अजिंठा :  महाराष्ट्रातील प्राचीन शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. अजिंठा हा गाव लेण्यांजवळ ६ किमी. च्या आत डोंगरमाथ्यावर असल्यामुळे इंग्रज लेखकांच्या लेखांत यांचा उल्लेख ‘अजिंठ्याची लेणी’ असा असला, तरी तेथील स्थानिक लोक त्यांचा उल्लेख ‘फर्दापूरची लेणी’ असाच करतात. औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०८ किमी. वर व फर्दापूर या गावापासून दक्षिणेस सु. पाच किमी. वर सह्याद्री पर्वताच्या सातमाळ रांगेतील इंध्याद्री शाखेत ही लेणी खोदलेली आहेत. ह्यांचा शोध १८१८ मध्ये आकस्मिकपणे लागला असला, तरी निश्चितपणे १८१९ च्या एप्रिल महिन्यात स्मिथ ह्या अधिकाऱ्याला ठाऊक झाली असे दहाव्या लेण्यातील लेखावरून आता स्पष्ट झाले आहे. येथील चित्रशैलीचा प्रभाव नंतरच्या भारतातील व भारताबाहेरील चित्रकलेवरही पडलेला दिसून येतो. यावरून येथील कला प्रेरणाशील होती व अद्यापही आहे हेनिर्विवाद आहे.

येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) आहेत. त्यांतील ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे असून बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० चैत्य आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हे हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ.स.पू. २ रे शतक ते इ.स. २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते, की ती  ⇨वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकीर्दीत (सु. ४७५-५००) कोरली गेली असावीत. हीनयान पंथाच्या लेण्यांची स्थापत्यशैली आधीची वाटते. यांपैकी ९ व्या व १० व्या चैत्यगृहांच आलेख गजपृष्ठाकृती आहेत आणि मंडपाच्या चापाकार बाजूंत स्तूप कोरलेला आहे. या कालखंडातील विहारांत खांब नाहीत. फक्त यांत तिन्ही बाजूंना भिक्षूंना राहण्यासाठी खोल्या खोदलेल्या आहेत. या समूहातील लेण्यांत दहावे लेणे सर्वांत प्राचीन आहे. त्यात बुद्धप्रतिमा नाही. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी यूआन-च्वांग अजिंठ्यास जरी येऊन गेला नाही, तरी त्याने या लेण्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. एका विहारातील कोरलेल्या भव्य हत्तीचा उल्लेख करून तो अचल ह्या पश्चिम भारतातील भिक्षूने बांधला, असे त्याने नमूद करून ठेवले आहे. २६ व्या लेण्यांतील शिलालेख, हे शैलगृह आचार्य अचल ह्याचे आहे, असे सांगतो.

इतर शैलगृहांप्रमाणे अजिंठ्याची शैलगृहे त्यांतील वास्तुकलेसाठी आणि मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असली, तरी येथील लेणी मुख्यत्वे चित्रकलेकरिता प्रख्यात आहेत. चित्रे काढण्यासाठी भिंतींवर प्रथम माती, शेण, भाताचा भुस्सा किंवा ताग आणि तूस ह्यांच्या वस्त्रगाळ मिश्रणाचा गिलावा चढवीत आणि त्यावर चुन्याचा एक हलका हात मारून किंवा संदलाचा चकचकीत पातळ थर चढवून त्यावर गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात क्रमाक्रमाने रंग भरीत. अजिंठ्याच्या चित्रकारांनी मुख्यतः पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, तांबडा आणि निळा हे रंग आपल्या चित्रकलेत वापरले आहेत. यांपैकी पुष्कळसे रंग नैसर्गिक पदार्थांपासून केलेले आहेत व अशी मूलरंगद्रव्ये अजिंठ्याजवळच सापडतात. लाखेपासून केलेल्या कार्बनी तांबड्या रंगासारखे काही उडणारे रंगही वापरले असावेत कारण काही चित्रांतील मानवी आकृतींच्या ओठांवरील लाल रंग नाहीसा झालेला दिसतो. फक्त निळा रंग (लाजवर्दी) तेवढा आयात केलेला असावा. सरसाचा रंगबंधक म्हणून बहुधा वापर केलेला असावा. भित्तिचित्रांशिवाय मूर्तिकामही रंगविलेले असावे. कारण अशा कामाचे अवशेष आजही आढळतात.

