पुरातत्त्वीय उत्खनने : पुरातत्त्वीय अवशेषांच्या शोधार्थ केलेली शास्त्रशुद्ध पद्धतीची उत्खनने. पुरातत्त्वविद्या या शास्त्राबाबत व पुरातत्त्वीय उत्खनने यांबद्दल तज्ञांत अद्यापही गैरसमज आहेत. कसेतरी खणून एखादी कलात्मक वा मूल्यवान वस्तू मिळविणे एवढाच उत्खननाचा उद्देश असतो, असे पूर्वी मानीत. या मतामध्ये उत्खननाच्या हेतूबद्दल जसा गैरसमज दिसून येतो, तद्वतच उत्खननात नशिबाचा भाग बराच आहे, ही कल्पना दृढमूल झाल्याचे आढळून येते. हे गैरसमज दूर होण्यासाठी विसाव्या शतकातील पुरातत्त्वविद्येचे शास्त्रीय स्वरूप यास कारणीभूत झाले परंतु अठराव्या- एकोणिसाव्या शतकांत मध्यपूर्व व इतरत्र केली गेलेली उत्खनने या गैरसमजाला कारणीभूत ठरली. या काळातील उत्खनने अशास्त्रीय होती. विशेषतः मध्यपूर्वेत उत्खनने म्हणजे गडबड, कोलाहल, मारामाऱ्या, बक्षिसांच्या लालसेने उपटून काढले गेलेले अवशेष, राजकीय पार्श्वभूमीशी संबंधित असलेले हेवेदावे व त्यातून झटपट केली गेलेली खुदाई, अवशेषांची पळवापळवी यांचे मूर्तिमंत चित्र होय. सायंकाळी प्रत्येक मजुराला सापडलेले उत्खनित अवशेष मांडून उत्खननाचा निदेशक त्याला पाहिजे तेच अवशेष निवडून घेइ व क्वचित एखाद्या मजुराला वा मुकादमाला खूष होऊन बक्षीसही देई. अशा उत्खननाची पद्धती इतिहासजमा झाली आहे. आता योजनाबद्ध उत्खनन व विविध शास्त्रांची मदत हे नवे स्वरूप उत्खननाला प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे केवळ कलात्मक वस्तू मिळविणे वा फक्त त्यांचीच नोंद घेणे, ही अवस्थाही कालबाह्य झालेली असून  उत्खनन बारीकसारीक व सर्व प्रकारचा पुरावा मिळविण्यासाठी केले जाते. मानवी जीवन व त्या भोवतालची परिस्थिती यांचे आकलन होण्यासाठी सर्वंकष पुरावा मिळविणे, हे उत्खननाचे ध्येय निश्चित झाले असल्याने, विसाव्या शतकातील उत्खनने त्या आधीच्या काळात झालेल्या उत्खननांपेक्षा वेगळ्या स्वरूपाची आणि तंत्राची आढळून येतात.

यूरोपात सतराव्या-अठराव्या शतकांत झालेली उत्खनने प्रामुख्याने कलात्मक वस्तू मिळविण्यासाठी केली गेली. यांत अद्‌भुततेच्या वलयाबरोबर केवळ काही तरी नवा छंद अशीही रिकामपणाची एक झालर या प्रकारच्या संशोधनाला नकळत लागली गेली आहे. हे उत्खननात्मक संशोधनही मानवी इतिहासाच्या दृष्टीने पाहता अत्यंत मर्यादित काळाशी निबद्ध होते. ज्याबद्दल काही माहिती नाही, तो प्रागितिहासाचा काळ अशा तऱ्हेच्या छंदिष्ट उत्खननातून पूर्णपणे वगळला जात होता. त्यामुळे या उत्खननाच्या मर्यादा व त्यांची तांत्रिक कमतरता स्पष्टपणे उघड होते. इतिहास म्हणजे केवळ राजकीय वा कलाविषयक घडामोडी असे समीकरण मांडले गेल्याने पुरातत्त्वीय उत्खननाचे ध्येय मर्यादित राहिले असावे, परंतु राजकीय इतिहासाव्यतिरिक्त एखाद्या मानवी समूहाचा आर्थिक व सांस्कृतिक विकास का व कसा झाला, त्यामागची कारणे दर्शविणारा पुरावा विविध प्रकारच्या बारीकसारीक वस्तूंतूनही दृग्गोचर होऊ शकतो, ही जाणीव नव्हती. मानवी संस्कृती तांत्रिक प्रगती, दळणवळणाची साधने, समजरचना, अन्नोत्पादनाची अवस्था यांसारख्या बाबींवर अवलंबून असल्याने, या बाबींवर प्रकाश टाकणारा पुरावाही उत्खनन करून मिळविता येईल वा येतो ही जाणीवच आधीच्या काळातील उत्खनकांना नव्हती. म्हणूनच मानवी संस्कृतीचा विकास व तो विकास होण्यासाठी साहाय्यभूत ठरलेली परिस्थिती यांचा मागोवा घेणे, हे व्यापक ध्येय पुरातत्त्वीय उत्खननाचे मानले जाते. मानवाने बनविलेली वा वापरलेली प्रत्येक वस्तू त्यांची सांस्कृतिक व तांत्रिक ज्ञानाची अवस्था त्याचप्रमाणे त्यांच्या गरजा दर्शविते. या गरजा परिस्थितीशी निगडित असतात. मानवाने मागे ठेवलेल्या वस्तूरूप पुराव्यांवरून यांचे आकलन करून घेणे व त्यामागची कारणपरंपरा विषद करण्याचा प्रयत्न करणे, हे पुरातत्त्वीय उत्खननाचे ध्येय सर्वमान्य झाले आहे. या सांस्कृतिक इतिहासाच्या जाणकारीत एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती ही की इतिहासाला कालमापनाची चौकट अपरीहार्य ठरते. त्याशिवाय उत्खनित पुराव्याचे महत्व शास्त्रीय दृष्ट्या कमी प्रतीचे ठरतेय पुरातत्त्वीय उत्खननात मिळालेला पुरावा तौलनिक दृष्ट्या कालमापित करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कालमापनाला सापेक्ष कालमापन म्हणतात. एखादा अवशेष दुसऱ्या अवशेषापेक्षा जास्त प्राचीन वा अर्वाचीन आहे, हे ठरविणे स्तरीय संदर्भाने करता येते. यांव्यतिरिक्त कार्बन–१४ पोटॅशियम, आर‌्गॉन यांसारख्या अनेक शास्त्रीय पद्धतींच्या मदतीने निश्चित कालमापन करणे शक्य झाले आहे.

