या रेषेलगतच पश्चिमेस हलक्या मृदेचा पट्टा आढळतो. ब्ल्यूरिज पर्वताकडील पीडमाँट पठारी प्रदेशात अधिक सुपीक मृदा आहे. एके काळी या भागाचे खूप विदारण झाले होते, परंतु योग्य नियोजन व खतांचा वापर करून अलीकडे सुपीकता वाढविलेली आहे. शेनँडोआ खोर्यानतील मृदा त्यामानाने बरीच सुपीक आहे.

वनस्पती व प्राणी : राज्याचे ६३% क्षेत्र अरण्यांखाली होते (१९९२). सुमारे ९० टक्के व्यापारी वने खाजगी मालकीची असून त्यांतील ४० टक्के वने शेतकऱ्यांची होती. ब्रूमसेज, मार्श, वायर, क्रॅब, ब्लूग्रास इ. गवतांचे प्रकार बऱ्याच प्रदेशात आढळतात. पाइन, ओक, पाँप्लर, गोंदाचे झाड, हिकरी, डॉगवुड, सायप्रस, रिव्हर बर्च, क्रॅनबेरी, विस्टेरिया, लोबीलीआ, लूपिन, मे ॲपल, मॉर्निंग-ग्लोरी, लॉरेल, ऱ्होडोडेंड्रॉन, अझेलिआ, नेचे, रानफुले असे असंख्य वृक्षप्रकार राज्यात आढळतात.


 गोरे वसाहतकार जेव्हा पहिल्यांदा व्हर्जिनियामध्ये आले, तेव्हा या प्रदेशात विपुल व विविधतापूर्ण प्राणिजीवन होते. अजूनही संरक्षित व निर्जन प्रदेशात एल्क, काळे अस्वल, रानमांजर हे प्राणी आढळतात. ऑटर व मिंक हे प्राणी दुर्मीळ झाले आहेत. संवर्धनविषयक प्रयत्नांमुळे हरणांची संख्या वाढत आहे. कोल्हा, ससा, चिचुंद्री, खार, रॅकून, ॲपाँसम, स्कंक इ. छोटे प्राणी पुष्कळ आहेत. मोठ्या प्रमाणावरील पक्षी-संवर्धन कार्यक्रमांमुळे शिकारी पक्ष्यांची संख्या अधिक राहिली आहे. रान-टर्की, रडणारे कबुतर, सुतारपक्षी, बॉबव्हाइट, वेगवेगळ्या प्रकारची स्थलांतरित बदके, विविध गाणारे पक्षी, कुरव, कोकीळ, ब्लूबर्ड, कार्डिनल (राज्यपक्षी) असे विविध प्रकारचे पक्षी आढळतात. लगतच्या चेसापीक उपसागरात तसेच अंतर्गत गोड्या पाण्यात विविध प्रकारचे मासे आढळतात.

खनिज संपत्तीच्या बाबतीत व्हर्जिनिया समृद्ध आहे. त्यात कोळसा उत्पादन विशेष महत्त्वाचे आहे. त्याशिवाय चुनखडक, डोलोमाइट, वालुकाश्म व इतर विविध प्रकारचे दगड, वाळू, रेती, शिसे, जस्त, लोहखनिज, चिकणमाती, खनिजतेल, नैसर्गिक वायू, शंखजिरे, ॲप्लाइट, फेल्स्पार, जिप्सम, कायनाइट, पायराइट, टिटॅनियम, मीठ इत्यादींचे विपुल साठे आहेत.

इतिहास व राजकीय स्थिती : ख्रिस्तपूर्व सु. ८००० वर्षांपूर्वी पहिले अमेरिकन इंडियन लोक व्हर्जिनिया प्रदेशात आले. गोरे वसाहतकरी येथे आले, तेव्हा येथील भरती-प्रदेशात अल्गॉंक्वियन बोली बोलणाऱ्या अमेरिकन इंडियन जमाती होत्या. त्या वेळी त्यांची संख्या सु. १०,००० होती. याशिवाय सूअन भाषासमूहातील मोनाकन व मॅनहॉक ह्या अमेरिकन इंडियन जमाती पीडमाँट प्रदेशात, इरोक्वान भाषासमूहातील नोटोवेज इंडियन आग्ने भागात, तर चेरोकी लोक नैर्ऋत्य भागात राहात होते.

