कोरीव लेख : टिकाऊ माध्यम द्रव्यांवर कोरलेल्या लेखनास ही सर्वसाधारण संज्ञा दिली जाते. यासच पुराभिलेख आणि त्यांच्या अभ्यासास पुराभिलेखविद्या असे म्हणतात. प्राचीन काळी राजे, शासनसंस्था, धर्मसंस्था, महंत, भक्त इ. राजाज्ञा, धर्माज्ञा, स्मृतिलेख, दानलेख, प्रशस्तिलेख इ. लिहून ठेवीत. हे लिहून ठेवण्यात चालू किंवा पुढील पिढ्यांना त्या लेखनाचा हेतू विशद व्हावा, अशी लेख लिहविणाराची इच्छा असे. अशा प्रकारचे हजारो लेख उत्खननात व समन्वेषणात उपलब्ध झाले आहेत. चालू काळातही हीच पद्धत उण्या-अधिक फरकाने प्रचारात आहे. मोठ्या सार्वजनिक वास्तू, चर्चे, स्मारके, धरणे, पूल, पुतळे ह्यांच्या उभारणीत अशा प्रकारचे लेख कोरून बसविण्याची प्रथा अजूनही सर्रास चालू आहे. असे लेख प्राचीनांप्रमाणेच कलाकुसरीने नटलेले व त्यांचे अनुकरण करणारे आढळतात. कोरीव लेखांची ही पद्धत भूर्जपत्रे, कातडी आणि नंतर कागद (पहिले शतक) यांच्या शोधानंतर हळूहळू कमी झाली. तथापि अधिक टिकाऊ प्रकारचे लेखन करण्याकरिता अद्यापि याच पद्धतीचा अवलंब सर्वत्र केला जातो.

जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींचे कोरीव लेख आज उपलब्ध झाले आहेत. ईजिप्त, बॅबिलोनिया, ॲसिरिया, सुमेरिया, चीन, हडप्पा, मोहें-जो-दडो (सिंधू संस्कृती), इराण यांबरोबरच रोम, ग्रीस, माया, ॲझटेक इ. प्राचीन संस्कृतींचे कोरीव लेख मिळाले आहेत. आपणास येथे भारतीय कोरीव लेखांचा विशेषत्वाने विचार करावयाचा आहे.

लेखनाची सामग्री : हे कोरीव लेख कशावर कोरावे, हे ठरलेले नव्हते. सोने, रुपे, तांबे, लोह इ. धातू स्फटिक, नीळ इ. अर्धरत्ने व रत्ने अभ्रक, दगड, खापरे, भाजलेल्या मातीची भांडी व विटा लाकूड, भूर्जपत्र, ताडपत्र, वेणुपत्र इ. वनस्पतिवर्गातील पदार्थ कापड, कडित, रेशीम इ. धागायुक्त पदार्थ कातडे व तत्सम प्राणिज पदार्थ, यांवर लेख कोरीत. हे लेख सामान्यत: तीक्ष्ण हत्यारांनी खोदीत अथवा निरनिराळ्या प्रकारची शाई व रंग यांनीही लिहीत. ज्या वेळी एकाच प्रकारचे लेखन अनेकदा लिहिण्याचा प्रसंग येई, तेव्हा प्रत्येक वेळी ते स्वतंत्र रीतीने न लिहिता त्या लेखनाचे उलटे ठसे करीत व ते मऊ चिकण मातीवर किंवा मळलेल्या मातीवर दाब देऊन उठवीत. हेच लेखन धातूवर उठवावयाचे असल्यास त्या धातूंचा रस करून त्या उलट्या साच्यात ओतीत किंवा तापवून मऊ केलेल्या पत्र्यावर उलटा ठसा मारीत. अशा प्रकारे राजा किंवा इतर अधिकारी यांना वारंवार लागणाऱ्या मुद्रा, नाणी इ. तयार करीत. दगड, धातू, अर्धरत्ने, खापरे, मातीची भांडी इत्यादींवरील लेखन कोरावे लागे. यासाठी अशा प्रकारचे लेखन प्रथम ज्याचे अक्षर वळणदार व सुवाच्य असे, अशा लेखकाकडून शाई किंवा तत्सम पदार्थाने लिहून घेत आणि नंतर लिहिल्याप्रमाणे कोरून किंवा खोदून काढण्याचे काम कोरक्याकडे किंवा खोदकाम करणाऱ्याकडे सोपवीत. अशा लेखनात ज्या चुका झालेल्या आढळतात, त्या कधी लिहिणाऱ्याच्या हातून किंवा कधी कोरक्याच्या हातून झालेल्या असतात. लेखाचा रचनाकार सामान्यत: विद्वान असल्यामुळे त्याच्या हातून रचनेत सहसा चुका होत नसत.

