जोर्वे : महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरपासून पूर्वेस सु. ८ किमी.वर प्रवरा नदीकाठी ते वसले आहे. अकराव्या शतकातील काही शिलालेखांत याचा ‘जउरग्राम’ असा उल्लेख येतो. स्थानिक परंपरेनुसार ‘जरासंधनगरी’ म्हणून हे ओळखले जाते. प्राथमिक सर्वेक्षणात येथे ताम्रपाषाणयुगीन मातीची भांडी आणि गारगोटींच्या छिलक्यांची हत्यारे सापडली. त्यामुळे महाराष्ट्रात ताम्रयुग झालेच नाही, या मताचे खंडन झाले. १९५०–५१ साली केलेल्या उत्खननात येथे तांब्याच्या काटकोन चौकोनी व चपट्या कुऱ्हाडी, गारगोटींच्या छिलक्यांची शेकडो हत्यारे, राखी रंगाच्या मडक्यात पुरलेले लहान मुलांचे सांगाडे व तांबड्या पृष्ठभागावर काळ्या रंगात नक्षी काढलेली पक्क्या टणक भाजणीची व चाकावर घडविलेली तोटीची मृत्पात्रे सापडली. मृत्पात्रांत तोटीच्या मडक्याशिवाय वाडगे, कळशा इ. प्रकार आहेत. यांचा काळ सर्वसाधारणतः इ. स. पू. १५००–१००० असावा, असा तज्ञांनी प्रथम कयास केला परंतु या उत्खननानंतर अशाच तऱ्हेचा ताम्रपाषाणयुगीन पुरावा महाराष्ट्रात इतरत्र अनेक ठिकाणी मिळाला.

जोर्वे संस्कृतीचे तोटीचे भांडे, इ.स.पू.सु. १५००-१०००.

लहान मुलाचे दफनकुंभातील दफन, इनामगाव, अहमदनगर जिल्हा.

अशा तऱ्हेचा पुरावा प्रथम जोर्वे येथे सापडल्याने या मृत्पात्रांना ‘जोर्वे मृत्पात्रे’ व या संस्कृतीला ‘जोर्वे संस्कृती’ अशी नावे देण्यात आली. व ती आता प्रचलित झाली आहेत. गेल्या पंचवीस वर्षांतील समन्वेषण व उत्खनने यांनुसार या जोर्वे संस्कृतीची व्याप्ती महाराष्ट्रातील तापी, गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा, कृष्णा गिरणा, मुळा इ. नद्यांच्या खोऱ्यात, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यांत दिसून येते. जोर्वे, नेवासे, इनामगाव येथील उत्खननांत या संस्कृतीचे व्यापक दर्शन झाले आहे. चाकावर घडविलेली, खणखणीत आवाजाची व प्रामुख्याने भौमितिक नक्षीकाम असलेली मृत्पात्रे, कुडाची काटकोन चौकोनी व गोल आकाराची घरे, गहू व बार्ली या धान्यांची लागवड, धान्य साठवणीस बांधलेल्या वेताच्या व मातीच्या कणग्या, मुलांचे दोन दफनकुंभातील व प्रौढांचे आडव्या रांजणातील दफन, तांब्याची तसेच दगडाची घोटीव व गारगोट्यांच्या छिलक्यांची हत्यारे, शेतीकरिता बंधारा-धरणाची बांधणी व नदीतून नावांच्या साहाय्याने वाहतूक इ. जोर्वे संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरलेली आहेत. या संस्कृतीच्या चांदोली, सोनगाव,  इनामगाव या ठिकाणांच्या उत्खननांत उपलब्ध झालेल्या कार्बन १४ कालमापनानुसार या संस्कृतीचा काळ इ. स. पू. सु. चौदावे शतक ते इ. स. पू. नववे शतक असा निश्चित करता आलेला आहे.

संदर्भ :

1. Sankalia, H. D. Deo, S. B. Report on the Excavations at Nasik and Jorwe, Poona, 1955.

२. देव, शां. भा. महाराष्ट्र-एक पुरातत्त्वीय समालोचन, मुंबई, १९६८.                                            

देव, शां. भा.