इंग्लिश लोकांनी संपूर्ण उत्तर अमेरिकेला, म्हणजेच ज्यावर स्पॅनिश किवा फ्रेंचांची सत्ता नाही अशा विस्तृत प्रदेशाला, ‘व्हर्जिनिया’ हे नाव वापरले. या प्रदेशावर वसाहत करण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले होते. पहिला जेम्स याने १६०६ मध्ये लंडनच्या व्हर्जिनीया कंपनीस (लंडन कंपनीस) सनद दिली. कंपनीने क्रिस्टोफर न्यूपोर्ट, गॉझ्नोल्ड बार्थालोम्यू व जॉन रॅडक्लिफ या कप्तानांच्या नेतृत्वाखाली १४४ लोकांसह सारा काँन्स्टंट, गुडस्पीड व डिस्कव्हरी ही तीन जहाजे नव्या जगात कायमस्वरूपी इंग्लिश वसाहत स्थापण्याच्या कामगिरीवर पाठविली. जेम्स नदीतील एका द्वीपकल्पावर १३ मे १६०७ रोजी ही तुकडी उतरली व त्यांनी अमेरिकेतील पहिली कायमस्वरूपी इंग्लिश वसाहत स्थापन केली. याच वसाहतीला त्यांनी इंग्लंडचा राजा पहिला जेम्स याच्या नावावरून ‘जेम्सटाउन’ असे नाव दिले.

कॅप्टन जॉन स्मिथ याच्या खंबीर नेतृत्वाने सुरुवातीच्या काळात वसाहतकऱ्यांना संघटित ठेवून अनेक आपत्तींना तोंड दिले. परंतु १६०९ मध्ये एका अपघातात गंभीर दुखापत झाल्याने स्मिथ उपचारासाठी इंग्लंडला परतला. त्यामुळे १६०९-१० च्या हिवाळ्यात प्रभावी नेतृत्वाअभावी व उपासमारीमुळे, दीर्घ कष्टप्रद हिवाळ्याला तोंड देणे अवघड झाल्याने, वसाहतीतील लोकांची संख्या घटली. जून १६१० मध्ये उर्वरित लोकांनी इंग्लंडला परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते जेम्स नदीच्या मुखापर्यंत आले, परंतु तेथे त्यांच्यासाठी काही साधनसामग्री व नवीन वसाहतकर्यांहना घेऊन आलेल्या थॉमस वेस्ट (लॉर्ड दे ला वॉर) याच्याशी गाठ पडल्याने त्यांनी जेम्सटाउनला परतण्याचा निर्णय घेतला. १६१३-१४ च्या सुमारास जॉन रॉल्फ याने येथे वेस्ट इंडियन जातीच्या तंबाखूच्या व्यापारी लागवडीस सुरुवात केली. १६१४ मध्ये रॉल्फने येथील इंडियनांच्या प्रमुखाच्या मुलीशी लग्न केल्यामुळे पुढे आठ वर्षेपर्यंत वसाहतकऱ्यांचे इंडियनांबरोबरचे संबंध सलोख्याचे राहिले. ३० जुलै १६१९ रोजी या नव्या जगातील पहिल्या वसाहतीची ‘हाउस ऑफ बर्जिसेस’ ही पहिली प्रातिनिधिक लोकसभा अस्तित्वात आली. १६१९ मध्येूच पहिले काळे गुलाम वसाहतीत आणण्यात आले. त्यानंतर येथील तंबाखू उद्योग वाढत गेला. मोठ्या संख्येने वसाहतकरी या वसाहतीकडे येऊ लागले.