ताम्रशिलाशासने : भारतात क्वचित प्रसंगी सोन्याच्यावा रुप्याच्या पत्र्यांवर लेखन झाले आहे. उदा., बुद्धाचे अवशेष असलेला आणि कनिष्काने लिहविलेला लेख सोन्याच्या पेटिकेवर आहे. शिवाजी महाराजांनी तत्कालीन विजयानगर सम्राटांच्या वंशजाला पाठविलेले पत्र रुप्याच्यापत्र्यावर लिहिले आहे. शाहजहान आणि गोवळकोंड्याचे सुलतान यांजमध्ये झालेला तह सोन्याच्या पत्र्यावर लिहिला होता. निरनिराळ्या प्रकारची नाणी शुद्ध व मिश्र धातूवर लिहिलेल्या लेखांची प्रतीकेच आहेत. तथापि फार मोठे लेखन शिला व तांब्याचे पत्रे यांवर झालेले आहे. विदिशा (भिलसा), दिल्लीजवळील मेहरोली तसेच टोप्रा येथील लेख लोहस्तंभावर लिहिलेले आहेत. तथापि असे लेख बहुतेक दगडी स्तंभावर लिहिलेले आढळतात. अशोक आणि महाक्षत्रप रुद्रदामन, तसेच खारवेल इत्यादींचे लेख मोठमोठ्याखडकांवर लिहिलेले आहेत, तर हजारो शिलालेख देऊळ, मठ इत्यादींच्या दगडी भिंतींवर किंवा सुट्याशिलाखंडांवर लिहिलेले आहेत. सिंहाचलम् येथील मंदिराच्या सर्व दगडी भिंती लेखांनी भरलेल्या आहेत. त्या एका देवळातच सु. सहाशे शिलालेख आहेत. तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या आवारात गणपतीचे एक देऊळ असून त्याच्या चबुतऱ्यावर डेमी आकाराची सु. शंभर पृष्ठे भरतील एवढा मोठा एकच भोसले वंशाविषयीचा मराठी लेख कोरला आहे. शिलाखंडावर कोरलेले लेख तर हजारोंनी सापडले आहेत. हे शिलाखंड कधी सुटे, तर कधी भिंतीत बसविलेलेही आढळतात. जो मजकूर सर्व लोकांना समजावा असा असतो आणि जे लेखन पुष्कळ काळ टिकावे असे राजांना किंवा इतरांना वाटे, ते सामान्यत: खडक किंवा शिलाखंड यांवर खोदलेले आहे. ताम्रशासनाचे तसे नाही. एखादा राजा किंवा त्याचा सरदार किंवा एखादा व्यापारी संघ, भक्त अशांना एका विशिष्ट मनुष्याला किंवा एका विशिष्ट मंदिराला दान द्यावयाचे असते, तेव्हा ते सामान्यतःतांब्याच्या पत्र्यावर कोरीत. यांना ताम्रपट किंवा ताम्रशासन म्हणतात. हे सामान्यतः आयताकारी असतात. एका ताम्रशासनात किती पत्रे असावयाचे हे त्यात लिहावयाचा मजकूर किंवा तांब्याच्या पत्र्यांचा आकार यांवर अवलंबून असे. काही ताम्रशासने एकाच पत्र्याची आहेत, तर चोल राजा पहिला राजेंद्र याच्या एका ताम्रशासनात ५५ पत्रे आहेत. पत्र्यांचा आकार, लांबी, रुंदी, जाडी व त्यांची कडी यांवर ताम्रशासनाचे वजन अवलंबून असे. यादव राजा रामचंद्र याचा शके ११९४ चा पैठण ताम्रपट सु. २० किग्रॅ. वजनाचा आहे. ताम्रशासन एका पत्र्याचे असो किंवा अनेक पत्र्यांचे असो, ते एका किंवा दोन कड्यांत ताम्रपटाच्या डाव्या किंवा वरच्या बाजूस भोके पाडून त्यांत ओवलेले असते. पत्र्यावरील लेखन घासून अस्पष्ट किंवा खराब होऊ नये, म्हणून तांब्याच्या पत्र्याच्या चारही बाजूंच्या कडा ठोकून दोन्ही बाजूंनी उंचावलेल्या असतात. यामुळे ताम्रशासनातील लेखन सामान्यतः सुरक्षित राहिलेले आढळते. ताम्रशासनाच्या कड्यांची टोके एकत्र आणून त्यांवर ज्या व्यक्तीने ते ताम्रशासन दिले असेल, ती व्यक्ती आपल्या नावाच्या किंवा आपल्या कुलचिन्हाच्या मुद्रेमध्ये ती टोके सांधून टाकी. या मुद्रेवर कधीकधी राजाच्या केवळ नावाऐवजी त्या राजाच्या प्रशस्तिपर एखादा श्लोक असतो. उदा., सेंद्रकांच्या कासारे ताम्रशासनाच्या मुद्रेवर केवळ ‘अल्लशक्ति’ एवढेच राजनाम आहे, तर वाकाटकांपैकी प्रवरसेन राजाच्या एका ताम्रशासनाच्या मुद्रेवर ‘वाकाटकललामस्य क्रमप्राप्तनृपश्रियः राज्ञः प्रवरसेनस्य शासन रिपुशासनम्’ असा अनुष्टुभ वृत्तातील श्लोकच खोदला आहे. उपर्युक्त पैठण ताम्रशासनाला एकात एक ओवलेल्या दोन कड्या असून दुसऱ्या कडीवर राजमुद्रा आहे. पण एकंदरीत ताम्रशासनाच्या मुद्रेवर सामान्यतः वराह, गरुड, लक्ष्मी, नंदी, मत्स्य, व्याघ्र, सिंह अशांसारखे एखादे राजकुलचिन्ह असते. ताम्रशासनातील पहिल्या व शेवटच्या पत्र्यांच्या बाहेरच्या बाजू सामान्यतः कोऱ्या असतात. पण क्चचितच या बाजूंवरही लिहिलेले आढळते. आतील पत्रे मात्र दोन्ही बाजूंनी लिहिलेले असतात. या लेखनात कोणी प्रक्षेप करू नये, म्हणून पत्र्याच्या सर्व बाजूंवर लेखन असते. कधी ताम्रशासनांच्या अधिकृत प्रती केलेल्या मिळतात, तर कधी बनावट ताम्रशासनेही आढळली आहेत कधी पाठ लिहिण्यात चूक झाली, तर त्यावर अचूक पाठ लिहीत. यामुळे दोन्ही पाठ वाचता येतात.