चित्रप्रसंग बव्हंशी जातकादी ग्रंथांतील बुद्धाच्या कथांतून निवडलेले आहेत. याशिवाय बौद्ध धर्मग्रंथांतून वर्णिलेल्या काही देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा आणि निरनिराळे प्राणी यांचीही चित्रे आहेत. छतांवर आणि स्तंभांवर वेलबुट्टीचे अप्रतिम नमुने चितारलेले आढळून येतात. अजिंठ्याच्या स्त्रियांच्या चित्राकृती अगदी अपूर्व आहेत. गौरवर्णा आणि श्यामा, मुग्धा, अर्धस्फुटिता, प्रौढा आणि कुमारिका, सुस्तनी आणि पृथुल नितंबिनी अशा, आभूषणे धारण करणाऱ्‍या, विविध स्त्रिया चित्रकारांनी इथे मूर्त केल्या आहेत. काही लेणी अपूर्ण आहेत व काही पडझड झाल्यामुळे खराब झाली आहेत. सुस्थितीत असलेली लेण्यांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत :

क्रमांक १: याचा आलेख चतुष्कोनी असून गर्भगृहात बुद्धाची प्रतिमा कोरलेली आहे. ओवरीच्या स्तंभावर अप्रतिम नक्षीकाम आहे. मंडपाच्या तिन्ही बाजूंस भिक्षूंकरिता खोल्या खोदलेल्या असून मंडपाच्या भिंतींवर चित्रे आहेत. ही चित्रे जातकादी कथांतील असून त्यांतील पद्मपाणीचे चित्र प्राचीन भारतीय चित्रकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना समजले जाते. येथील श्यामल वर्णाची राजकन्या आणि अप्सराही आकर्षक आहे. दुसऱ्‍या एका लहान चित्रात एक इराणी व्यक्ती सुरापान करीत असल्याचे दर्शविले असून काही विद्वानांच्या मते ती व्यक्ती इराणचा राजा दुसरा खुश्रु आणि त्याच्या शेजारी बसलेली स्त्री ही त्याची राणी शिरीन असावी. मात्र हे मत सर्वमान्य नाही. आणखी एका चित्रात दरबारातील दृश्य असून त्यात राजा काही परकीयांचे स्वागत करीत आहे, असे दृश्य आहे. हा राजा चालुक्य नृपती दुसरा पुलकेशी असावा व तो दुसऱ्‍या खुश्रूच्या दूतवासींचे स्वागत करीत आहे, असे काही विद्वानांचे मत आहे. तथापि तेही मत सर्वमान्य नाही. ह्या लेण्यातील गर्भगृहातील बुद्धाचे एक शिल्प वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात बुद्धाचे स्मित, विषाद आणि ध्यान असे तीन स्पष्ट भाव विभिन्न कोनांतून पाहिले असता दिसतात. ह्याशिवाय लेण्याच्या मागील बाजूस असणाऱ्‍या पडवीच्या स्तंभावर एक मुख व चार धडे असणाऱ्‍या हरिणाचे चमत्कृतिपूर्ण शिल्प आहे.

क्रमांक २:ह्याची रचना क्रमांक १ सारखीच आहे. परंतु ह्याच्या अंतराळाच्या दोन्ही बाजूंस लहान मंदिरे आहेत. त्यातील एकात बुद्धाची भव्य मूर्ती आणि दुसऱ्‍यात दोन यक्षांच्या भव्य मूर्ती आहेत. बुद्धाची मूर्ती असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या भिंतीवर बुद्धाच्या शेकडो प्रतिमा असून शेजारच्या स्तंभांची स्तंभशीषे कमळाकृती आहेत. सभागृहाच्या छतांवर एक मोठे वर्तुळ असून त्याच्या सभोवती चार किन्नरांच्या सुंदर आकृत्या आहेत. वर्तुळात फुलांचे अलंकृत रचनाबंध असून इतर अनेक भौमितिक आकृत्या आढळतात. येथील सर्व स्तंभ नक्षीदार आहेत. ह्या लेण्यात मुख्यत्वेहंसजातक,विधुरपंडितजातक इत्यादींतील प्रसंग असून अर्हत, किन्नर ह्यांच्या चित्राकृती आहेत. याशिवाय नागराजा, त्याचे गण, तसेच हत्ती, घोडे आदी प्राणी दाखविले आहेत. ह्या लेण्यात काही महत्त्वाचे शिलालेख आहेत.