इ. स. १६२२ मध्ये अमेरिकन इंडियनांनी ३५० वसाहतकारांची हत्या केली. वसाहतकऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष वाढू लागल्यामुळे पहिला जेम्स याने १६२४ मध्ये व्हर्जिनिया कंपनीची सनद रद्द करून वसाहत ताब्यात घेतली आणि लंडन कंपनी बरखास्त केली. १६४१ मध्ये विल्यम बर्क्ली याची गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली. १६५२ साली इंग्लंडमध्ये यादवी युद्धाला तोंड फुटले, तेव्हा ह्या वसाहतीचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटच्या अधिकाराखाली आणण्यात आला व राजाचा प्रतिनिधी असलेल्या बर्क्ली याला गव्हर्नरपदावरून दूर केले. ही वसाहत ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ट होती. १६६० मध्ये इंग्लंडमध्ये राजसत्तेची पुन:स्थापना झाल्यानंतर दुसरा चार्ल्स गादीवर आला व बर्क्ली याची गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्ती झाली. पुढे डचांची सामुद्रिक युद्धे, अधिक कर, हवेची प्रतिकूल स्थिती, नौपरिवहनविषयक नवीन कायदे इत्यादींमुळे तंबाखू उत्पादनाचे फार मोठे नुकसान होऊन येथील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली.

अठरावे शतक मात्र अनेक दृष्टींनी व्हर्जिनियाचे सुवर्णयुग ठरले. त्या वेळी व्हर्जिनिया ही सर्वांत मोठी इंग्लिश वसाहत होती. या शतकात तंबाखूच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे फार मोठा आर्थिक लाभ या वसाहतीला मिळाला. गुलामांच्या व्यापारात खूप वाढ झाल्यामुळे भरती-प्रदेशातील शेतीसाठी पुरेस मनुष्यबळ उपलब्ध झाले.

ब्रिटनने १७६० व १७७० च्या दशकात वसाहतींवर वेगवेगळ्या प्रकारचे कर लादले. मात्र या वसाहतींना ब्रिटिश संसदेत प्रतिनिधित्व नव्हते. १७६५ मध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या स्टँप ॲक्टला अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींकडून विरोध झाला. त्यातूनच काँटिनेंटल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. या काँग्रेसच्या दुसऱ्या सभेत काँटिनेंटल आर्मीचा प्रमुख म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनची निवड करण्यात आली (१५ जून १७७५). १५ मे १७७६ रोजी विल्यम्सबर्ग येथे भरलेल्या पाचव्या व्हर्जिनिया अधिवेशनात व्हर्जिनिया वसाहत मुक्त व स्वतंत्र राज्य असल्याचे जाहीर करण्यात आले. १२ जून रोजी जॉर्ज मेसनचा हक्कविषयक जाहीरनामा, तर २९ जून रोजी व्हर्जिनियाची पहिली राज्यघटना स्वीकारण्यात आली.

काँग्रेसने ४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याचा मूळ मसुदा टॉमस जेफर्सन या व्हर्जिनियन व्यक्तीनेच केला होता. अमेरिकन सैन्याचा सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन हा व्हर्जिनियनचा होता. व्हर्जिनियाच्या भूमीवरच झालेल्या यॉर्कटाउन युद्धात जॉर्ज वॉशिंग्टनने लॉर्ड काँर्नवॉलिसच पाडाव करून अंतिम विजय मिळविला.

सर्व वसाहतींचा संघीय संविधान मसुदा तयार करण्याबाबतही पुन्हा एकदा व्हर्जिनियाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राष्ट्रीय शासनाच्या निर्मितीत व्हर्जिनियाचे पुढारी आघाडीवर होते. पहिला राष्ट्रध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची निवड करण्यात आली. व्हर्जिनियाच्या जेम्स मॅडिसन यांना तर ‘फादर ऑफ द काँन्स्टिट्यूशन’ असे म्हटले जाते. व्हर्जिनियाचे राजघराणे (डायनॅस्टी) म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन, टॉमस जेफर्सन, जेम्स मॅडिसन व जेम्स मन्रो या राष्ट्राध्यक्ष झालेल्या चार व्हर्जिनियन व्यक्तींना संबोधले जाते.