भारतात सापडलेली बहुतेक ताम्रशिलाशासने ब्राह्मी व तीपासून उत्पन्न झालेल्या नागरी व द्राविडी लिपींत लिहिलेली आहेत. कोणते ताम्रशासन कोणत्या लिपीत लिहावे हे ठरलेले नव्हते. संस्कृत भाषेतील कित्येक ताम्रशासने द्राविडी लिपीत लिहिलेली आहेत, तर विजयानगरकरांच्या कितीतरी ताम्रशासनांत द्राविडी भाषेकरिता नागरी लिपी वापरली आहे. केवळ अगदी थोडी शिलाशासने व नाणी खरोष्ठी लिपीत लिहिलेली आहेत. ताम्रशिलाशासने सामान्यतःगद्यपद्यरूप असतात, पण काही शासने मुख्यत: गद्यरूप तर काही मुख्यतःपद्यरूप आहेत. ह्यांचा आरंभ सामान्यतःओम्, सिद्धम्, स्वस्ति, दृष्टम्, जितं भगवता इ. मंगलवाचक शब्दांनी किंवा नमस्तुंग, श्रीमत्परम्, जयत्याविष्कृतम् इ. विविध मंगलार्थक श्लोकांनी करतात. ताम्रशिलाशासनात मुख्यतः दान देणारी व्यक्ती आपल्या कुलात होऊन गेलेल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमांची किंवा इतर सत्कृत्यांची माहिती देते. तसेच आपण कोणत्या वर्षी, महिन्यात, पक्षात, तिथीस, वारास कोणत्या व्यक्तीला व कोणत्या प्रकारने दान दिले इ. सर्व तपशील देते. त्याचप्रमाणे ह्या दानाच्यापाठाची रचना कोणी केली, कोणी दानपत्र प्रत्यक्ष नेऊन दिले, कोणी ताम्रशासन कोरले इ. प्रकारची माहिती यात येते व नंतर दान चालविणाराला व मोडणाराला कोणते फळ मिळते, याविषयीची शापाशीर्वादात्मक वचने उद्‍धृत केलेली असतात. ही वचने सु. २५० ते ३०० आहेत. यांपैकी काही गद्य, तर काही पद्य आहेत. ताम्रशासनात उपर्युक्त मजकूर कोणता व कोठे यावयाचा हे निरपवाद ठरलेले नसते. कधी प्रथम कालनिर्देश येतो, कधी प्रथम कुलवर्णन येते, तर कधी कोणत्या ठिकाणाहून दान दिले हे येते. कधीकधी ताम्रशासनाच्या शेवटी स्वहस्तोयम् असे म्हणून कोणातरी राजाचे नाव असते. हर्षाच्या एका ताम्रशासनावर  ‘स्वहस्ते मम महाराजाधिराज श्रीहर्षस्य’ असे वाक्य आहे. कधी आपल्या कुलदेवतेचे नाव घातलेले असते. विजयानगर सम्राटांच्या अनेक ताम्रशासनांवर श्रीविरूपाक्ष, श्रीहरिहर इ. कुलदेवतांचा निर्देश आहे. ह्या शेऱ्याबाबत एक लक्षात ठेवले पाहिजे, की हे शेरे ताम्रशासन देणाऱ्याने ते आपल्या हातानेच लिहिले असतील असे नाही. कित्येक ठिकाणी हे शेरे ताम्रशासनातील अक्षरांचे जे वळण त्याच वळणात असतात. शिलाशासनांची लेखनाची पद्धत अशीच असली, तरी त्या लेखनात समाविष्ट केलेल्या विषयांमध्ये कितीतरी विविधता आढळते. ताम्रशासनांप्रमाणे शिलाशासनातही दानांची नोंदणी फार मोठ्या प्रमाणात असली, तरी इतरही अनेक विषय आलेले आहेत. अशोकाच्या लेखात मुख्यतःत्याच्या चौदा आज्ञा आहेत, तर खारवेल किंवा महाक्षत्रप रुद्रदामन यांच्या लेखांत त्यांनी केलेल्या पराक्रमांची व सत्कृत्यांची नोंद आहे. राजस्थानातील मोठमोठ्या तलावांवर लावलेल्या शिलालेखांत मुख्यतः निरनिराळ्या राजपूत राजांच्या प्रशस्ती आहेत. उदा., उदयपूर येथील तलावावर राजसमुद्रप्रशस्ति हे काव्य कोरले आहे, अजमेर संग्रहालयातील शिलालेखात ललित विग्रहराज इहे नाटक कोरले आहे, तर धार येथील शिलांवर कूर्मस्तोत्र आणि पारिजातमंजरी किंवा विजयश्री हे प्राकृत नाटक, अशी दोन प्रकरणे कोरली आहेत आणि ओकारमांधाता येथील अमरेश्वराच्या देवळात शिलांवर नर्मदा, हलायुध  आणि शिवमहिम्न अशी तीन स्तोत्रे कोरलेली आहेत. उज्जयिनी येथील महाकालेश्वराच्या देवळात नागरी वर्णमाला व पाणिनीच्या अष्टाध्यायीतील माहेश्वरसूत्रे कोरली आहेत. कित्येक शिलाखंडांवर स्त्रिया सती गेल्याचे नमूद केले आहे. अशा शिलाखंडांना सतीशिला महासतीकल्लु (मास्तीकल) असे म्हणतात. दुसऱ्या कित्येक शिलाखंडांवर एखादा पुरुष वीरोचित मरणाने मेला असेल, तर त्याचा तपशील दिलेला असतो. अशा शिलाखंडांना वीरशिला किंवा वीरकल-गळ अशी नावे आहेत. या दुसऱ्या प्रकारच्या शिलाखंडांवरील लेखात ज्या तऱ्हेचे मरण आलेले नमूद केले असेल, तद्दर्शक शिल्प खोदलेले असते. या शिल्पात कधी एखाद्या व्यक्तीला मानवी शत्रूशी झगडताना मृत्यू आलेला, कधी जलयुद्धात ती व्यक्ती मरण पावलेली, कधी हिंस्त्र पशूशी झगडताना त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला, तर कधी भुताशी झगडतानाही ती मेलेली असते. अशा वेळी त्याप्रसंगाला अनुरूप असे चित्र त्या शिलाखंडात खोदलेले असते. 

