फूनाफूती : मध्य पॅसिफिक महासागरातील विद्यमान टूव्हालू (पूर्वीची एलिस) या स्वतंत्र बेटांच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १,३०० (१९७६ अंदाज). ⇨ गिल्बर्ट आणि एलिस बेटे ही ब्रिटिशांची पॅसिफिकमधील द्वीपवसाहत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने या वसाहतीवर हल्ला करून गिल्बर्ट बेटे ताब्यात घेतली. तेव्हा काही काळापुरती ब्रिटिशांनी गिल्बर्ट बेटांवरील फूनाफूती येथून राजधानी हलविली. ऑक्टोबर १९७५ मध्ये गिल्बर्ट व एलिस बेटे एकमेकांपासून विभक्त होऊन गिल्बर्ट बेटे ‘किरिबाती’ या नावाने स्वतंत्र झाली (१९७९). एलिस बेटांचे ‘टूव्हालू’ असे नामकरण करण्यात आले. १ ऑक्टोबर १९७८ रोजी ही बेटे स्वतंत्र होऊन फूनाफूती ही त्यांची राजधानी झाली. टूव्हालू द्वीपसमूहातील फूनाफूती हे हवाई व जल वाहतुकीचे एकमेव केंद्र आहे. येथील रूग्णालयात (स्था. १९७५) ३६ खाटांची सोय करण्यात आली (१९७६).

चौधरी, वसंत