इ.स. १८१८ नंतर राज्याची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी व्हर्जिनियम लोक गुलामांच्या व्यापाराकडे वळले. त्यामुळे व्हर्जिनियाला ‘ब्रीडर ऑफ स्लेव्ह्ज’ (गुलामांचे निर्माते) असे म्हटले जाते. पुढे गुलामांच्या व्यापारविरोधी वातावरणामुळे राज्याची अर्थव्यवस्था खालावली. १८३१ मध्ये काळ्या गुलामांचा नेता व साउथॅम्टन काउंटीमधील धर्मोपदेशक नॅट टर्नर याने येथे गुलामांचे बंड घडवून आणले.


 दीर्घकालीन व गुंतागुंतीच्या अनेक घटनाक्रमांचे पर्यवसान यादवी युद्धात झाले. साउथ कॅरोलायना व इतर दक्षिणी राज्यांत सामील होण्यास व्हर्जिनियाने नकार दिला. ४ एप्रिल १८६१ रोजीच्या राज्य अधिवेशनात संसदेतून फुटून निघण्याच्या कल्पनेस प्रामुख्याने पश्चिमेकडील व्हर्जिनियन लोकांनी विरोध केला. मात्र १७ एप्रिल १८६१ रोजीच्या राज्य अधिवेशनात संयुक्त संस्थानांतून फुटून निघण्याचा कायदा संमत करण्यात आला. २५ एप्रिल रोजी ‘काँन्फेडरेटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ मध्ये व्हर्जिनिया सामील झाला. अमेरिकन यादवी युद्धात (१८६१ – ६५) कन्फेडरसी लष्कराचे नेतृत्व रॉबर्ट ई. ली याचेकडे होते. २१ मे १८६१ रोजी या संयुक्त प्रदेशाची राजधानी रिचमंड करण्यात आली. मात्र व्यायव्येकडील परगण्यांनी (काउंटी) या पूर्वेकडील प्रदेशात समाविष्ट होण्यास नकार दिला. शेवटी १८६३ मध्ये व्हर्जिनियातील वायव्येकडील ४८ परगण्यांचे मिळून वेस्ट व्हर्जिनिया नावाने एक स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

यादवी युद्धाच्या काळात व्हर्जिनिया हे लष्करी व राजकीय हालचालींचे, तसेच युद्धभूमीचे प्रमुख केंद्र होते. बुल रन ही पहिली मोठी लढाई २१ जुलै १८६१ रोजी, तर बाल्स ब्लफ लढाई २१ ऑक्टोबर १८६१ रोजी राज्यात लढली गेली. राज्यात लढल्या गेलेल्या इतर प्रमुख लढाया पुढीलप्रमाणे : विंचेस्अर, फ्रेडरिक्स बर्ग, सेव्हन पाइन्स (फेअर ओक्स), दुसरी बुल रन, चाल्सलर्सव्हिल, वाइल्डरनेस, न्यू मार्केट, कोल्ड हार्बर, पीटर्सबर्ग, रिचमंड आणि लिंचबर्ग इत्यादी. ९ एप्रिल १८६५ रोजी उत्तर व्हर्जिनियातील ॲपमॅटक्स येथून अखेरचे सैन्य काढून घेतले गेले. युद्धाच्या अखेरीस व्हर्जिनियाचा बहुतांश भाग हानीमुळे पूर्णपणे अवशेषरूपी बनला होता. शेती आणि कारखाने यांचाही विनाश झाला होता. लोहमार्गांची मोडतोड झालेली होती. काळे मजूर अस्थिर तर गोरे मजूर दुर्मीळ झाले होते. राज्य प्रचंड कर्जबाजारी बनले होते आणि कसलीही पत राहिली नव्हती. व्हर्जिनियाला आपल्या एक तृतीयांश प्रदेशाला मुकावे लागले होते व ते क्षेत्र वेस्ट व्हर्जिनियाकडे गेले होते. नुकसानीचा एकूण आकडा १,००० लक्ष डॉलरचा होता.

