लार्ते, एद्‍‌वार आर्‌माँ इझिदोर इपॉलित : (१५ एप्रिल १८०१-२८ जानेवारी १८७१). सुप्रसिद्ध फ्रेंच पुरातत्त्वज्ञ, जीवाश्मविज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात सेंट गीराद (झेर-फ्रान्स) या गावी झाला. सुरुवातीचे शिक्षण घेऊन त्याने कायद्याचा अभ्यास सुरू केला परंतु झॉर्झ क्यूव्ह्ये या पुराजीवविज्ञाने शोधून काढलेल्या अश्मास्थींच्या शोधात लक्ष घातले आणि स्वतः उत्खननास प्रारंभ केला. काही वर्षे त्याने झेर प्रांतात दंडाधिकाऱ्याचे काम केले परंतु त्याचा ओढा अश्मास्थींच्या संशोधनाकडे होता. उर्वरित आयुष्य त्याने अश्मास्थींच्या संशोधनअभ्यासात व्यतीत केले. आग्नेय फ्रान्समधील झेर नदीच्या खोऱ्यात ओशजवळ त्याने प्रथम १८३४ मध्ये अश्मास्थींच्या अवशेषांचा शोध लावला. पुढे एद्‌वार लार्ते याने फ्रान्समध्ये पद्धतशीर उत्खनन करून ओरींयाक येथे प्राण्यांची हाडे, लहान आकाराची दगडांच्या पात्यांची हत्यारे आणि कोरीव नक्षी असलेले हाडांचे तुकडे मिळविले (१८५२). अँटिक्विटी ऑफ मॅन इन वेस्टर्न यूरोप (१८६०) या ग्रंथात त्याने तत्संबंधी सविस्तर चर्चा केली असून या अवशेषांचा काल उत्तर पुराणाश्मयुगीन होता, हे दाखविले. त्यामुळे हा कालखंड विस्तृतपणे उघडकीस आणण्याचे श्रेय लार्ते याला दिले जाते. गारगोटीच्या दगडी पात्यावर संस्करण करून पाती तयार करणे, हाडावर कोरीव काम करणे, विविध तऱ्हेच्या दगडी छिलक्यांच्या तासण्या आणि अण्या त्याचप्रमाणे कोरके व नोक हत्यारे (Points) तयार करणे, ही ऑरिग्नेशियन संस्कृतीची काही खास लक्षणे ठरली. फ्रान्स, मध्य यूरोप, पॅलेस्टाइन व इतरत्र या संस्कृतीचा पुरावा मिळाला असून तिचा काल काही तज्ञांच्या मते इ.स.पू.सु. चाळीस हजार वर्षे असा असावा. हेन्री क्रिस्ती या श्रीमंत इंग्लिश मानवजातिविज्ञाच्या सहकार्याने त्याने पेरीगा जिल्ह्यातील दॉरदॉन्यू व व्हेझर दऱ्यांतील अनेक प्रागैतिहासिक गुहांत उत्खनन केले. त्यात त्यांना भीमगजाचे कोरलेले हाड मिळाले. तेथील अवशेषांवर त्याने रेलिक ऑक्विटनिके (इं. भा. ॲक्विटेनियन रिमेन्झ) नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला (१८६५-७५). त्याने जमा केलेले बहुतेक अवशेष सेंट जर्मेन वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. काही आधुनिक संशोधक लार्तेला पुराजीवविज्ञानाच्या आधुनिक संशोधन-अभ्यासाचा जनक मानतात. अखेरच्या दिवसांत त्याची पॅरिस येथील जार्दिन देस प्लांतीस वस्तुसंग्रहालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लवकरच तो सीसान येथे मरण पावला.

 देव, शां. भा.