कॅलगुर्ली : ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागातील जिल्ह्याचे आणि तांबे, सोने व लिग्‍नाइट यांच्या खाणींचे केंद्र. लोकसंख्या शेजारच्या बोल्डर या खाणकेंद्रासह २०,८६५ (१९७१).हे पर्थच्या पूर्व ईशान्येस ५३३ किमी. आणि कूलगार्डी खाणकेंद्रापासून ३८ किमी. आहे. हे सडकेने, लो हमार्गाने व हवाई मार्गाने ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. ह्या भागात १८८७ -८८ मध्ये प्रथम सोन्याचा शोध लागला. कॅलगुर्लीचे हवामान रुक्ष व वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५ सेंमी. आहे. कॅलगुर्लीच्या ५६० किमी. पश्चिमेकडील मंडारिंग शहराजवळ, हेलेना नदीवर बांधलेल्या धरणातून कॅलगुर्लीला व आसमंतास पाणी मिळते. येथे अँग्‍लिकन बिशपचे मुख्य केंद्र, दवाखाना, महाविद्यालय, सरकारी शाळा आणि खाण-शाळा आहे. १९६६ मध्ये येथे निकेलही सापडले आहे.

गंद्रे, वि. रा.