पुरातत्त्वीय उत्खननात सापेक्ष कालमापन दोन प्रमाणांच्या साहाय्याने करता येते : समस्थलत्व आणि अनु्क्रम.  एकाच थरात सापडलेल्या वस्तू बहुधा समकालीन असतात. अनुक्रमाच्या तत्वानुसार खालचा थर त्यावरील थरापेक्षा कालदृष्ट्या आधीचा. याचाच अर्थ असा, की खालच्या थरात सापडलेली वस्तू वरच्या थरातील वस्तूंपेक्षा कालदृष्ट्या आधीची ठरते. स्तरवार उत्खननात अवशेषांचा काळ वर उल्लेखिलेल्या तत्त्वांनुसार तौलानिक दृष्ट्या ठरविला जातो व उपलब्ध झालेल्या पुराव्यांची मांडणी सापेक्ष कालनिबद्ध केली जाते.

पुराव्याचे योग्य वर्गीकरण करून सापेक्ष कालनिबद्ध चौकट योजली नाही, तर त्या उत्खनित पुराव्याला काही अर्थ राहत नाही. म्हणूनच आधुनिक पुरातत्त्वीय संशोधनात स्तरनिबद्ध उत्खननाचा अवलंब केला जातो. पुराव्याच्या अनुक्रमाची नोंद केल्याशिवाय इतिहास हा खऱ्या अर्थाने इतिहास ठरणार नाही, त्याचप्रमाणे संस्कृतीच्या विकासाची वा अवनतीची मांडणीही करता येणार नाही. एकोणिसाव्या शतकातील उत्खननात सांस्कृतिक अनुक्रम योजण्याची दृष्टीच नसल्याने व उत्खननात केवळ चांगले व अखंड कलात्मक अवशेषच मिळविण्याचा प्रयत्न असल्याने, ही उत्खनने बरीचशी तोकडी व काहीशी विध्वंसक स्वरूपाची ठरली. संकुचित ध्येय विध्वंसक तंत्र आणि सर्वंकष पुरावा मिळाविण्याची उदासिनता यांमुळे या उत्खननांत प्राचीन संस्कृतींच्या फक्त काही अंगांचे दर्शन झाले परंतु त्या संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन आणि तिच्या विकासाचा इतिहास उलगडण्यास मदत झाली नाही.

