आहाड : राजस्थानच्या उदयपूर शहरातील प्राचीन अवशेषांचे टेकाड असलेला विभाग. हे टेकाड साधारणत: सु. १५ मी. उंच, ४८८ मी. लांब व १५२ मी. रुंद आहे.येथील अवशेषांवरून ज्ञात झालेल्या संस्कृतीस आहाड म्हणतात. तिचा प्रसार आग्नेय राजस्थानातील उदयपूर, चितोडगढ, भिलवाडा आणि काही प्रमाणात जवळच्या मंदसोर जिल्ह्यात झालेला दिसून येतो. एकूण हिचा प्रसार मुख्यत्वे बनास नदीच्या खोऱ्यात विस्तृत प्रमाणात झालेला आढळून येतो. म्हणून या संस्कृतीला ‘बनास संस्कृती’ असेही संबोधिले जाते. रतनचंद आगरवाल ह्यांनी प्रथम ही शोधून काढली. त्यानंतर वरील स्थळी १९५४–५६ च्या दरम्यान आणि १९६१-६२ या दरम्यानच्या काळात डेक्कन कॉलेज, पुणे व पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे पुरातत्त्वखाते, राजस्थान सरकार व मेलबर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्या मदतीने विस्तृत प्रमाणात उत्खनन केले. त्यात पुरातत्त्ववेत्त्यांना ताम्रयुगीन संस्कृतीच्या वसाहतींचे अवशेष मोठ्या प्रमाणावर सापडले. त्या वसाहतींतील सर्वांत प्राचीन वस्ती इ.स.पू. अठरावे शतक अथवा त्याआधी झाली असावी. येथे वस्ती एकूण दोन कालखंडांत झाली. पहिल्या कालखंडात ताम्रयुगीन संस्कृतीच्या लोकांनी इथे वस्ती केली. दुसरा ऐतिहासिक कालखंडातील संस्कृती दर्शवितो. पहिल्या कालखंडाचे तीन उपविभाग पाडण्यात आलेले असले, तरी त्यांची संस्कृती सर्वसाधारणपणे ताम्रयुगीनच आहे.

आहाड येथील उत्खननांत सापडलेली काही मृत्पात्रे.

पहिल्या कालखंडात सापडलेली पांढऱ्या रंगात विविध नक्ष्यांनी चितारलेली वैविध्यपूर्ण काळीतांबडी मृत्पात्रे, हे आहाड संस्कृतीचे खास वैशिष्ट्य होय. ह्याशिवाय करड्या रंगाची मृत्पात्रे बाहेरून आयात  झालेली असावीत. मृत्पात्रांबरोबर तांब्याचे दागिने आणि हत्यारे हे ह्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.तांब्याच्या चार चपट्या कुऱ्हाडी, काही बांगड्या, अंगठ्या इ. वस्तू सापडल्या आहेत. उत्खननात अशुद्ध तांबेही सापडले. यांवरून आहाडचे लोक येथेच तांबे शुद्ध करीत असावेत असे वाटते. घरबांधणीत हे लोक विशेष प्रगत नव्हते. घरांच्या बांधणीत दगडमातीचा उपयोग दिसतो. दगडी पाया, मातीच्या भिंती व सपाट एकखांबी छप्पर हा घराचा सर्वसाधारण आराखडा असून उपलब्ध अवशेषांत एक खोली ८ x ४ मी.ची आढळली आहे. त्यावरून घरे मोठी असावीत असे दिसते.क्वचित काही ठिकाणी कच्ची वीट व बांबूच्या कुडाचा उपयोग भिंतीसाठी केलेला आढळतो. दगडी पाटे-वरवंटे आणि बत्ते ह्यांचा हे लोक धान्य भरडण्यासाठी उपयोग करीत. हे लोक सामान्यतः शाकाहारी असले, तरी प्रसंगोपात्त हरिणाचे मांस खात. स्वयंपाक चुलखंडावर करीत. एका घरात अशी सहा चुलखंडे आढळली आहेत. त्यांवरून या लोकांची कुटुंबे मोठी म्हणजे संयुक्त असावीत. हे लोक येथे कोठून आले किंवा हे मूळचे कुठले ह्याविषयी माहिती मिळत नाही. नंतरच्या काळात ह्यांचा माळव्याच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीशी संपर्क आला. याउलट आहाडच्या उत्खननात सापडलेली काही तांबडी मृत्पात्रे हडाप्पा संस्कृतीच्या मृत्पात्रांच्या पोताची आठवण करून देतात, असे काही तज्ञांचे मत आहे.

आहाड संस्कृतीचे लोक प्रागैतिहासिक काळात फक्त तांब्याचीच अवजारे वापरीत, दगडाची वापरीत नसत. त्यामुळे या संस्कृतीस ताम्रयुगीन–ताम्रपाषाणयुगीन नव्हे–अशी संज्ञा दिली जाते.

संदर्भ : 1. Sankalia, H. D.; Deo S. B.; Ansari, Z. D. The Excavations at Ahar (Tambavati)1661-62, Poona, 1963.

             2. Sankalia, H. D. Prehistory and Protohistory in India and Pakistan, Bombay, 1963.

देव, शां. भा.