युद्धाच्या अखेरीच्या कालावधीत गव्हर्नर फ्रान्सिस एच्. पीअरपाँट याच्या नेतृत्वाखाली व्हर्जिनिया शासनाची स्थापना करण्यात आली होती. ९ मे १८६५ रोजी राष्ट्रध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांनी व्हर्जिनियाच्या शासनास कायदेशीर शासन म्हणून मान्यता दिली. १८६७ च्या उत्तरार्धात लष्करी देखरेखीखाली संविधान रचना समितीच्या प्रतिनिधींची निवडणूक झाली. या समितीने तयार केलेले संविधान वादग्रस्त बाबी वगळता व्हर्जिनियन लोकांनी मान्य केले (जुलै १८६९). १६ जानेवारी १८७० रोजी व्हर्जिनिया पुन्हा संघराज्यात दाखल झाले.

पुनर्रचना कालखंडाच्या अखेरीपासून विसाव्या शतकापर्यंतचा काळ हा राजकीयदृष्ट्या अंतर्गत वादविवादाचा काळ ठरला. राज्याच्या कर्जाबाबतची तडजोड हा प्रमुख राजकीय वादाचा प्रश्न होता. कर्जाबद्दलचा राज्याचा वाद १८९१-९२ पर्यंत टिकला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शेतकरीवर्ग संघटित होऊ लागला. १८८० च्या दशकात ‘फार्मर्स अलायंस’ची स्थापना झाली. त्याचेच पर्यवसान ‘पीपल्स किंवा पाँप्युलर पार्टी’ च्या स्थापनेत झाले. या पक्षाने १८९२ च्या निवडणुकीत चांगलीच मते मिळविली.

यादवी युद्धानंतर राज्यात काळा-गोरा भेद विकोपास गेला. गोऱ्या लोकांनी राज्याचे नवीन संविधान आणले, त्यातून काळ्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर महत्त्वपूर्ण अशा नव्या उद्योगांची सुरुवात झाली. १९२६ – ६६ या कालावधीत राज्याला हॅरी एफ्. बर्ड (ज्येष्ठ) यांचे प्रभावी नेतृत्व लाभले. १९७१ मध्ये राज्याने नवीन संविधान स्वीकारले. १९७० व १९८० च्या दशकात स्थानिक शासनाचे लोकप्रतिनिधी म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे अनेक काळे उमेदवार निवडून आले. १९७७ मध्ये रिचमंड नगरपरिषदेत काळ्या लोकांचे बहुमत झाल्याने शहराचा पहिला कृष्णवर्णीय मेयर बनला तर १९८९ मध्ये एल्. डग्लस वाइल्डर ही संयुक्त संस्थानांच्या इतिहासातील पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती गव्हर्नर म्हणून निवडली गेली.

आर्थिक स्थिती : कृषिप्रधान राज्य म्हणून व्हर्जिनिया प्रसिद्ध आहे. सुरुवातीच्या काळात तंबाखू हे प्रमुख पीक होते. अठराशेनंतर लाकडी नांगरांऐवजी लोखंडी नांगरांच्या वापरास सुरुवात झाली. प्रमुख पीक म्हणून तंबाखूचे महत्त्व कायम राहून गहू, मका, सोयाबीन, टोमॅटो, सफरचंद, पीच, बटाटे, रताळी, भुईमूग व कापूस ही पिकेही महत्त्वाची ठरली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व्हर्जिनियाने आपल्या आर्थिक विकासाचा दर देशाच्या दरापेक्षाही अधिक राखला. शेतीमधील विविधताही अधिक वाढली. भरती-प्रदेशात आणि पूर्व किनाऱ्या वर ‘मंडई बागशेती’ (ट्रक फार्मिंग), तर इतरत्र कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्धोत्पादने इत्यादींचा विकास झाला. तंबाखू या प्रमुख नगदी पिकाच्या उत्पादनात राज्याचा देशात चौथा क्रमांक होता (१९८४). अनधिकृतरीत्या गांजा उत्पादनही घेतले जाते. राज्यात एकूण कृषि-क्षेत्र ३४,८०,२९६ हेक्टर होते (१९९६). १९९५ मध्ये वेगवेगळ्या कृषिउत्पादनांपासून मिळालेले उत्पन्न पुढीलप्रमाणे : (उत्पन्न द. ल. डॉलरमध्ये) क्षेत्र पिके ५५६·२ हरितगृह, रोपवाटिका व वृक्ष उत्पादने १३८·६३ भाजीपाला ८७·८ फळे ५२·१९ आणि पशुधन व पशुधन उत्पादने १,३९३.१८.