सांस्कृतिक जीवनाचे यथार्थ दर्शन मानवाने मागे ठेवलेला विविध स्वरूपाचा पुरावा करू शकतो. मात्र यासाठी उत्खनक अत्यंत जागरूक असावा लागतो, त्याचप्रमाणे त्याला विविध शास्त्रशाखांतील तज्ञांची मदत घ्यावी लागते. अशा तऱ्हेने अगदी काळजीपूर्वक जमा केलेला पुरावा मानवी जीवनाच्या विविध अंगांची त्याचप्रमाणे तत्कालीन नैसर्गिक परिस्थितीची माहिती करून देऊ शकतो. उदा., उत्खननात सापडलेली मृत्पात्रे–तत्कालीन गरजा, मृत्पात्रांच्या बनावटीचे तंत्र त्यांच्या भाजणीस वापरलेली पद्धती, आकारानुसार सांस्कृतिक संपर्क, रंगविलेल्या चित्रानुसार कलात्मकता, प्राणी, धार्मिक चिन्हे इत्यादींची माहिती, देशी व परदेशी बनावटीची मृत्पात्रे, विशिष्ट कामाकरिता वापरलेली मडकी आणि मृत्पात्रांवर उमटलेल्या प्रतिकृतीनुसार धान्याचे प्रकार वा कापडाचे प्रकार वा चटईचे प्रकार इत्यादी. मानवी दफनाचा पुरावा मिळाल्यास त्यातून दफनपद्धतीबद्दलचे संकेत, मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या समजुती, दफनात ठवलेल्या इतर वस्तूंनुसार मृताची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, मृत व्यक्तीचे वय, लिंग व संभाव्य वंश आणि मृत्यूचे संभाव्य कारण यात बाबी जाणून घेता येतात. अलीकडे विविध शास्त्रांची मदत उत्खनित पुराव्याच्या अर्थबोधनाच्या कामी घेता येऊ लागली आहे. धातूच्या वस्तूंचे पृथक्करण करून त्या वस्तूच्या बनावटीचे तंत्र, तिची शुद्धता वा मिश्रण व तो धातू मिळविण्याचे संभाव्य स्थळ इत्यादींचे ज्ञान होऊ शकते. जनावरांची हाडे सापडल्यास त्यावरून माणसाळविलेल्या प्राण्यांचे प्रकार, त्यांचा मांसाकरिता उपयोग केला गेला असल्यास सापडलेल्या हाडांच्या कापणीनुरूप वापलेली हत्यारे, जनावरांचे कोणते भाग कोणत्या घरात सापडले त्यानुसार अन्नपद्धती व समाजाची आर्थिक रचना, हाडांच्या वा खुरांच्या वैशिष्ट्यांनुसार त्या प्राण्यांचा संभाव्य उपयोग इ. अनेक गोष्टींवर प्रकाश टाकता येऊ शकतो. धान्यावरून, अन्नपद्धती, धान्याची जात, हवामान इ. जाणून घेता येतात. मात्र याकरिता पुरावनस्पतिशास्त्रज्ञ, धातुशास्त्रज्ञ भूशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ इ. अनेकांची मदत लागते. कार्बन –१४ व इतर पद्धतींनी कालमापन निश्चित केले असल्याने सांस्कृतिक अनुक्रमालाही जास्त निश्चिती देता येऊ लागली आहे.

आधुनिक उत्खनन-तंत्र स्तरनिबद्ध व क्रमनिबद्ध असते. स्तरवार उत्खननात एकाद्या स्थळी निरनिराळ्या काळांत वस्त्या झाल्याने प्रत्येक वस्तीच्या अवशेषांचे थर एकावर एक साठत जाऊन कालांतराने त्याचे पांढरीचे टेकाड निर्माण होते. एखाद्या वस्तीला आग लागली वा ती पुरामुळे नष्ट झाली, तर त्यातील घरे-दारे पडतात आणि या पडलेल्या घरांत अनेक वस्तू गाडल्या जातात. तिथे पुन्हा वस्ती होते तिचाही नाश झाल्यावर तिचे  अवशेष पहिल्या वस्तींच्या अवशेषांवर पडतात. अशा तऱ्हेने प्रत्येक वस्तीच्या अवशेषांचा थर निर्माण होतो. एकाच थरात सापडलेले अवशेष समकालीन ठरतात, तर खालच्या थरातील अवशेष वरच्या थरातील अवशेषांपेक्षा कालदृष्ट्या आधीच्या काळातले ठरतात. म्हणूनच स्तरवार उत्खननात सर्वांत खालच्या थरातले म्हणजे पहिल्या वस्तीचे अवशेष असतात व सर्वांत वरच्या थरातले अवशेष कालदृष्ट्या शेवटच्या वस्तीचे ठरतात.

स्तरनिबद्ध उत्खनन म्हणूनच अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. प्रत्येक थराचे स्वरूप त्याची घडन व त्या थराची व्याप्ती नीट समजून घेणे आवश्यक असते, त्या थराचा उत्खनित वास्तूशी असलेला संबंध अचूकपणे नोंदणे आवश्यक असते. उदा., घराचे अवशेष सापडल्यास, त्या घराच्या आधीचे थर, घराचे समकालीन थर व घरावरचे थर नीट बघून त्यांत सापडलेल्या वस्तूंचे स्वरूप व त्यांचा काळ ठरविता आल्यास, त्या घराचा काळही ठरविता येतो. साहचर्यानुरूप कालमापन हे तत्त्व उत्खननात महत्त्वाचे ठरते. थराच्या जाडीवरून वा केवळ खोलीवरून त्याचा काळ ठरविता येत नाही. काळ केवळ त्या थरात सापडलेल्या पुराव्यावरून व त्या थराच्या स्थानावरूनच ठरविता येऊ शकतो. थरांच्या स्वरूपावरून काही निष्कर्ष काढता येतात. उदा., मळईंच्या वा गाळवट मातीच्या पुराचा अंदाज बांधत येतो. जळलेल्या लाकडांच्या वा इतर अवशेषांवरून आगीची साक्ष पटते. विटांच्या बांधकामामुळे थरांना लालसर रंग येतो. किंबहुना अशा काळजीपूर्वक केलेल्या निरीक्षणानुसार विविध थरांतील विविध घडामोडींचा अंदाज घेता येऊन त्या घडामोडींचा अनुक्रमही लावता येतो. त्या त्या काळातील जीवनाचा जास्तीत जास्त मागोवा घेण्यासाठी प्रत्येक थरातील सर्व प्रकारचा, लहानसहान, छोटा मोठा पुरावा मिळविणे हाच स्तरीय उत्खननाचा मुख्य उद्देश आहे.

