सिनसिनॅटी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ओहायवो राज्यातील एक प्रसिद्घ औद्योगिक शहर. लोकसंख्या २,९६,२२३ (२०११ अंदाजे). ते राज्याच्या नैर्ऋत्य भागात हॅमिल्टन कौंटीमध्ये ओहायओ नदीकिनाऱ्यावर लिटल मिआमी आणि ग्रेट मिआमी या तिच्या उपनद्यांच्या संगमाजवळ इंडियाना राज्याच्या पूर्व सीमेपासून २४ किमी. वर वसले आहे. त्याच्या सभोवती १२०— १८० मी. उंचीच्या टेकड्या आहेत. येथे लिटल मिआमीच्या मुखापाशी बेंजामिन स्टाईट्स याने १७८८ मध्ये पहिली वसाहत केली. अन्य दोन वसाहतींसह सिनसिनॅटी हे या प्रदेशाचे मुख्यालय करण्यात आले (१७९०). पुढे १७९४ मध्ये अमेरिकन जनरल अँथनी वेन याने इंडियनांवर विजय मिळविल्याने वसाहतकऱ्यांचा अडथळा दूर झाला. १८०२ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला. ते नदीबंदर म्हणून विकसित झाले (१८११). लवकरच त्याला ओहायओमधील मोठी वसाहत म्हणून दर्जा प्राप्त झाला (१८१९). मिआमी–ईअरी कालवा झाल्यानंतर (१८३२) व्यापारी दृष्ट्या शहराचा विकास झाला. लिटल मिआमी रेल्वे मार्ग तयार करण्यात आला (१८४३). द्राक्ष बागायतीची वाढ होऊन वाइन व जहाजबांधणी उद्योगांना चालना मिळाली, तसेच वराहपालन (पोर्क पार्किंग) व्यवसाय वाढला. त्यामुळे या शहरास ‘पोर्कोपलिस’ असेही संबोधू लागले.

चार्ल्स डिकिन्झ, हेन्री वॉड्सवर्थ लाँगफेलो आदी साहित्यिकांना येथील निसर्गरम्य सौंदर्याने भुरळ घातली. त्यांनी सिनसिनॅटीचा उल्लेख ‘क्विन सिटी’, ‘क्विन ऑफ द वेस्ट’ या नावांनी केला. यादवी युद्घात दक्षिणेशी संबंध असूनही सिनसिनॅटी उत्तरेकडील राज्यांत सामील झाले. विसाव्या शतकात शहराचा सर्वांगीण विकास झाला. तेथील उत्पादनांत भिन्नता आढळते. वाहतुकीची साधने, अन्नप्रक्रिया, साबण, रसायने, यंत्रसामग्री, औषधे, धातूंच्या वस्तू, वस्त्रोद्योग, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने, छपाईची सामग्री व उपकरणे इ. उत्पादन-निर्मितीचे कारखाने शहरात आहेत. याशिवाय विद्युत् उपकरणे, जेट एंजिने, मद्यार्क, मांस डबाबंदीकरण इत्यादींचे कारखाने आहेत.

सिनसिनॅटी हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील एक समृद्घ सांस्कृतिक केंद्र असून तिथे सिम्फनी ऑर्केस्ट्रा, संगीतिका, बॅले नृत्याच्या संस्था, वस्तुसंग्रहालये निसर्गेतिहास व चित्रकला संग्रहालय असून शहरातील प्राणिसंग्रहालय, व वनस्पतिउद्यान विशेष क्षेत्रात आहे. प्राणिसंग्रहालय (१८७५) ३४ हेक्टर विस्तृत क्षेत्रात पसरलेले असून त्यात १,७०० जाती-प्रजाती आहेत. बंगाली वाघ, आशियाई हत्ती, कोमोडो ड्रॅगन, काळा गेंडा, गोरिला वगैरे काही यांतील लक्षणीय प्राणी होत.

शहरात सिनसिनॅटी विद्यापीठासह (१८१९) सिनसिनॅटी स्टेट टेक्निकल अँड कम्युनिटी कॉलेज (१९६९), युनियन इन्स्टिट्यूट, रोमन कॅथलिक इन्स्टिट्यूट, झेव्हियर युनिव्हर्सिटी (१८३१), हिब्रू युनियन कॉलेज (१८७५), सिनसिनॅटी बायबल कॉलेज अँड सेमिनरी (१९२४), द आर्ट ॲकॅडेमी ऑफ सिनसिनॅटी (१८६४) वगैरे जुन्या-नव्या शैक्षणिक संस्था आहेत. येथील हॅरिएट बिचर स्टोवे हाउस आणि टायलर डेव्हिडसन फौंटन (१८७१) ही वास्तुशिल्पे विलक्षण आकर्षक आहेत. शहराच्या उत्तरेस किंग्ज आयलंड भागात मनोरंजन उद्यान तसेच भव्य क्रीडांगण (पॉल ब्रॉउन स्टेडियम), ग्रेट अमेरिकन बॉल पार्क वगैरे प्रेक्षणीय स्थळे आढळतात.

सोसे, आतिश सुरेश