भीमबेटका : मध्य प्रदेश राज्यातील प्रागैतिहासिक कलेसाठी प्रसिद्ध असलेले रायसेन जिल्ह्यातील एक स्थळ. ते भोपाळच्या दक्षिणेस सु. ४५ किमी.वर विंध्य पर्वताच्या रांगांत वसले आहे. येथील सु. १० चौ.किमी. परिसरात आठशे प्रस्तर गुहा असून त्यांपैकी पाचशे प्रस्तरालयांत चित्रे काढलेली आहेत. या प्रस्तर गुहांचे समन्वेषण विक्रम विद्यापीठाचे संशोधक-प्राध्यापक वि. श्री. वाकणकर यांनी प्रथम केले आणि तत्संबंधी एक शोधनिबंध १९५५ मध्ये प्रसिद्ध केला पण तेथे विस्तृत प्रमाणावर उत्खनन होईपर्यंत या गुहा-चित्रांकडे विद्वानांचे फारसे लक्ष गेले नाही. पुढे येथे विक्रम विद्यापीठ (उज्जैन) आणि डेक्कन कॉलेज (पुणे) यांच्या वतीने अनुक्रमे वाकणकर व व्ही. एन्. मिश्र आणि त्यांचे सहकारी यांनी उत्खनन केले. या उत्खननात अश्मयुगीन उपकरणांपासून मध्याश्मयुगापर्यंतच्या काळातील विविध अवशेष उपलब्ध झाले. त्यानंतर वाकणकरांबरोबर श्रीमती सुझान हास व डी. एच्. गॉर्डन यांनी या प्रागैतिहासिक स्थळाचे सर्वेक्षण करून अभ्यास-संशोधनास चालना दिली. त्यांचे अनुकरण श्यामकुमार पाण्डे, वर्मा, यशोधर मठपाल इ. विद्वानांनी केले. त्यामुळे येथील चित्रवीथिकांच्या संशोधनास अधिक चालना मिळाली आणि विद्वानांचे लक्ष या प्रागैतिहासिक चित्रकलेकडे गेले. १९७०-१९८० या दहा वर्षांत विक्रम विद्यापीठाने येथील अनेक स्थळांचे उत्खनन केले. त्यांत मानवी उपकरणांची उत्क्रांती ज्ञात झाली शिवाय उत्तर पुराणाश्मयुगीन मानवाच्या कवटीचा एक भागही मिळाला.

भीमबेटका येथील अवशेषांत अश्मयुगीन हत्यारांपेक्षा गुंफा व शैलाश्रये सापडली आणि त्यांत शैलाश्रयी चित्रकलेचे अनुपम भांडार उपलब्ध झाले. या शैलाश्रयांतील चित्रे एकाच काळातील नसून ती भिन्न कालखंडांतील आहेत. त्यांतील अतिप्राचीन चित्रांचा काळ परस्पर उपलेपन पद्धतीच्या आधारे उत्तर पुराश्मयुग व मध्याश्मयुग असा ठरविण्यात आला आहे. चित्रशैली, तंत्र व अध्यारोपन (सुपरइंपोझिशन) या आधारांवर वि. श्री. वाकणकर यांनी या चित्रांचे सात कालखंड कल्पिलेले आहेत : १. उत्तर पुराश्मयुग (२५०००-१५००० इ. स. पू.) २. मध्याश्मयुग (१५०००-६००० इ. स. पू.) ३. ताम्रपाषाणयुग (६०००-३००० इ. स. पू.) ४. नवाश्मयुग (३०००-२५०० इ. स. पू.) ५. आद्यैतिहासिक काळ (२५००-१८०० इ. स. पू.) ६. मध्य ऐतिहासिक काळ (१८००-९०० इ. स. पू.) व ७. उत्तर ऐतिहासिक काळ (९००-५०० इ. स. पू.).

येथील चित्रांचे विषय विविध आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांचा या चित्रांतून जणू एक चित्रपटच पाहावयास सापडतो. त्यामुळे तत्कालीन मानवाच्या जीवनपद्धतीची त्यांतून माहिती मिळते. चित्रवीथीत रानगवे, बैल, हत्ती, वाघ, हरिण, डुक्कर, गेंडा, नीलगाय, मोर, सांभर असे अनेक प्राणी असून क्वचित काही ठिकाणी पक्षी चितारलेले आहेत.शिकारीचे अनेक प्रसंग आहेत. त्यांत काही दृश्यांची पुनरावृत्ती आढळते. उदा., डुकरांच्या शिकारीचे चित्रण तसेच धावणाऱ्या खेकड्याच्या मागे मानव धावत आहे इत्यादी. हरिण, ससा व वन-वृषभ यांच्या आकृत्यांच्या पुनरावृत्तीवरून वाकणकरांनी आदी मानवांची ही गणचिन्हे असावीत आणि त्यांची आपापसांत युद्धे होत असावीत, हे अनुमान काढले आहे. दुसऱ्या एका चित्रात चार बालकांना जमिनीत पुरून त्यांच्या शवांभोवती एक पुरुष लाकडाचे कुंपण लावीत आहे व जवळच दोन स्त्रिया विलाप करीत आहेत, असे हृदयभेदक चित्र काढले आहे. काही चित्रांतून केवळ मानवी आकृत्यांचे रेखाटन आढळते. यांत स्त्री-पुरुष दोघेही आहेत. शिकारींच्या दृश्यांत-चित्रांत-व्यक्तिगत आणि सामूहिक प्रयत्‍न दाखविले आहेत. शिकारीच्या वा नृत्याच्या वेळी मुखवटे परिधान करण्याची प्रथा असावी. मुखवटे व शिरोभूषणे कलाकुसरयुक्त असत. गेंडा, वृषभ, हरिण, वानर आदी प्राण्यांचे मुखवटे मानवाने धारण केलेली चित्रे येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच सामूहिक शिकारीच्या वेळी विशेष पोषाखात एक प्रमुख व्यक्ती वावरताना आढळते. बहुधा ती या लोकांची पुढारी व्यक्ती असावी. प्राण्यांचे कळप कड्यावरून खाली कोसळताना किंवा पळताना दाखविले आहेत. यांतील प्राण्यांची हालचाल नैसर्गिक वाटते.