स्तरवार उत्खननाच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. त्याचप्रमाणे उत्खननासाठी उपलब्ध असलेला पैसा व काळ आणि उत्खननासाठी लागणारा संपूर्ण संघ यांचाही उत्खननाच्या स्वरूपाशी संबंध लागतो.

उत्खनन एक प्रकारे शास्त्रीय विध्वंसच होय. कारण प्रत्येक थर व त्यातील पुरावा खणून काढणे याचाच अर्थ तो मूळ संदर्भातून अलग करणे हा होय. म्हणूनच प्रत्येक प्रकारच्या अवशेषांची अचूक नोंद करणे अत्यंत आवश्यक असते आणि ही नोंद त्रिमितीमापन पद्धतीने करावी लागते.

उत्खननाचे मुख्य प्रकार : त्रिमितीमापन करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे उत्खननाचे आयोजन करणे आवश्यक ठरते. उत्खनन प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एक, उदग्र उत्खनन व दोन, आयत उत्खनन. एखाद्या स्थळाचा सांस्कृतिक उत्क्रम जाणून घ्यावयाचा असल्यास उदग्र उत्खनन करण्यात येते. यात पांढरीच्या टेकाडाच्या सर्वांत उंच भागावर एक खड्डा आखून तो अगदी तळाच्या म्हणजे सर्वांत प्रथम वस्तीच्या थरापर्यंत खणण्यात येतो. अथवा एकच खड्डा न घेता टेकडाच्या माथ्यावर एक, उतारावर एक व पायथ्याजवळ एक असे तीन खड्डे योजून ते खणले जातात. यांना पायरी खड्डे असे संबोधिले जाते. यांत सर्वांत वरचा खड्डा उतारावरील खड्ड्यांच्या माथ्याच्या पातळीपर्यंत खणला जातो आणि उतारावरील  खड्डा पायथ्याच्या खड्ड्याच्या माथ्याच्या पातळीपर्यंत खणला जातो. पायथ्याचा खड्डा नैसर्गिक थरापर्यंत खणतात. यामुळे वेळ कमी लागतो आणि पहिल्या वस्तीपासून ते सर्वांत वरच्या म्हणजे शेवटच्या वस्तीपर्यंतचा अनुक्रम मिळतो. यामुळे त्या स्थळांच्या वस्त्यांचे स्वरूप व कालमर्यादा कळून येते, पण प्रत्येक वस्तीची व्याप्ती व संपूर्ण स्वरूप कळून येत नाही. यासाठी आयत उत्खननाची योजना आखणे श्रेयस्कर ठरते. प्रथम उदग्र उत्खनन व नंतर आयत उत्खनन करणे श्रेयस्कर ठरते. कारण उदग्र उत्खननातून सांस्कृतिक अनुक्रम जाणून घेतल्याशिवाय, आयत, उत्खनन करणे हानिकारक ठरते. आयत उत्खननात प्रत्येक वस्तीचे संपूर्ण स्वरूप कळण्यास मदत होते हे खरे असले, तरी त्याकरिता मोठा संघ, बराच पैसा व जास्त कालावधी लागतो. हे ध्यानात घेऊनच त्याची योजना करावी लागते.

उत्खननाची आखणी : प्रत्येक स्थळाच्या स्वरूपासुसार उत्खननाची आखणी करावी लागेते. उदा., स्तूपाच्या टेकाडाच्या उत्खननाची योजना, टेकडाच्या माथ्यावर एक व पायथ्याशी प्रत्येक दिशेला एक असे चार खड्डे योजून करणे फलदायी ठरते. यामुळे स्तूपाच्या माथ्यावर वास्तू–अवशेष व प्रदक्षिणापथाचे अवशेष यांचा मागोवा घेता येऊन त्या स्तूपाच्या स्वरूपाचा आणि त्याच्या परिघाचा व व्यासाचा अंदाज बांधण्यास मदत होते. महाश्मयुगीन शिळावर्तुळांचे उत्खनन वृत्तपाद पद्धतीने करण्यात येते. यात वर्तळाचे चार भाग करून त्यांतील एकमेकांसमोरचे भाग आधी खणण्यात येतात. यामुळे सलग छेद उपलब्ध होऊन शिळावर्तुळाची रचना व त्यात टाकलेल्या वस्तूंचा अनुक्रम कळून येतो. नगरीच्या स्थळाचे उत्खनन खड्ड्यांची जाळी आखून करण्यात येते. तटबंदीयुक्त नगरीचे उत्खनन तटबंदी व नागरी वस्ती यांना जोडणाऱ्या खड्ड्यांचे उत्खनन करून पूर्ण करण्यात येते. यामुळे तटबंदीच्या बंधणीतील विविध अवस्था व नागरी वस्तीच्या विविध अवस्था यांचा एकमेकींशी मेळ घालता येतो.

