टॅगनरॉग : रशियाच्या रॉस्टॉव्ह विभागातील औद्योगिक शहर. लोकसंख्या २,६५,००० (१९७२ अंदाज). हे अ‌ॅझॉव्ह समुद्राच्या टॅगनरॉग आखातावरील बंदर. रॉस्टॉव्हच्या पश्चिमेस ७२ किमी. असून येथे जहाजावर धान्य चढविणे, पोलाद, पोलादी पत्रे व नळ्या, कातडी सामान, बॉयलर, कापणी-मळणी यंत्रे, जहाजदुरुस्ती, मासेमारी इ. व्यवसाय चालतात. हे रशियाने तुर्कांकडून १७६९ मध्ये घेतले व तेथे नाविक तळ केला. प्रसिद्ध नाटककार अंतॉन चेकॉव्हचे हे जन्मस्थान असून त्याचे घर संग्रहालय म्हणून राखले आहे. चेकॉव्ह नाट्यगृह व उच्च शिक्षणाच्या दोन संस्था येथे आहेत.

लिमये, दि. ह.