व्हर्जिनियाच्या वार्षिक कृषिउत्पन्नामध्ये सु. तीन पंचमांश हिस्सा पशुधनापासून मिळणार्या९ उत्पन्नाचा असतो. बीफ व दुग्धोत्पादन, कोंबडीचे मांस, अंडी व टर्की उत्पादन महत्त्वाचे आहे. टर्की उत्पादनात देशात राज्याचा सहावा क्रमांक होता (१९८४). डुकरांची पैदासही महत्त्वाची आहे. राज्यातील पशुधन पुढीलप्रमाणे होते : गुरे १८ लक्ष दुभत्या गाई १,२८,००० शेळ्या व मेंढ्या ८४,००० (१९९६) डुकरे ३,८०,००० टर्की २३५ लक्ष (१९९५).

विसाव्या शतकात येथे कारखानदारीला महत्त्व प्राप्त झाले. अनुकूल परिस्थितीमुळे पूर्वेकडील व मध्य पश्चिमी राज्यांतून व्हर्जिनियाकडे उद्योगधंदे आकर्षिले जाऊ लागले. पहिल्या व प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धामुळे औद्योगिकीकरणात विविधता आली. तंबाखू उत्पादने व प्रामुख्याने सिगारेट निर्मिती हे वसाहतकालीन उद्योग अग्रेसर राहून येथे रसायन व इतर उद्योगांचाही विकास घडून आला. खते, स्फोटक पदार्थ, रंग व व्हार्निश, औषधे व औद्योगिक रसायने ही रसायन उद्योगातील प्रमुख उत्पादने आहेत. रेयॉन निर्मितीस राज्यात १९१७ मध्ये प्रारंभ झाला. रेयॉन निर्मितीत राज्य आघाडीवर आहे. अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, जहाजनिर्मिती, वाहतुकीची साधने, विद्युत् उपकरणे, छपाई व प्रकाशन, लाकडाचा लगदा व फर्निचर, कागद, रबर व प्लॅस्टिक उत्पादने, यंत्रे, धातूच्या वस्तू व कपडे हे इतर उद्योग राज्यात विकसित झाले आहेत. निर्मिति उद्योगाचे विकेंद्रीकरण झालेले असले, तरी रिचमंड व न्यूपोर्ट न्यूज ही प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत. राज्यातील एकूण कामकरी लोकांपैकी तीन चतुर्थांश लोक सेवा उद्योगात गुंतले आहेत. येथील लोकांचे दरडोई उत्पन्न २०,२८८ डॉलर होते (१९९५).


 कोळसा या राज्यातील प्रमुख खनिजाचे १९९४ मधील उत्पादन ३,३६,९२,६५० मे. टन होते. शक्तिसाधनांव्यतिरिक्त इतर खनिजांचे उत्पादन, ५,१४० लक्ष डॉलर किमतीचे झाले (१९९४). व्हर्जिनियातील वनसंपत्तीमधून कागद व लाकडाचा लगदा, फर्निचर व इतर अनेक लाकडी उत्पादनांच्या निर्मितीसाठीचा कच्चा माल पुरविला जातो.

अटलांटिक महासागर, चेसापीक उपसागर व भरतीचे पाणी येणार्याड नद्यांच्या पात्रात व्यापारी मासेमारी चालते. या व्यवसायामुळे राज्यातील ७,५०० मच्छीमारांना रोजगार मिळाला आहे. १९८३ मध्ये ३,७६,००० टन मासे पकडण्यात आले, त्यांची एकूण किंमत ८४७ लक्ष डॉलर होती.