आधुनिक उत्खनन-तंत्र स्तरनिबद्ध व क्रमनिबद्ध व क्रमनिबद्ध असल्याने, उत्खननाच्या आखणीत निरनिराळ्या ठिकाणी छेद उपलब्ध करून ते शेवटपर्यंत टिकविणे महत्त्वाचे ठरते. कारण स्तरीय छेदांच्या उपलब्धीमुळेच निरनिराळ्या वास्तूंचा क्रम, त्यांचा सापेक्ष काळ व त्यांचा एकमेकींशी असणारा वा नसणारा संबंध कळून येण्यास मदत होते. याशिवाय असे संलग्न छेद ठेवण्यासाठी उत्खनित विभागांत पायरस्ते ठेवल्याने कोणत्याही विभागात पाहणीसाठी चटकन जाता येते.

आधुनिक उत्खननात व्हिलर पद्धतीनुसार खड्ड्यांची आखणी करण्याचा प्रघात पडला आहे. या पद्धतीत सबंध टेकाडावर लाकडी खुंट्या ठोकून चौरस खड्ड्यांच्या जाळीची आखणी केली जाते. अशा चौरसांत चारी बाजूंस मर्यादित जागा सोडून प्रत्यक्ष उत्खननास योग्य अशा खड्ड्यांची योजना केली जाते. या पद्धतीचे दोन फायदे असतात : पहिला फायदा, उत्खनन कोणत्याही दिशेने वाढविता येते आणि दुसरा फायदा, अनेक ठिकाणी स्तरछेद उपलब्ध होऊन उत्खननाच्या कोणत्याही भागात सुलभपणे या छेद भिंतींवरून जाता येते. ही पद्धती सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवलंबिली जात आहे.

उत्खनित खड्ड्याच्या दोन्ही बाजूंस समांतरपणे चौकनी लाकडी खुंट्या सु. पाव मीटर अंतरावर ठोकण्यात येतात. यामुळे शून्य खुंटीपासून मोजमापे घेणे सुलभ जाते. प्रत्येक अवशेषाचे त्रिमितिमापन करण्यास या खुंट्या अपरिहार्य ठरतात. खुंटीपासून लांबी, रुंदी व पातळीपासून खोली हे तीन घटक त्रिमितीमापनात येतात. प्रत्येक वेळी खड्ड्यांच्या माथ्यापासून खोली मोजणे अवघड जाते. म्हणून एका विशिष्ट पातळीपासून दर दीड मीटरवर वा एकेका मीटरवर खिळे, दोरा व पाणसळी यांच्या साहाय्याने गृहीतरेषा छेदाच्या भितींवर ठोकाव्यात. या गृहीतरेषांच्या साहाय्याने उत्खनित वस्तूची खोली मोजणे सुलभ जाते.

पुरातत्त्वीय उत्खननाचा मुख्य हेतू मानवी संस्कृतीच्या विकासाचा सर्वंकष पुरावा मिळविणे हा असल्याने, असा पुरावा प्राचीन वस्त्त्यांचे अवशेष असलेल्या टेकडावर कोणत्या ठिकाणी मिळेल याचा विचार, उत्खनन योजताना करणे आवश्यक ठरते. या दृष्टीने टेकडावरील सर्वांत उंच व अविकृत जागा निवडली जाते. यामुळे जास्तीतजास्त वस्त्यांचा पुरावा अविकृत स्वरूपात उपलब्ध होऊ शकतो. मात्र ही उंच जागा वा इतर योग्य स्थळ निवडण्याआधी त्या टेकाडाचा व त्याच्या परिसराचा परिघीय आलेख तयार करणे आवश्यक असते. या आलेखामुळे टेकडाच्या उंच-सखल पातळ्या ताबडतोब लक्षात घेऊन निरनिराळ्या जागी उत्खननाचा उद्देश ध्यानी घेऊन खड्ड्यांची आखणी करता येते.

उत्खनन सुरू करण्या आधी त्यासाठी आवश्यक असणारे अर्थसाहाय्य, उपकरणे व तज्ञांची संघटना यांची तयारी करणे आवश्यक ठरते. याशिवाय उत्खननाच्या काळात सदैव हजर असणारे निरीक्षकही मोठ्या संख्येने मिळवावे लागतात. यासाठी विद्यापीठातील पुरातत्त्व विद्या विषयातील स्नातकोत्तर विभागाचे विद्यार्थी, शिकाऊ निरीक्षक म्हणून उपयोगी पडतात. उत्खननाच्या निदेशकावर सबंध उत्खननाची योजना करणे, त्यात सुसूत्रता ठेवणे, अवशेषांची नोंदणी व्यवस्थित होत आहे, हे पाहणे व निरनिराळ्या तज्ञांकड़ून सुयोग्य ती मदत मिळविणे, त्याचप्रमाणे उत्खनन शिबिराची प्रशासनविषयक व्यवस्था चोख ठेवणे, या विविध कामांची जबाबदारी येऊन पडते.

