अमरावती – १: बौद्ध अवशेषांचे एक स्थळ. हे आंध्र प्रदेशात गुंतूरपासून ३४ किमी.वर कृष्णेच्या दक्षिणकाठी वसले आहे. प्राचीन काळी ह्यास ‘धरणिकोट’ किंवा ‘धान्यकटक’ असे म्हणत. एका प्रचंड बौद्धस्तूपासाठी अमरावती प्रसिद्ध असली, तरी तो संपूर्ण स्तूप आज अस्तित्वात नाही. १७९७ साली एका स्थानिक जमीनदाराने घराच्या बांधकामासाठी स्तूपावरील अनेक संगमरवरी शिल्पपट्ट उद्‌‌ध्वस्त केल्यामुळे सध्या तेथे केवळ स्तूपाचा आलेख व काही शिल्पे पाहावयास सापडतात. १८८० साली झालेल्या उत्खननांत अनेक महत्त्वाचे अवशेष व काही शिलालेखही सापडले. त्यांपैकी बरेच  चांगले नमुने ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात व मद्रास वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आले. त्यानंतर अलीकडे भारत सरकारच्या पुरातत्त्वखात्यानेही तेथे उत्खनन केले आणि तेथे सापडलेल्या वस्तू नागार्जुनकोंडा येथील वस्तुसंग्रहालयात ठेवल्या आहेत.

येथील मुख्य स्तूप संगमरवरी दगडांच्या चिपांनी आच्छादिलेला होता त्याभोवती दोन प्राकार होते. बाहेरच्या जास्त प्राचीन असून त्याची उंची जमिनीपासून ३।।-४ मी. होती. स्तूपाचा उत्तरभाग व दोन्ही प्राकारांचे सर्व संगमरवरी दगड उठावदार नक्षीकामाने भरलेले होते. स्तूपाचा व्यास सु. ४९ मी., आतील कठड्याचा परीघ १५८ मी. व बाहेरील  कठड्याचा परीघ २४५ मी. होता. बाहेरच्या कठड्यावर व आतील बाजूसही हजारो सुंदर आकृत्या असल्या पाहिजेत, असा पुरातत्त्ववेत्त्यांचा अंदाज आहे. जोत्यांवर प्राण्यांची व मुलांची चित्रे आहेत. येथील शिल्पाकृतींत काही वेळा बुद्ध एखाद्या पक्ष्याच्या वा प्राण्याच्या रूपात दाखविलेला आढळतो तर काही ठिकाणी तो केवळ चिन्हांनी चित्रित केलेला दिसतो. शिल्पांतून बुद्धाच्या जीवनातील प्रसंग, जातककथा आणि स्तूपांच्या प्रतिकृती प्रामुख्याने आढळतात. काही ठिकाणी मानवाकृति-शिल्पांची रेलचेल आढळते. शिल्पांतील मानवाकृती सडपातळ व भावपूर्ण दिसतात. शिल्पांतून बुद्धाची  अनेक प्रतीके आहेत परंतु बुद्धाची संपूर्ण अशी प्रतिमा एखादीच आढळते.

अमरावतीच्या पाषाण-शिल्पांचा काळ गांधारशैली व सांचीशैली ह्यांच्या मधला असावा. अमरावतीशैली, मथुरा शैली आणि गांधार शैली यांच्या सुमारास भरभराटीत असावी, असेही काहींचे मत आहे. अलीकडे येथील शैलीविषयी इ.स.पू. २०० ते इ.स. २०० ही सर्वसाधारण कालमर्यादा मानण्यात आली आहे. बाहेरचा प्राकार इ.स.पू. पहिल्या शतकाच्या अखेरीत बसविला असावा, असे पुलुमाई (वी) व यज्ञश्री ह्या सातवाहन राजांच्या अर्पणलेखांवरून उघड होते. अमरावतीशैलीवर परकीय शिल्पकलेची छाप दिसत नाही मात्र काही शिल्पाकृतींतील ज्ञापके वा उपमानक ग्रीक-रोमन वाटतात. नंतरच्या दक्षिणेतील अनेक शिल्पाकृतींवर अमरावतीशैलीची छाप आढळतो एवढेच नव्हे, तर अजिंठा-चित्रशैलीवर, तसेच इंडोचायनातील शिल्पांवरही ती पडली आहे. ‘‘सर्व भारतीय शिल्पांत अमरावतीइतके नाजुक व विलासमय शिल्पपुष्प दुसरे नाही’’ हे कुमारस्वामींचे मत यथार्थ वाटते. 

संदर्भ : 1. Burgess, J. The Buddhist Stupas of Amaravati and Jaggayyapetta, London, 1887.

         2. Ramasvami, N. S. Amaravathi Art, Madras, 1969.

         3. Saraswati, S. K. A Survey of Indian Sculpture, Calcutta, 1957.

   

देव, शां. भा.