हॅम्प्टन रोड्स हे देशातील प्रमुख निर्यात बंदर आहे. नॉरफॉक व न्यूपोर्ट न्यूज ही अन्य प्रमुख बंदरे असून त्यांमधून प्रामुख्याने कोळसा, खनिजतेल व धान्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. जेम्स नदीवरील रिचमंड, होपवेल आणि पोटोमॅक नदीवरील अलेक्झांड्रिया या अंतर्गत बंदरांतही खोल बंदर-सुविधा आहेत.

राज्यातील रस्त्यांची लांबी १,०८,०७५ किमी. (१९९५) असून नोंदणीकृत वाहनांची संख्या ५३,८३,५०० होती (१९९४). प्रथम दर्जाच्या लोहमार्गांची लांबी ५,३०० किमी. होती (१९९२). नॉरफॉक, रिचमंड व न्यूपोर्ट न्यूज येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. १९८२ मध्ये राज्यात ५८ सार्वजनिक, तर २०२ खाजगी विमानतळे होती.

लोकजीवन व समाजजीवन : व्हर्जिनियात पहिल्यांदा जे वसाहतकार आले, ते प्रामुख्याने इंग्रज होते. सतराव्या शतकात मोठ्या संख्येने वेल्श व फ्रेंच ह्यूगेनॉट्स या भागात आले. तसेच काही जर्मन व स्कॉकाँटिश-आयरिश लोक पेनसिल्व्हेनियातून या वसाहतीत आले. काळे लोक पहिल्यांदा १६१९ मध्ये या भूमीवर उतरले. काळे गुलाम हे येथील शेती विकासातील प्रमुख घटक ठरले. अठराव्या शतकात गुलामांच्या व्यापारात वृद्धी होईपर्यंत येथील काळ्या लोकांची संख्या फारच कमी होती. १७०० ते १८०० या कालावधीत व्हर्जिनियाची लोकसंख्या फारच वेगाने वाढली. यादवी युद्धाच्या सुरुवातीच्या काळात निम्मी लोकसंख्या काळ्या गुलामांची होती. परंतु त्यानंतर त्यांची संख्या हळूहळू कमी होत जाऊन विसाव्या शतकाच्या अखेरीस ती एकूण लोकसंख्येच्या एक पंचमांश झाली. १९४० नंतरच्या दशकात, प्रामुख्याने विसाव्या शतकाच्या अखेरीस, लोकसंख्या वाढीच्या राष्ट्रीय दरापेक्षा राज्याचा दर अधिक म्हणजे सु. १०० टक्के राहिला. आप्रवाशांची मोठी संख्या हेही त्यामागील एक कारण आहे. दर हजारी जन्मप्रमाण १३·९ मृत्युप्रमाण ९, बालमृत्युप्रमाण (१ वर्ष वयाखालील) ७·८ होते (१९९५). बॅप्टिस्, मेथडिस्ट, प्रॉटेस्टंट-एपिस्कोपल, रोमन कॅथलिक व प्रेसबिटेरियन ही येथील प्रमुख चर्च आहेत. एकूण लोकसंख्येत ७७.४% गोरे, १८.८% कृष्णवर्णीय व ३.८% इतर वांशिक गटांतील लोक होते (१९९०).

व्हर्जिनियात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत आहे. ६ ते १७ वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. १९९४-९५ मध्ये प्राथमिक शाळांत ६,८४,००० विद्यार्थी व ४३,००० शिक्षक सार्वजनिक माध्यमिक शाळांत ३,७७,००० विद्यार्थी व २८,००० शिक्षक होते. राज्यात उच्च शिक्षणाचा विकास झालेला आहे. विल्यम्सबर्ग येथील काँलेज ऑफ विल्यम अँड मेरी (स्था. १६९३) ही राज्यातील सर्वांत जुनी संस्था असून संयुक्त संस्थानांतील हे दुसऱ्या क्रमांकाचे जुने महाविद्यालय आहे. लेक्झिंग्टन येथील वॉशिंग्टन अँड ली युनिव्हर्सिटी (१७४९), हॅम्पडेन-सिडनी काँलेज (१७७६), शार्लट्सव्हिल येथील टॉमस जेफर्सन यांनी स्थापन केलेली युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया (१८१९) ह्या प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहेत. याशिवाय राज्यात काही पब्लिक कम्युनिटी महाविद्यालये व काही खाजगी कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