पाठीला टोपली व गाठोडी बांधून अन्नसंकलनासाठी भटकणाऱ्या स्त्रियांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यांशिवाय युगुले, मातृका देवी, सुफलता व प्रजनन यांची प्रतीकात्मक चित्रे, गर्भवती, संतती-पालक स्त्रिया यांची चित्रे बरीच आहेत. तीन-चार चित्रे कामक्रीडेविषयी आहेत. स्त्री-प्रतिमांत बहुविध अलंकारांचे दर्शन घडते. एकूण चित्रांच्या अलंकरणात भौमितिक आकृत्यांचे मेहंदी अलंकरण वारंवार आढळते.

ताम्रपाषाणयुगातील चित्रविषय तत्कालीन कृषी संस्कृतीचे द्योतक असून त्या वेळची मृद्‌भांड्यांवरील कलाकुसर आणि या चित्रांतील प्रतिमाने (ज्ञापके) एकच आहेत परंतु या चित्रांत प्राचीन काळातील सुलभता व जोष आढळत नाही. येथील प्राण्यांचे चित्रण नैसर्गिक-वास्तववादी असून मानवी आकृत्या एका विशिष्ट शैलीत वा ढबीमध्ये रेखाटल्या आहेत.

चित्रे एकरंगी, दुरंगी व बहुरंगी आहेत. पिवळा, लाल, तपकिरी व काळा या रंगांचा चित्रणात सर्रास उपयोग करण्यात आला आहे. काही गुहांत केलेल्या उत्खननात लघु-अश्मास्त्रे सापडली असल्यामुळे मध्याश्मयुगीन मानव या गुहांत वस्ती करून रहात असावा, हे अनुमान निर्विवादपणे करता आले. येथे एकूण १६ शैलाश्रयांत विक्रम, पुणे, बाझेल व सागर या विद्यापीठांनी उत्खनन केले. या उत्खननांत तेरा मानवी सांगाडे सापडले. त्यांतील सर्वांत प्राचीन सांगाडा ३ ए २८ या क्रमांकाच्या शैलाश्रयात सापडला. भारतातील आतापर्यंत सापडलेल्या मानवी अवशेषांत हा सांगाडा सर्वांत प्राचीन असावा, असा पुरातत्त्ववेत्त्यांचा कयास आहे कारण त्याच्या गळ्यात शहामृगाच्या अंड्यांचे मणी आहेत. कार्बन-१४ पद्धतीने महाराष्ट्रातील पाटण (जि. धुळे) येथील शहामृगाच्या अंड्यांचा काळ इ.स.पू. २०००० आणि राजस्थानातील चंद्रसेल येथील अंड्यांचा काळ इ.स.पू. ३८९०० एवढा आहे. उत्खननांत उत्कीर्ण अस्थी, अलंकरणे इत्यादींपेक्षा अधिक अवशेष व उपकरणे सापडली. त्यांचा काळ गोलाश्म उपकरणांपासून (सु. २० लक्ष इ.स. पू.) ३००० वर्षांपूर्वीपर्यंतचा आहे.

येथील चित्रशैलीविषयी यशोधर मठपाल यांनी चिकित्सक अभ्यास करून काही निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. ते असे : या चित्रांची एकूण धाटणी रेखात्मक असून गतिमानता हा या चित्रांचा स्थायीभाव आहे. तांत्रिक दृष्ट्या येथील शैलीचे चार प्रकार संभवतात : खडूसारख्या शुष्क रंगांची क्रेयॉन चित्रशैली ओली पारदर्शक रंगचित्रशैली ओली अपारदर्शक किंवा चिकणरंग (टेंपेरा) चित्रशैली आणि तुषाररंग (स्प्रे-कलर) चित्रशैली. यांपैकी क्रेयॉन ही चित्रशैली भारतात क्वचित आढळते.

संदर्भ: 1. Agrawal, D. P. The Archaeology of India, London, 1982.

2. Neumayer, Erwin, Prehistoric Indian Rock Paintings, Bombay, 1983.

3. Wakankar. V. S. Brooks, R. R. Stone Age Pcinting in India, New Haven, 1975.

४. गुप्त, जगदीश, प्रागैतिहासिक भारतीय चित्रकला, प्रयाग, १९६४.

५. वाकणकर, वि. श्री. जोशी, सु. ग. संपा. मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक-१९७६, पुणे.

देशपांडे, सु. र.