भारतामध्ये ज्याप्रमाणे संस्कृतप्राकृतादी भाषांमधील व ब्राह्मी इ. लिपींतील ताम्रशिलाशासने आहेत त्याप्रमाणे अरबी, फार्सी, उर्दू लिपींतील व त्याच भाषांतील शिलालेख सापडले आहेत. या भाषालिपींतील ताम्रशासने मात्र सहसा आढळत नाहीत. खानदेशातील फारूकी सुलतानांचे एक आणि औरंगजेबाचे एक अशी केवळ दोन शासनेच तांब्याच्या पत्र्यावर कोरलेली आढळली आहेत. आणखी फारतर दोन-चारच ताम्रशासने अशा प्रकारची असतील. शिलाशासने मात्र शेकडोंनी उपलब्ध झाली आहेत. मुस्लिमपूर्वकालीन ताम्रशिलाशासनांप्रमाणे ह्या शिलाशासनांत राजांच्या प्रशस्ती इ. आढळत नाहीत. ही शिलाशासने मशिदी, दर्गे, किल्ले व त्यांचे बुरूज, मोठमोठ्यावेशी, कबरी, विहिरी इ. वास्तूंवर आढळून येतात आणि त्या लेखांत ती वास्तू कोणाच्या आज्ञेने, कोणाच्या देखरेखीखाली, कोणी आणि केव्हा उभारली याचा तपशील असतो. अगदी क्वचित प्रसंगी कागदावर लिहावयाची फर्माने शिलाखंडावर कोरलेली आढळली आहेत. विजापूर व गोवळकोंडा येथे अशा प्रकारच्या फर्मानांचे शिलाखंड आहेत.