उत्खननासाठी हाती घेण्यात येणाऱ्या खड्ड्याच्या कामाची सुरुवात अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. स्तरवार उत्खननात स्तरांचे स्वरूप अज्ञात असल्याने, योजलेल्या खड्ड्यांच्या एका कोपऱ्यात १ मी. × १ मी. असा भाग निवडून तो अत्यंत काळजीपूर्वक खणतात. या खणण्यातून पहिल्या थराचे स्वरूप जाणून घेतल्यावर मगच संबंध खड्ड्यात तो थर खणला जातो. त्यानंतर या लहान ‘चाचणी’ अथवा ‘नियामक’ खड्ड्यात खणून दुसऱ्या थराचे स्वरूप जाणून घेतले जाते. यामुळे थरांची म्हणजेच पर्यायाने स्तरांतील अवशेषांची सरमिसळ होत नाही व प्रत्येक थरातील अवशेष त्या त्या थरानुसार वेगळे ठेवता येतात.

उत्खनकाने प्रत्येक थराचे स्वरूप, त्याचे घटक, रंग, पोत आणि वैशिष्ट्ये यांची नोंद करणे आवश्यक असते. प्रत्येक थराचा माथा व बूड हे सुरीच्या टोकाने रेघ मारून स्पष्ट केले जातात व प्रत्येक थराला क्रमांक दिला जातो. त्या त्या क्रमांकाची चिठ्ठी प्रत्येक थरावर खिळ्याच्या साहाय्याने ठोकतात. उत्खनित खड्ड्याचा छेद सरळसोट ठेवणे आवश्यक असते त्यामुळे त्याचे छायाचित्रण करणे सुलभ जाते.

प्रत्यक्ष उत्खननासाठी कुदळ, फावडे, छोटे फावडे, सुऱ्या विविध प्रकारच्या कुंचले, ओळंबा, घमेली इ. साहित्य जरूर असते. सबंध खड्डा एकदम न खणता, त्याचे लहानलहान चौरस आखून ते खणले जातात. खणलेली माती अत्यंत काळजीपूर्वक चाळून, पाहून जे जे अवशेष मिळतील ते ते सर्व निवडून बाजून ठेवून त्या प्रत्येक अवशेषला चिठ्ठी बांधली जाते. या चिठ्ठीवर उत्खनित स्थलाचे नाव, दिनांक, वस्तूचा प्रकार ज्यापासून ती वस्तू बनविली गेली त्या पदार्थाचे  नाव, शून्य खुंटीपासूनची लांबी, रुंदी, खोली व स्तरक्रमांक इत्यादींची अचूक नोंद करणे आवश्यक असते.

काही वैशिष्ट्यपूर्ण अवशेषांची नोंदणी त‌त्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌स्थलीच करणे आवश्यक असते. उदा., मानवी वा प्राण्यांचा सांगाडा, वैशिष्ट्यपूर्ण मृत्पात्री व नाणे याकरिता छायाचित्रणाचा व आरेखनाचा उपयोग केला जातो. या सर्वांची अचूक नोंद निरीक्षकाने आपल्या नोंदवहीत करणे महत्त्वाचे असते. सांगाड्यासारखा अद्वितीय पुरावा सापडल्यास शिकाऊ उमेदवारांना बाजूस करून जबाबदार निदेशकाने तो पुरावा अत्यंत काळजीपूर्वक उघडा करावा.

उत्खननात विशेषत: भारतीय आणि मध्यपूर्वेकडील भागांत मृत्पात्रांचे अवशेष फार प्रमाणात आढळतात. त्या प्रत्येकाला चिठ्ठी बांधून ठेवणे शक्य नसते व आवश्यकही नसते. याकरिता खापर चौकाची योजना केली जाते. लहानलहान दगड गोटे लावून एक चौरस मी. आकाराच्या चौकाची जाळी याप्रमाणे जाळ्या तयार करण्यात येतात. यांतील प्रत्येक चौरस एका थराचे प्रतिनिधित्व करतो. याप्रमाणे पहिल्या थरातील खापरे पहिल्या चौकात, दुसऱ्या  थरातील दुसऱ्या चौकात अशा तऱ्हेने टाकली जातात. ती क्षारविरहीत पाण्याने व मऊ कुंचल्याने साफ करून अभ्यासासाठी तेथेच ठेवली जातात. यानुसार कोणत्या थरात कोणती खापरे सापडली, त्यांची संख्या, पोत, त्यांवरील चित्रकारी, त्यांचे आकार, त्यांची  बनावट या सर्वांची माहिती करून घेता येते. वैशिष्ट्यपूर्ण व ज्यांचा आकार पूर्ण करत येईल, ती त्याच चौकात वेगळी ठेवली जातात. प्रत्येक खापरावर आतल्या पृष्ठभागावर ते खापर ज्या ठिकाणी सापडले त्याची पूर्ण नोंद व क्रमांक पक्क्या काळ्या शाईने सुबकपणे लिहिला जातो. अशा तऱ्हेने वृत्तांत लिखाणास योग्य अशी खापरे थरानुसार कापडी पिशव्यांत बांधून त्यांवर स्थलनिदर्शक चिठ्ठ्या बांधण्यात येतात.

उत्खनित पुराव्याचे आरेखन व छायाचित्रण अचूक व समजण्यास सुयोग्य त्याचप्रमाणे प्रत्यक्ष उत्खनित स्थळी करणे अपरिहार्य ठरते. इतर पुरावा अभ्यासासाठी इतरत्र हलविता येतो परंतु उत्खनित वास्तु- अवशेष तसे हलविता येत नसल्याने सुयोग्य प्रमाणात त्याचे आरेखनआलेख व छेद करणे क्रमप्राप्त ठरते.