क्रमांक४:सर्व विहारांत हा विहार मोठा आहे. त्याला अठ्ठावीस खांब आहेत. व्हरांड्याला आठ अष्टकोनी स्तंभ असून सर्वांवर नक्षीकाम केले आहे. मधले दार नक्षीयुक्त असून चौकटीवर असंख्य मिथुन-आकृत्या आहेत. त्यांच्याजवळचे बुद्धाच्या शांतिपाठाचे कोरीव काम लक्षवेधक आहे.

क्रमांक ६:हे एकच दोनमजली लेणे आहे. ह्यातील वास्तूंची बरीच नासधूस झाली आहे. वरच्या मजल्यातील द्वारावरील चित्रे प्रेक्षणीय आहेत. येथील काही खांब नादवाही आहेत.

क्रमांक७:हे विलक्षण विहार लेणे असून ह्यात सभागृह नाही. व्हरांड्याची सुरवात दोन कमानींनी झाली असून त्याचे खांब घारापुरीतील खांबांसारखे आहेत. त्यांवर कोरीव काम आहे. त्यांत बुद्धाचे एक पद्मासन घातलेले व आशीर्वादासाठी उजवा हात वर केलेले शिल्प आहे. आतील खोलीच्या डाव्या भिंतीवर बुद्धाच्या निरनिराळ्या अवस्थांतील असंख्य आकृत्या कोरलेल्या आहेत.

क्रमांक ९:हा चैत्य इ.स.पू. पहिल्या शतकातील आहे. मंडपाची मागील बाजू अर्धवर्तुलाकृती असून त्या भागात स्तूप कोरलेला आहे. चैत्याच्या दर्शनी भागाच्या दोन्ही बाजूंस भिंतींवर वरदहस्त मुद्रायुक्त बुद्धाच्या दोन भव्य मूर्ती आहेत आणि चैत्याच्या डाव्या खिडकीशेजारी वरदहस्त बुद्धाच्या उभ्या दोन मूर्ती आहेत.

चैत्यगृहास एकूण २१ दगडी स्तंभ असून ते अष्टकोनी व अनलंकृत आहेत. स्तंभांवर बुद्धाच्या आकृत्या चितारलेल्या आहेत. चैत्यगृहात अनेक चित्रे काढलेली दिसतात. स्तूपावर बहुतकरून पूर्वी लाकडी छत्री असावी, असे तेथील छत्रीच्या खोबणीच्या खुणेवरून वाटते. सर्व लेण्यात चित्रांचे दोन थर असून वरच्या थरातील चित्रे सहाव्या शतकातील आहेत. मात्र खालच्या थरातील चित्रे पहिल्या शतकातील असावीत.

क्रमांक १०:हे लेणे इ.स.पू. दुसऱ्‍या शतकातील आहे. हे अंजिठ्यातील सर्वांत प्राचीन लेणे असून ह्याचा विस्तार क्र.९ पेक्षा थोडा मोठा आहे. त्याच्या छतावर पूर्वी लाकडी तुळ्या व पटई होती. ह्याचा दर्शनी भाग (घरमुख) मोठ्या चैत्यगवाक्षामुळे प्रेक्षणीय वाटतो. तेथील अवशिष्ट लेखानुसार तो भाग (घरमुख) करहाटक (कराड) येथील वसिष्ठ पुत्राचे इ.स.पू. दुसऱ्‍या शतकातील दान असावे. यातही चित्रांचे दोन थर असून त्यांतील खालच्या थरात राजाराणी बोधिवृक्षाच्या पूजेस लवाजम्यासह जात असल्याचा प्रसंग चितारलेला आहे. येथे चितारलेल्या वेशभूषा सांची स्तूपाच्या दक्षिण द्वारावरील वेशभूषेसारख्या वाटतात. त्याशिवाय छद्दंत-जातकातील निर्दिष्ट आदिवासी नागांचीही चित्रे सुंदर आहेत.