अरबी, फार्सी, उर्दू लेखनांत कालक्रमाने नैसर्गिक रीत्या झालेली उत्क्रांती फार मोठ्या प्रमाणात आढळून येत नाही. या लेखनांसाठी नस्ख, नस्तअलीक, शिकिस्ता आणि तुघ्रा अशा चार प्रकारच्या लिपी वापरलेल्या आढळून येतात. पैकी फार प्राचीन लेख किंवा कुराणादी धार्मिक ग्रंथ हे सामान्यतःनस्ख लिपीत लिहिलेले असतात, तर पत्रव्यवहार शिकिस्तामध्ये असतो.


कोरीव लेखांचा अभ्यास व प्रकाशन : भारतातील बहुतेक कोरीव लेख मुख्यतःब्राह्मी व तिच्यापासून उत्पन्न झालेल्या इतर लिपी, तसेच खरोष्ठी लिपी यांत लिहिलेले आहेत. कर्नल मॅकेंझी याने पुराभिलेख जमविण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे काही भारतीय विद्वानांना दहाव्या शतकापर्यंतचे लेख वाचता येऊ लागले. त्यापूर्वीचे लेख सामान्यतःवाचता येत नव्हते. एशियाटिक रिसर्चेस, जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी, ट्रॅन्झॅक्शन्स ऑफ द बाँबे लिटररी सोसायटी अशा नियतकालिकांत उपर्युक्त प्रकारचे काही लेख प्रकाशित झाले आहेत. पण १८३७ साली जेम्स प्रिन्सेप याने ब्राह्मी व खरोष्ठी या लिपींचा अचूक उलगडा करून कोरीव लेखांच्या अभ्यासाचा खरा पाया घातला. त्यानंतर कोरीव लेख फार मोठया प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागले. असे कित्येक लेख इंडियन अँटिक्वेरी   या १८७३ पासून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. १८६१ मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम हा भारतीय पुरातत्त्व खात्याचा प्रमुख बनला. त्याच्या सर्वेक्षण वृत्तांतांत तसेच रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई व कलकत्ता शाखांच्या नियतकालिकांत अनेक कोरीव लेख प्रकाशित झाले आहेत. १८७७ मध्ये कनिंगहॅमने अशोकाचे भारतात मिळालेले बहुतेक लेख एकत्र करून ते कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम्  मालेच्या पहिल्या खंडात प्रकाशित केले. त्या लेखांत नंतर सापडलेल्या आणखी काही अशोकलेखांची भर घालून ते सर्व ह्यूल्श याने १९२५ साली प्रकाशित केले. दरम्यान डॉ. फ्लीट याने १८८८ मध्ये गुप्त लेखांचा संग्रह या मालेचा तिसरा खंड प्रकाशित केला. या दोन्ही खंडांचे केवळ नवे मुद्रण अलीकडे पुन्हा प्रकाशित झाले आहे. याच मालेत स्टेन कॉनॉव्ह यांनी खरोष्ठीतील लेख १९२९ मध्ये प्रसिद्ध केले. अलीकडे डॉ. मिराशीयांनी या मालेतील चौथ्या व पाचव्या खंडांत अनुक्रमे कलचुरी व चेदी संवतांतील लेख व