उत्खननाच्या ठिकाणी प्राथमिक प्रयोगशाळा असणे फलदायी ठरते. काही अवशेष अत्यंत ठिसूळ अवस्थेत सापडतात. त्यांना तत्‌स्थलीच सुरक्षित करणे व मजबूत करणे आवश्यक असते. काही अवशेष– उदा., नाणी– त्याठिकाणी स्वच्छ करणे महत्त्वाचे ठरते. याकरिता मूलभूत रसायने व उपकरणे यांनी सुसज्ज क्षेत्रीय प्रयोगशाळा उभारणे अपरिहार्य ठरते.

प्रयोगशाळेप्रमाणेच छायाचित्रण कसे झाले आहे, हे ताबडतोब पाहण्यासाठी क्षेत्रीय छायाचित्र प्रक्रिया शाळा सुसज्ज असणे अत्यंत आवश्यक असते. उत्खनित पुराव्याचे छायाचित्रण केल्यावर ते चित्रण कसे झाले आहे हे प्रक्रिया् करून पाहण्या आधीच तो पुरावा खणून काढून संदर्भरहित केला गेला व छायाचित्रण चांगले झाले नाही, असे नंतर आढळून आले तर ती मोठी चूक ठरते. कारण तो पुरावा छायाचित्रणासाठी स्वस्थानी सुयोग्य संदर्भात पुन्हा ठेवता येत नाही. म्हणूनच छायाचित्रण, निदान महत्त्वपूर्ण अवशेषांचे, त्यात स्थळी करून ते यशस्वी झाले आहे किंवा नाही, हे ताबडतोब पारखून घेणे सयुक्तिक ठरते.

उत्खननात मानवाने बनविलेल्या वा वापरलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध होतात. वास्तू, अलंकार, मृत्पात्रे, शस्त्रे, दफने, खेळणी, धान्य वा धान्याचे ठसे, मातृका, मूर्ती, नाणी, जनावरांची हाडे, सूक्ष्म पराग अशा विविध तऱ्हेचा पुरावा सर्वसाधारणपणे उपलब्ध होतो. अर्थात हे सर्व त्या उत्खनित स्थळाच्या स्वरूपावर अवलंबून असते परंतु या विविध प्रकारच्या पुराव्यांचा अभ्यास व त्यांचा अर्थबोध एकाच तज्ञाला वा उत्खननाच्या निदेशकाला होईल, अशी शक्यता फार कमी असते. याकरिता उत्खननाच्या कामी विविध शास्त्रज्ञांची त्याचप्रमाणे तंत्रज्ञांची संघटना मदत अपरिहार्य झालेली आहे. सर्वेक्षक, छायाचित्रकार, आरेखक, यांबरोबर मृत्पात्रज्ञ, पुरावनस्पतीशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ, इतिहासज्ञ, अभियंता, जतनशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ, भूवैज्ञानिक, रसायनतज्ञ, पुराभिलेखवेत्ता, प्राणिशास्त्रज्ञ इ. अनेकांची मदत लागते. याशिवाय उत्खनन शिबिराची व्यवस्था चोख ठेवणारे कारभारी, उत्खनित पुरावा नीट आवेष्टन करून बांधणारे तज्ञ, अर्थव्यवस्था सांभाळणारे कर्मचारी, त्याचप्रमाणे संपर्क अधिकारी यांचीही मदत पुरातत्त्वीय उत्खननाच्या कामी मोलाची ठरत आहे. पुरातत्त्वीय संशोधन हे एकट्यादुकट्याचे काम राहिले नसून ते सांघिक संशोधन झालेले आहे. याशिवाय सर्वसामान्य जनतेत या संशोधनाबाबत फार मोठे कुतुहल व जिज्ञासा उत्पन्न झाली असल्याने अशा संशोधनात उपलब्ध झालेली माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य आवश्यक ठरलेले आहे.

पुरातत्त्वीय उत्खननाचे संपूर्ण वृत्तांत छायाचित्रांसह लवकरात लवकर प्रसिद्ध करणे व उत्खनन चालू असता प्रदर्शने भरवून विद्यार्थ्यांना व इतरांना त्या संबंधी माहिती देणे हे उत्खननाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. या दोन्ही बाबतींत पुण्याच्या डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट- ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने अत्यंत प्रशंसनीय कामगिरी बजाविली आहे.