क्रमांक १६: स्थापत्य, शिल्प आणि चित्रकला यांचे उत्कृष्ट नमुने ह्या लेण्यात पहावयास मिळतात. या लेण्यातील अवशिष्ट लेखात, हे लेणे वाकाटक नृपती हरिषेण (सु. ४७५–५००) याचा मंत्री वराहदेव ह्याने शिल्प व चित्रांनी सुशोभित करून बौद्ध भिक्षूंना दान केले, असा मजकूर आहे.

यालेण्यात बुद्धाची प्रलंबपाद आसनातील भव्य मूर्ती असून येथील चित्रांतील ग्लानी येऊन मूर्च्छित झालेल्या सुंदरीचे चित्र अप्रतिम समजले जाते. याशिवाय येथेहस्तिजातक, महा-उम्मगजातकादीकथांतील प्रसंग चित्रित केलेले असून तीरशिल्पाकृत्यांत अवकाशगामी अप्सरा दाखविलेल्या आहेत. त्यांच्या गळ्यातील अलंकार, अंगठ्या, बांगड्या व केशरचनेचे प्रकार ह्यांतून तत्कालीन सौंदर्यप्रसाधनाची कल्पना येते.

क्रमांक १७:हे लेणे ऋषिक राजाने आपल्या भावाच्या स्मरणार्थ खोदले असावे, असे एक मत आहे. ते प्रामुख्याने बौद्ध भिक्षूंसाठी निवासस्थान म्हणून खोदले. वाकाटक हरिषेणाच्या एका मांडलिकाने ते दान केल्याची माहिती या लेण्यातील लेख सांगतो. या लेण्यातील चित्रांत मुख्यत्वे जातककथांपैकी मानवी सद्‌गुणांच्या कथांतील चित्रे चितारली आहेत. व्हरांड्याच्या छतांवर पुष्पालंकाररचना चित्रित केलेल्या असून व्हरांड्याच्या मागील बाजूच्या डाव्या भिंतीवरविश्वंतर जातकातील कथा चितारलेली आहे. त्यात विश्वंतर भिक्षा देत असून अनेक ब्राह्मण ती गोळा करण्यासाठी जमलेले दिसतात. पडवीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या भिंतीवर छद्दंत-जातककथेतील चित्रे असून त्यात कोचावरील राणी, तिच्या दासदासी, शेजारच्या चित्रातील प्रशांत सरोवर, सहा दातांचा हत्ती व त्याच्या पाठीवरील लांडगा ह्यांचे चित्र आहे. यात आणखीमहाकपी, हंस, विश्वंतर, सुत्तसोमआदी जातककथांतील चित्रे चितारलेली आहेत. बुद्धाचे महाबोधिप्राप्तीनंतरचे चित्र असून त्यात शांत, तेजस्वी बुद्ध हातात भिक्षापात्र घेऊन उभा आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी त्याची पत्नी यशोधरा व मुलगा राहुल पुढे सरसावले आहेत, असे चित्र आहे. ह्याशिवाय येथील प्रसाधनाचे चित्र अप्रतिम असून त्यातील दांपत्यांचा पेहराव व अंलकार यांवरून तत्कालीन संस्कृतीसंबंधी खूपच माहिती मिळते.

