शैलखंडावरील रेखाचित्र प्राण्यांचे प्रणयदृश्य, लॅस्को.

लॅस्को : फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रांचे प्रसिद्ध स्थळ. माँतीन्यॅक गावाजवळ (दॉरदॉन्यू विभागात) व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसले आहे. येथील मूळ गुहांव्यतिरिक्त बाजूंनी खोल व्हरांडे (वीथी) आहेत. त्यांतूनही विपुल चित्रकाम आहे. या गुहांचा शोध विसाव्या शतकात अचानकपणे लागला. एका खेळकरी मुलाचे कुत्र्याचे पिलू त्यांपैकी एका गुहा-बिळात शिरले. त्याच्या पाठोपाठ गेलेल्या मुलाला ही गुहेतील भित्तिचित्रे आढळली (१९४०). या गुहेचे छत फार उंच नसून आतील रस्ते आणि द्वारे अरुंद आहेत. व्हेझर नदीचे खोरे प्राचीन अवशेषांसाठी, विशेषतः प्रागैतिहासिक वसतिस्थाने, गुहा आणि भित्तिचित्रे यांकरिता ख्यातनाम आहे. या गुहांचा उपयोग प्राचीन काळी आदिमानव शिकारीत यश प्राप्त व्हावे, म्हणून जादुटोण्यासाठी करीत असावा, असे तेथील प्राण्यांच्या शेजारी चितारलेला बाण व जाळी यांच्या नक्षीकामावरून तसेच इतरत्र क्वचित आढळणाऱ्या कथात्मक चित्रणावरून आढळून येते.

तांबड्या, तपकिरी, पिवळ्या आणि काळ्या रंगांत चितारलेली ही भित्तिचित्रे फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली असून रंगीत चित्रांव्यतिरिक्त उत्कीर्ण आणि रेखांकित चित्रेही कलात्मक आहेत. येथे उत्कीर्ण शिल्पे, चित्रकारी आणि रेखाटन आहे. सर्वत्र हरिण, सिंह, बारशिंगा, रानगवा आणि प्रचंड हत्ती यांची चित्रे असून हे प्राणी एकाच परिमाणात काढलेले आहेत. त्यांतील काळवीट, बैल, घोडे हे प्राणी वैशिष्ट्यपूर्ण असून काही सुटी चित्रे आहेत. त्यामुळे संयोजनाची कल्पना आढळत नाही. हरिणांचे कळप वास्तव व लालित्यपूर्ण असून उर्वरित चित्रकामात घोडे चपळ दाखविले आहेत, तर बैल सुस्त वाटतात. येथील कला अल्तामिरापेक्षा जास्त जिवंत, वास्तव व ललित्यपूर्ण आहे आणि ती त्याहून प्राचीनही आहे. ही चित्रे यूरोपातील उत्तराश्मयुगीन म्हणजे ऑरिग्नेशियन (पेरीगोर्डियन) काळातील असून चित्रशैली, जनावरांची जातकुळी आणि कार्बन १४ कालमापनपद्धती यांनुसार ती तज्ञांच्या मते कालदृष्ट्या इ. स. पू. १८,००० इतकी प्राचीन असावीत. गुहांचा शोध लागला तेव्हा ती सुस्थितीत होती. त्यामुळे ती प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली तेव्हा त्यांतील काही रंग फिकट होऊ लागले आणि काही चित्रांवर हिरवी बुरशी चढली. त्यामुळे ती १९६३ मध्ये प्रेक्षकांना बंद करण्यात आली.

पहा : आदिम कला प्रागैतिहासिक कला.

संदर्भ : 1. Bataille, Georges, prehistoric painting : Lascaulx or the Birth of Art, Lasunne, 1955.

           2. Breuill, H. four Hundred Centuries of Cave Art, London, 1952.

           3. Cottrell, Leonard, Ed. The Concise Encyclopaedia of Archaeology, London, 1960.

           4. Grigson, G. Painted Caves, London, 1957.

           5. Lommel. Andreas, Prehistoric and Primltive Man, London, 1966.

           6. Myron, Robert, Prehistoric Art, New York, 1964.

देव, शां. भा.