व्हर्जिनियातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय १७९४ मध्ये अलेक्झांड्रिया येथे स्थापन झाले. सर्व शहरे व प्रमुख नगरांमध्ये सार्वजनिक ग्रंथालये आहेत. अनेक परगण्यांमध्ये फिरती पुस्तकसेवा पुरविली जाते. विद्यापीठ व महाविद्यालयांच्या ठिकाणी संशोधन ग्रंथालये आहेत. रिचमंड येथील ललितकलाविषयक व्हर्जिनिया म्युझिअम, क्राइस्लर म्युझिअम (नॉरफॉक), ॲबी ॲल्ड्रिच रॉकफेलर फोक आर्ट सेंटर (विल्यम्सबर्ग), मरिनर्स म्युझिअम (न्यूपोर्ट न्यूज) ही उल्लेखनीय वस्तुसंग्रहालये आहेत. नॉरफॉक, रिचमंड व रोअनोक येथे सिंफनी वाद्यवृंद्ध आहेत. व्हर्जिनिया गॅझेट (१७३६) हे राज्यातील पहिले वृत्तपत्र आहे. राज्यातील पहिले व्यापारी रेडिओ प्रसारण केंद्र १९२३ मध्ये नॉरफॉक येथे, तर पहिले दूरचित्रवाणी केंद्र १९४८ मध्ये रिचमंड येथे सुरू झाले. एकोणिसाव्या शतकात समाजकल्याण सेवा पुरविण्याबाबत व्हर्जिनिया अग्रेसर होते.

पर्यटन : व्हर्जिनिया राज्यात अनेक नैसर्गिक नवलाईची, रमणीय व प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटन –व्यवसाय विकसित झाला आहे. युद्धभूमीची ठिकाणे, वसाहतकालीन, अमेरिकन क्रांतिकालीन व यादवी युद्धकालीन अनेक ऐतिहासिक वास्तू व स्थळे, प्रसिद्ध जुनी चर्च, थोर व्यक्तींची निवासस्थाने, राष्ट्रीय उद्याने, वने व स्मारके, पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशांतील निसर्गसुंदर विहारोद्याने, पूर्व किनार्या वरील सुंदर पुळणी, अनेक नद्या व उपसागराचे परिसर आणि विलोभनीय सृष्टिसौंदर्य यांमुळे पर्यटक फार मोठ्या संख्येने इकडे आकर्षिले जातात. बहुसंख्य ऐतिहासिक स्थळे जेम्सटाउन, विल्यम्सबर्ग व यॉर्कटाउन या शहरांदरम्यानच्या त्रिकोणाकृती भागात केंद्रित झालेली आहेत, एप्रिलमध्ये विंचेस्अर येथे भरणारा शेनँडोआ ॲपल ब्लॉसम फेस्टिव्हल व नॉरफॉक येथील इंटरनॅशनल अझेलिआ फेस्टिव्हल, रिचमंड येथे सप्टेंबरमध्ये भरणार स्टेट फेअर उत्सव, ऑक्टोबरमधील नॅशनल टोबॅको फेस्टिव्हल हे राज्यातील प्रसिद्ध उत्सव आहेत. एप्रिलमधील ‘हिस्टॉरिक गार्डन वीक’ या काळात राज्यातील शेकडो ऐतिहासिक वास्तू व बागा लोकांसाठी खुल्या ठेवल्या जातात. व्हर्जिनिया बीच (लोकसंख्या ३,९३,०६९ – १९९०), नॉरफॉक (२,६१,२२९), रिचमंड (२,०3,०56), न्यूपोर्ट न्यूज (१,७०,०४५), चेसापीक (१,५१,९७६), हॅम्टन (१,३३,७९३), अलेक्झांड्रिया (१,११,१८३), पोर्टस्मथ (१,०३,९०७) ही राज्यातील प्रमुख शहरे आहेत.

चौधरी, वसंत