क्रमांक १९:हा पाचव्या शतकातील चैत्य कोरीव कामाने भरलेला आहे. त्यात दोन लहान मंदिरे आहेत. ह्या चैत्याचा दर्शनी भाग मोठा असावा, पण तो पडलेला आहे. उजव्या बाजूच्या गर्भगृहात वर्तुळाकार स्तंभ असून त्यावर फिरत्या खोबणी खोदल्या आहेत आणि स्तंभशीर्षे चौकोनी असून त्यांवर पुष्पालंकृत रचना व फळांचे शिल्पपट्ट आहेत. मंदिराच्या मागील भिंतीवर प्रलंबपाद आसनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची एक मूर्ती आहे. तो कमळात आपले पाय ठेवून विश्रांती घेत आहे, असे दृश्य चित्रित केले आहे. चैत्यगवाक्ष कोरलेले आहे. गवाक्षाच्या दोन्ही बाजूंस यक्षमूर्ती असून चैत्यगृहाच्या भिंतीवर बुद्धप्रतिमा रंगविल्या आहेत अनेक मिथुन-आकृत्याही तेथे आढळतात. क्रमांक १७ प्रमाणेच येथे बुद्ध, यशोधरा आणि राहुल ह्यांची चित्रे आहेत. त्याच्या उजवीकडे बुद्धाचे भिक्षाध्यान, नागराजाची मूर्ती, नागराज व राणीची मूर्ती उच्च शिल्पकलेची निदर्शक आहे. येथील स्तूप चिनी पॅगोडाप्रमाणे आहे. स्तूपाच्या खालच्या भागावर विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. समोर बुद्धाची उभी, अभयमुद्रादर्शक मूर्ती असून ती तोरणामध्ये खोदलेली आहे. स्तूपाचा आकार अर्धअंडाकृती आहे.

क्रमांक २०:हा पाचव्या शतकातील विहार आहे. मुख्य सभागृहाच्या प्रवेशद्वारावरील तोरण नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस गवाक्षे आहेत. उजवीकडील गवाक्षावर बुद्धाची प्रतिमा आहे. सभागृहाच्या छतावर पुष्पालंकृत रचना व भौमितिक आकृत्या आहेत. सभागृहातबुद्धाची धर्मचक्रमुद्रेतील आकृती असून त्याखाली दोन हरणांच्या आकृत्या व धर्मचक्र दिसते.

अजिंठ्यातील वेलबुट्या

क्रमांक २१ : हा सहाव्या शतकातील विहार असून ह्यातील व्हरांडा जमीनदोस्त झाला आहे. मंदिराच्या शीर्षपादातील पटांमध्ये नागराजा,राणी आणि त्यांचे सेवक ह्यांच्या आकृत्या काढलेल्या आहेत. शिल्पपट्टातील मोत्यांच्या माळा अप्रतिम असून सातव्या शतकातील अलंकारांच्या त्या निदर्शक आहेत. स्तंभशीर्षांवर राजा राणी, उडत्या आकृत्या, स्तूप आणि पुजारी कोरलेले दिसतात.

क्रमांक २६ : ह्या चैतन्यगृहाची रचना क्र. १९ प्रमाणेच आहे. ह्याचा दर्शनी भाग मोठा होता, तथापि तो पडलेला आहे. स्तूपावर कोरीव बुद्धमूर्ती आणि भिंतीवर बुद्धजीवनातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. मारविजय आणि बुद्धनिर्वाण ही ह्या लेण्यातील शिल्पे उदात्त कलेची साक्ष पटवितात. बुद्धाला महानिर्वाण प्राप्त झाल्याचे दाखवून बुद्धाच्या आडव्या पसरलेल्या प्रचंड मूर्तीच्या वरच्या बाजूस मृदंगादी वाद्ये वाजत आहेत असे दृश्य कोरले आहे. बुद्धमूर्ती रेखीव नसली, तरी भव्य आहे. ह्याच लेण्याच्या दर्शनी भागावर अश्मकराजाचा मंत्री भव्वीराज याने हे बुद्धमंदिर बुद्धभद्रभिक्षूस दान केल्याचा लेख आहे. अक्षरवटिकेनुसार या लेखांचा काल ५-६ वे शतक असावा.

क्रमांक ३० : हे दुसऱ्‍या शतकातील हीनयान पंथाचे लेणे असावे. येथील एक शपथस्तूप हे अपोत्थित शिल्पकाम आहे. तसेच येथे प्रारंभीच्या अक्षरवटिकेत लिहिलेला एक शिलालेख सापडला असून अद्यापि त्यातील मजकूर ज्ञात झालेला नाही. ही गुही अत्यंत साधी असून तिचे सभागृह लहान आहे. सभागृहाच्या डाव्या बाजूस तीन लहान पडव्या असून पुढच्या उजव्या बाजूच्या भिंतीस लागून दोन दगडी बिछाने आहेत. पडवीच्या दारांवर व गवाक्षाच्या वरच्या भागावर काही किरकोळ नक्षीकाम केलेले आहे.