पुरातत्त्वीय उत्खननांच्या बाबतीत भारताने बरीच प्रगती केली असली, तरी अद्याप या क्षेत्रातील संशोधनाला अधिक वाव आहे. जनरल अलेक्झांडर कनिंगहॅम, सर जॉन मार्शल, माधो स्वरूप वत्स, रावबहादूर का. ना. दीक्षित, सर मार्टिमर व्हीलर, अमलानंद घोष, बी. बी, लालं, म. न. देशपांडे, ह. धी. सांकलीया इ. पुरातत्त्वज्ञांनी या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. पुणे, सागर, प्रयाग, वाराणसी, बडोदे, पाटणा व कलकत्ता येथील विद्यापीठांनी पुरातत्त्वीय उत्खनने भारतातील विविध भागांत केली असली, तरी पाश्चिमात्य राष्ट्रांच्या संशोधन संस्थांच्या तुलनेत तांत्रिक व शास्त्रविषयक बाबींत सुधारणा होण्यास बराच वाव आहे. भारतात फक्त अहमदाबाद व लखनौ येथेच कार्बन–१४ पद्धतीने कालमापन करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. इतर शास्त्रीय कालमापन पद्धतींचा वापर भारतात अद्यापि व्हावयाचा आहे. तसेच उत्खनित मातीतून ‘फ्लोटेशन’ तंत्राने धान्य बीजांचा वा परागांचा आढळ करून घेणे, हे तंत्रसुद्धा भारतात फार कमी प्रमाणावर आतापर्यंत केले गेले आहे. पर्यावरणीय संशोधन सुद्धा फारसे प्रगत झालेले दिसत नाही. संख्यातंत्र पृथक्करणावरून धातुविज्ञान, वसाहतविज्ञान इ. क्षेत्रांत अमेरिकन तंत्रज्ञ पुरातत्त्व संशोधनात मोलाची कामगिरी करीत आहेत. कदाचित भारतात झालेले आतापर्यंतचे उत्खनन बऱ्याच प्रमाणात प्राचीन भारतीय संस्कृती व प्राचीन अभिजात वाङ्‌मय यांच्या अभ्यासकांनी केल्यामुळे त्यांत शास्त्रीय दृष्टीकोन आला नसावा.

पुरातत्त्वीय उत्खनन-संशोधनात सागरी पुरातत्त्वविद्या या एका नव्या शाखेचा उदय झाला आहे. जमिनीखालच्या संशोधनाप्रमाणेच सागराच्या पोटात शिरून बुडालेल्या प्राचिन अवशेषांचा शोध घेणे, त्यांचे छायाचित्रण व आरेखन करणे, ही कामे सागरी पुरातत्त्वविद्या या शाखेकडून अपेक्षित आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इलायस स्टेडीएटिस या ग्रीक नावाड्याला क्रीट बेटाजवळ असलेल्या अंदिकिथिर या बेटानजीक समुद्रात बुड्या मारताना अचानकपणे समुद्रात बुडालेल्या रोमन अवशेषांचा शोध लागला. त्यानंतर भूमध्यसमुद्रातही या सागरी पुरातत्त्वाने बुडालेली अनेक रोमन जहाजे, मद्यकुंभ, पुतळे इत्यादींचा शोध लावला गेला.गेल्या काही वर्षांत फ्रान्स व इटलीच्या किनारपट्टीचे समुद्रात बुडालेल्या भागांचे शास्त्रीय नकाशे तयार करण्यात येऊन त्यांत प्राचीन काळी बुडालेल्या अनेक नावांची व जहाजांची जागा दाखविण्यात आली आहे. ॲल्फ्रेद मेरलँ, एम्.सी. हान आणि झाक-इन्ह कोस्तू या संशोधकांनी सागरी पुरातत्त्वाविषयक संशोधन अद्यापि झालेले नाही. ते झाल्यास काही प्राचीन बंदरांचा शोध लागू शकेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या दोन शतकांत विविध देशांत असंख्य उत्खनने झाली. त्यांपैकी शास्त्रीय व पुरातत्त्वीय अवशेषांच्या दृष्टीने महत्त्वाची उत्खनने पुढील प्रमाणे होत : महत्त्वपूर्ण पुरावा व तांत्रिक अचूकपणा या दृष्टीने अन्यांग (चीन), अर (इराक), जेरीको (पॅलेस्टाइन), जोमोन (जपान), ट्रॉय (तुर्कस्तान), नॅकदा (ईजीप्त), तेरा अमाता (फ्रान्स) व पॉँपेई (इटली), भारतात कालिबंगा, अहाड व बागोर (राजस्थान), हस्तिनापूर, अहिच्छत्र (उत्तरप्रदेश), नावडातोडी (मध्यप्रदेश), इनामगाव (महाराष्ट्र), टेक्कलकोटा (कर्नाटक) ही उत्खनने उल्लेखनीय आहेत. (चित्रपट २९).

संदर्भ : 1. Atkinson, R. J. C. Field Archaeology, London, 1950.

2. Ceram, C. W. A Picture History of Archaeology, London,1958.

3. Charles- Picard, Gilbert, Ed. Larousse Encyclopedia of Archaeology, New York, 1972.

4. Clark, G. Prehistoric Societies, London, 1965.

5. Crawford O. G. S. Archaeology in the Field, London, 1953.

6. Daniel, Glyn, A Hundred and Fifty Years of Archaeology, London, 1972.

7. Leone, M. P. Ed. Contemporary Archaeology, London, 1975.

8. Roy, S. Indian Archaeology from Jones to Marshal : Ancient India No.9, Delhi. 1953.

9. Taylo, Joan du Plat, Marine Archaeology, London, 1965.

10. Wheeler, R. E. M. Archaeology from the Earth, London, 1961.

११. देव, शां. भा. पुरातत्त्वविद्या, पुणे, १९७६.

देव, शां. भा.

पुरातत्त्वीय उत्खनने