घोड्याच्या मुखावरील तांब्याच्या पत्र्याचा साज, महाश्मयुग माहुरझरी (महाराष्ट्र)

माहुरझरी : माहाराष्ट्रात नागपूरपासून सु. १२ किमी. अंतरावर असलेले महाश्मयुगीन अश्मवर्तुळांचे स्थल. नागपूर विद्यापीठातर्फे १९७२ साली उत्खनन. इ. स. पू. आठव्या-सातव्या शतकांतील अश्मवर्तुळांच्या उत्खनांत अनेक शिलावर्तुळे, मानवी सांगाडे व त्याबरोबर पुरलेल्या लोखंडांच्या कट्यारी, भाले, कुऱ्हाडी, नाणी, सुतारकामासाठी लागणाऱ्या लोखंडी छिन्न्या व वाकस दररोजच्या उपयोगातील लोखंडी दिवे, पळ्या, नखण्या व कढया यांसारख्या वस्तू सोन्याच्या दागिन्यांसह सापडल्या. चमकदार काळ्या रंगाच्या मृत्पात्रात वाडगे व झाकण्या यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. काही झाकण्याच्या माथ्यावर बोकड व पक्षी यांच्या आकृती चिकटविल्या होत्या. एका मृताच्या छातीवर लोखंडाचे पाते व तांब्याची मूठ असलेली कट्यार ठेवलेली आढळून आली, तर दुसऱ्या काही अश्मवर्तुळांत घोड्याचे अवशेष व त्याचे तांब्याच्या पत्रांचे साज पुरलेले होते. अशी अश्मवर्तुळे प्रामुख्याने महाराष्ट्रांच्या विदर्भ भागात सापडतात. एक विस्तृत शक्तिपीठ म्हणून माहुरझरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथे सापडलेली उत्तानपाद आणि शिरोहीन नग्न मातृकादेवीची मूर्ती असे दर्शविते, की हे स्थान पूर्वी देवीचे उपासना केंद्र होते.

संदर्भ : 1. Deo S. B. Mahurjhari Excavation, Nagpur, 1973.

             २. ढेरे, रा. चि. शक्तिपीठांचा शोध, पुणे, १९७३.

             ३. देशपांडे ग. त्र्यं. संपा. विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, १९७१, नागपूर.

  

देव, शां. भा.