पिट-रिव्हर्स, ऑगस्टस हेन्‍री : (१४ एप्रिल १८२७-४ मे १९००). ग्रेट ब्रिटनचा (इंग्‍लंडचा) अक श्रेष्ट पुरातत्वज्ञ व ब्रिटिश पुरातत्वविद्येचा जनक, त्याचा जन्म होप हॉल (यॉर्कशर) येथे सधन घराण्यात झाला. त्याचे मूळचे आडनाव लेनफॉक्स पण लॉर्ड रिव्हर्स या आपल्या काकांच्या संपत्तीचा वारसाहक्क प्राप्त झाल्यानंतर त्याने १८८० मध्ये पिट-रिव्हर्स हे आडनाव धारण केले. लहानपणापासून त्याचा कल लष्करी शिक्षणाकडे होता. त्याला अनुसरून त्याने लष्करात कमिशन मिळविले. क्रिमियन युद्धातही तो सहभागी झाला आणि लष्कारातील लेफ्टनंट जनरलच्या हुद्यापर्यंत त्याने मजल मारली. या पदावर असताना १८८२ मध्ये तो लष्करी नोकरीतून निवृत्त झाला व उर्वरित आयुष्य त्याने पुरातत्वीय अभ्यास व संशोधन यांत व्यतीत केले. तत्पूर्वी लष्करात असतानाच त्यास उत्खनन-संशोधनाचा छंद जडला होता.

सुरूवातीस त्याने उत्खननासाठी ‘क्रॅनबॉर्न चेज’ (विल्टशर) ही आपल्या मालकीची जमीन निवडली कारण या प्रदेशात प्राचीन काळी अनेक घडामोडी झाल्या होत्या. याशिवाय त्याने वुडकट्‌स, रोधरली, साउथ लॉज, बोकरली डाइक, वॅनन्स डाइक वगैरे विविध रोमॅनो-ब्रिटिश खेडेवजा वस्त्या उत्खनित केल्या आणि अनेक विभिन्न अवशेष उजेडात आणले. यांत अनेक रोमन वास्तू व वस्तू प्रथमच उपलब्ध झाल्या. हे सर्व अवशेष त्याने संगतवार जुळविले आणि आवश्यक त्या स्पष्टिकरणांसह प्रकाशितही केले. त्याने जमविलेला हा संग्रह ऑक्सफर्ड विद्यापीठातील वस्तुसंग्रहालयात पिट-रिव्हर्स नावाच्या स्वतंत्र दालनात जतन करण्यात आला आहे. त्याच्या उत्खननांतील या विस्तृत संशोधनात्मक कार्यामुळे ब्रिटिश संसदेने ‘इन्पेक्टर ऑफ एंशन्ट मॉन्यूमेन्ट्‌स’ या नव्याने निर्माण केलेल्या पदावर नेमणूक करून त्याचा गौरव केला.याशिवाय ‘रॉयल सोसायटीचा अधिछात्र’ अँथ्रपॉलॉजिकल इस्टिट्यूटचा अध्यक्ष वगैरे मानाची पदे त्याला लाभली.

त्याने आपले विविध उत्खनांतील संशोधन, तसेच इतिहास, युद्धपद्धती, मानवशास्त्र वगैरे विषयांवरील विचार ग्रंथांद्वारे प्रसिद्ध केले.त्या ग्रंथांपैकी प्रिमिटिव्ह वॉरफेअर (१८६९), लॉक्स अंड कीज (१८८३), किंग जॉनन्स हाउस : टोलार्ड रॉयल (१८९०), वर्क्स ऑफ फ्रॉम बेनिन (१९००), एक्सकॅव्हेशन इन क्रॅनबॉर्न चेज (५ खंड, १८८७-१९०३) वगैरे प्रसिद्ध असून अखेरच्या पुस्तकाने त्याला पुरातत्वसंशोधनाच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. हा ग्रंथ म्हणजे ‘इंग्‍लंडमधील पुरातत्वीय रोमॅनो-ब्रिटिश खेड्यांच्या उत्खननाचा बोलका इतिहासच म्हणावा लागेल’.

अचूक आलेखन, बारीकसारीक तपशिलांची नोंद, अवशेषांचे तौलनिक मूल्यमापन, तसेच पुरातत्वीय व मानवशास्त्रीय अवशेषांचे सुस्पष्ट वर्गीकरण हे त्याच्या उत्खननपद्धतीचे काही विशेष गुण असून शास्त्रशुद्ध व स्तरीकरणावर आधारित अशा उत्खननपद्धतीचा पाया त्याने इंग्‍लंडमध्ये घातला आणि तो अत्यंत काळजीपूर्वक व कार्यक्षम रीत्या कृतीत आणला. आतापर्यंतच्या उत्खननाची स्थळे ही ऐतिहासिक महत्त्वाची होती पण त्यांनी सामान्यांच्या निवासस्थानांची स्थळे निवडली. तो रशमोर (विल्टशर) या ठिकाणी मरण पावला.

संदर्भ : 1. Allen, T.M and Others, Pitt-Rivers Museum, Oxford, 1970.

   2. y3wuosup, Ronald, The Story of Archaeology in Britain, London, 1964.

देशपांडे, सु.र.