आनर्त: उत्तर काठेवाड व उत्तर गुजरात मिळून बनलेला पौराणिक देश. महाभारतकाली द्वारका या वैकल्पिक नावानेही हा प्रसिद्ध होता. वैवस्वत मनूचा पौत्र आनर्त याच्या नावावरून आनर्त हे नाव याला मिळाले असावे, असे हरिवंशात म्हटले असून मेदिनीकोशात आनर्तचा अर्थ नृत्यशाळा असा दिला आहे. शाल्वाच्या आक्रमणाच्या वेळी श्रीकृष्णाने सैनिकांच्या मनोरंजनाकरिता आनर्त देशातील नट, गायक व नर्तक पाठविले होते. रैवतक पर्वतावर श्रीकृष्णाने येथील कलावंतांच्या नृत्यगायनाच्या कार्यक्रमाद्वारे अर्जुनाचे स्वागत केले होते. भद्र नावाचा नाट्यमहर्षी या देशातील वज्रपुरचा रहिवासी होता. पौराणिक काळात द्वारकेच्या परिसरातील प्रदेश म्हणजेच आनर्त असून त्याची राजधानी द्वारका होती मध्ययुगात आनर्तच्या सीमा दक्षिणेस महीनदी, उत्तरेस अबूचा पहाड व पूर्वेस माळव्यापर्यंत भिडल्या होत्या.

जोशी, चंद्रहास