वाकाटक वंशाचे लेख संपादून प्रकाशित केले आहेत. १८९२ मध्ये एप्रिग्राफिया इंडिका या नावाचे नियतकालिक भारत सरकारने सुरू केले. त्याचे आजवर निदान ३६खंड प्रकाशित झाले असून काही खंडांचे पुनर्मुद्रणही झाले आहे. याशिवाय भारत सरकारने साउथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स  या नावाची एक माला चालू केली असून तिचे आजवर १४ खंड प्रकाशित झाले आहेत. पूर्वीच्या म्हैसूर संस्थानाने त्या संस्थानातील लेखांचे १३ खंड आजवर प्रकाशित केले असून काहींच्या द्वितीयावृत्त्याही निघाल्या आहेत. असे हजारो लेख प्रसिद्ध झाले असल्यामुळे त्यांच्या अत्यावश्यक सारांशाच्या सूची प्रकाशित करणे, त्यांच्या अभ्यासातील प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक होते. म्हणून डॉ. कीलहोर्न याने उत्तर भारतीय लेखांची एक सूची एपिग्राफिया इंडिकाच्या पाचव्या खंडात व दक्षिण भारतातील लेखांची सूची सातव्या खंडात प्रकाशित केली. पूर्वोक्त सूचीची वाढविलेली दुसरी आवृत्ती, डॉ. दे.रा. भांडारकर यांनी उपर्युक्त नियतकालिकाच्या १९ ते २३ या खंडांत प्रकाशित केली. पण दक्षिण भारतात मिळालेल्या व प्रकाशित झालेल्या लेखांची संख्या फारच मोठी असल्यामुळे कीलहोर्नच्या दुसऱ्या सूचीची वाढविलेली आवृत्ती अजूनही निघालेली नाही. मात्र आजवर प्रकाशित झालेल्या ब्राह्मी लिपीतील व मुख्यतःप्राकृत भाषेतील लेखांची सूची डॉ. ल्यूड्यर्स यांनी तयार करून एपिग्राफिया इंडिकाच्या दहाव्या खंडात प्रकाशित केली आहे. अलीकडे डॉ. दिनेशचंद्र सरकार यांनी कोरीव लेखांच्या अभ्यासात दोन ग्रंथ लिहून महत्त्वाची भर घातली आहे. इंपीरियल गॅझेटियरच्या दुसऱ्या प्रास्ताविक खंडात डॉ. फ्लीट यांनी कोरीव लेख या प्रकरणावर लिहिलेला विस्तृत लेख, तसेच रायबहाद्दूर गौरीशंकर ओझा यांचे भारतीय प्राचीन लिपिमाला, ब्यूलरचे इंडियन पॅलिओग्राफी तसेच बर्नेलचे साउथ इंडियन पॅलिओग्राफी  आणि चंद्रबली पांडे व अहमद दानी यांची या विषयावरील पुस्तके अभ्यसनीय आहेत. अरबी-फार्सी-उर्दू लेख इंडियन अँटिक्वेरी या मुंबई व कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटीची नियतकालिके, तसेच एपिग्राफिया इंडोमॉस्लेमिका (आता एपिग्राफिया इंडिकाची अरबी आणि फार्सी पुरवणी) इत्यादिकांत प्रकाशित झाले व होत असून त्याची सूची एपिग्राफियाइंडोमॉस्लेमिकामध्ये आणि अंशतः वा. सि.बेंद्रे यांनी ए स्टडी ऑफ मुस्लिम इन्स्क्रिप्शन्स (१९४४) या पुस्तकांत दिली आहे.