अजिंठ्याच्या लेण्यांतील बरीचशी चित्रकला आज आपणापुढे नाही. क्रमांक १, २, १६, १७ व अगदी थोड्या प्रमाणात क्रमांक १९ याच लेण्यांतील चित्रकला अद्यापि बव्हंशी अबाधित राहिली आहे. येथील चित्रप्रसंग जरी बुद्धजीवनावर आधारित असले, तरी त्या सर्वांतून तत्कालीन समाजजीवनाच्या विविध अंगांवर प्रकाश पडतो. अजिंठ्याच्या चित्रांचा एक विशेष म्हणजे, त्यांतील विविधता इतकी विपुल आहे, की तिच्यातून अपवादादाखल एखाद-दुसराच भाव आणि पेहराव निसटला असेल. तत्कालीन वास्तू, वेशभूषा, अलंकार, खेळ, मनोरंजनाची साधने, वाद्ये, आयुधे, फर्निचर आणि पात्रे ह्यांच्या विविधतेवरून समाजजीवन सुखी आणि समृद्ध होते, याबद्दल शंका रहात नाही. गुप्त—वाकाटक काळातील सुवर्णयुगाची साक्ष यावरून पटते. चित्रांप्रमाणेच शिल्पेही विविध तशीच भावपूर्ण आहेत. बुद्धाचे परिनिर्वाण, नागदंपतीचे शिल्प, मकरमुखे, शालभञ्जिका आणि मिथुने यांबरोबर सुबक नक्षीकामही रसिकतापूर्ण शिल्पकला दर्शविते. अजिंठ्याच्या चित्रांनी चित्रकलेच्या इतिहासात अढळपद मिळविले आहे.

भारतीय पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत असलेली अजिंठ्याची शिल्पे आणि चित्रकला सुरक्षेचे महत्त्‍वाचे प्रश्न उभे करीत आहे. त्रुटित स्तंभांची पुन्हा डागडुजी करणे, निखळलेले भाग पुन्हा जसेच्या तसे उभे करणे, खडकाच्या चिरांतून दाबाने सिमेंट भरणे, ठिसूळ झालेला खडकाचा भाग दूर करणे वा त्यास बळकटी आणणे, जुन्या पायऱ्‍यांची निगा राखणे व झिरपणारे पाणी बंद करून त्यासाठी पन्हाळ्या करणे इ. गोष्टी वारंवार व अचूकपणे कराव्या लागतात. याशिवाय भित्तिचित्रांचे जतन हा एक नाजूक व जबाबदारीचा प्रश्न आहे. काही काळापूर्वी सर्व चित्रांवर, त्यांचे योग्य जतन होईल या भावनेने एक जाड व्हार्निशचा थर देण्यात आला होता मात्र त्यामुळे चित्रांचे जतन न होता, काही कालांतरानंतर ही सर्व चित्रे अत्यंत अंधूक झाली. यावरून धडा घेऊन भारत सरकारने तज्ञांच्या शिफारशींनुसार हे थर रासायनिक प्रक्रियेने दूर करून बरीचशी भित्तिचित्रे सुस्पष्ट करण्यात यश मिळविले आहे. या चित्रांचे संरक्षण आजमितीस अत्याधुनिक पद्धतीने आणि साधनांनी करण्यासाठी वेगळी खास यंत्रणा आहे. (चित्रपट १३-१६)

संदर्भ: 1. Dhawalikar, M. K. Life in the Deccan as Depicted in the Ajanta Paintings,Poona, 1964.

2. Ghosh, A., Ed.Ajanta Murals,New Delhi, 1967.

3. Gupte, R,S. Mahajan, B. D.Ajanta, ellora and Aurangabad Caves,Bombay, 1962.

4. Yazdani, G.Ajanta, 4 Vols.,Oxford, 1930-35.

५. माटे, म. श्री.मराठवाड्यातील शिल्पवैभव,मुंबई, १९६४.

देव, शां. भा. ढवळीकर, म. के.