पेट्री, विल्यम मॅथ्यू फ्लिंडर्झ : (३ जून १८५३- २३ जुलै १९४२). ग्रेट ब्रिटनमधील एक प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ. त्याचा जन्म ग्रिनिचजवळ चार्लटन येथे झाला. प्रकृती बरी नसल्यामुळे त्याचे सर्व शिक्षण घरीच झाले. वयाच्या २२ व्या वर्षी त्याने इंडक्टिव्ह मिट्रालॉजी नावाचा जुन्या वजन-मापांचा माहिती देणारा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर त्याने इंग्लंडमधील ⇨स्टोनहेंजसारख्या प्राचीन अवशेषांची पहाणी केली व त्यावरील आपले विचार प्रसिद्ध केले शिवाय लंडनमध्ये काही व्याख्याने देऊन त्यांचा प्रचार केला. पुढे तो ईजिप्त व पॅलेस्टाइन या प्रदेशांत गेला. ईजिप्तमध्ये त्याने उत्खनन मोहीम हाती घेतली व मिळालेल्या पुराव्याच्या आधारे सुसंगत लेखन करून ते प्रसिद्ध केले. आपल्या संशोधनाने ईजिप्तचा इतिहास व संस्कृतिक्रम त्याने निश्चित केला. जवळजवळ शेहचाळीस वर्षे तो ईजिप्त व पॅलेस्टाइन या भागांत उत्खनन व संशोधन करीत होता. या काळात त्याने नाईल नदीचे खोरे, फायूम, टेल एल् अमार्ना, नकदा, थीब्झ, गीझा, आबायडॉस इ. प्राचीन स्थळांच्या परिसरात उत्खनन केले. उत्खननांत त्याने स्तरीय पद्धतीचा अवलंब करून संलग्न विज्ञानांच्या साहाय्याने उत्खनित पुराव्यांचा अभ्यास केला. प्राचीन मृत्पात्रांचा सांगोपांग अभ्यास करून त्यांची कालनिश्चिती केली. या तंत्रामुळे प्रत्येक पुरावस्तूची पूर्ण व अचूक नोंद त्याला करता आली आणि त्याचे साहाय्यकही या तंत्रात परिपूर्ण झाले.
ईजिप्तमधील संशोधनामुळे त्याची लंडन विद्यापीठातील युनिव्हर्सिटी महाविद्यालयात एडवर्ड्स प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८९२—१९३३). या काळात त्याने पुरातत्त्वविद्येचा अभ्यास व्हावा म्हणून ईजिप्शियन रिसर्च अकौंट्स ही संस्था काढली. तीच पुढे ब्रिटिश स्कूल ऑफ आर्किऑलॉजी या नावाने प्रसिद्धीस आली. त्याच्या कार्याचा गौरव त्यास नाइटहूड (सर) ही पदवी देऊन ब्रिटिश शासनाने केला (१९२३). अखेरपर्यंत त्याचे संशोधनकार्य चालू होते. जेरूसलेम येथे तो मरण पावला.
पेट्रीला आधुनिक पुरातत्त्वीय उत्खनन पद्धतीच्या क्षेत्रात एक वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. उत्खनन पद्धतीत त्याने क्रांतिकारक व अमूलाग्र बदल घडवून आणले. आणि आधुनिक तंत्रशुद्ध उत्खनन पद्धतीचा पाया घातला. त्यामुळे पुरातत्त्वीय संशोधनास शास्त्रीय बैठक प्राप्त झाली तथापि पुराभिलेखविद्या व मूळाक्षरांचा उद्गणम यांविषयीची त्याची मते अनेकांना पटली नाहीत. त्यांवर उलटसुलट टीकाही झाली. त्याने शेकडो संशोधनलेख आणि विपुल ग्रंथलेखन केले. त्यांपैकी द रेव्होल्यूशन ऑफ सिव्हिलिझेशन (१९११) हे फार गाजले. उर्वरित ग्रंथांत स्टोनहेंज : प्लॅन्स, डिस्क्रिप्शन अँड थिअरिज (१८८०) ए हिस्टरी ऑफ ईजिप्त, ६ खंड (१८९४-१९२५) द रॉयल टूम्ज ऑफ आबायडॉस, फर्स्ट अँड सेकंड (१९००-१९०२) मेथड्स अँड एम्स इन आर्किऑलॉजी (१९०४) रिसर्च इन सिनाई (१९०६) द फॉर्मेशन ऑफ द अल्फाबेट (१९१२) टूम्ज ऑफ द कोर्टिअर्स (१९२५) सेव्हंटी यिअर्स इन आर्किऑलॉजी (१९३१) इ. ग्रंथ प्रसिद्ध व मान्यवर आहेत. शेवटचा ग्रंथ आत्मचरित्रात्मक आहे.
देव, शां. भा.
“