संदर्भ : 1. Fleet, J.F. Corpus Inscriptionum Indicarum, Vol. III, Delhi, 1963.

    2. Hultzsch, E.Corpus Inscriptionum Indicarum, Vol. I, Varanasi, 1969.

    3. Sircar, D.C. Indian Epigraphy, Delhi, 1965.

   4 .Sircar, D.C. Select Inscriptions, Calcutta, 1965.

   ५. खरे, ग.ह. संशोधकाचा मित्र, पुणे, १९५१. 

   ६. तुळपुळे, शं.गो. प्राचीन मराठी कोरीव लेख, पुणे, १९६३. 

गोखले, शोभना ल.

ब्राह्‌मी : हिद भगवं जातेति लुंमिनी गामे येथे लुंबिनी गावात भगवान (बुद्ध) जन्मले म्हणून (हे गाव करमुक्त केले)खरोष्ठी : रओ छहरतस नहपनस राजा क्षहरात नहपानाचे (नाणे)गुप्त : श्री कुमारगुप्तस्य राज्ये ज्येष्ठ मास - श्री कुमारगुप्ताच्या राज्य (काळी) ज्येष्ठ मासात ( मूर्चीची प्रतिष्ठा केली)पेटिकाशीर्षक : म्महाराजश्री प्रवरसेनस्य - सूनो : (सूनो : अत्यंत स्वामिमहाभैरवभक्तस्य शासनम्) महाराज श्री प्रवरसेनाच्या पुत्राचे (शासन)चालुक्य : महत्छलं शरच्चन्द्रकिरणधवलं यशो - अतिशय अस्थिर शरद्‌ऋतूतील चंद्रकिरणाप्रमाणे शुभ्र यशदेवनागरी : स नागवल्लीकलिते कदली षंडमंडिते चकार कोंकणे (वासं) - तो नागवेली व केळी यांनी शोभित (कोंकणात राहिला)तेलगू-कन्नड : गायं गायं रम गात गात रमतात