संघोळ : पंजाबमधील एक प्राचीन बौद्ध अवशेषांचे स्थळ. ते लुधियाना जिल्ह्याच्या समराल या तालुक्यात वसले आहे. आधीचे नाव संघपूर, स्थानिक नाव उछापिंड. सिंधू संस्कृतीच्या काळापासून येथे वस्ती असल्याचे पुरावे आढळतात. समाट अशोकाच्या काळी येथे स्तूप आणि संघा-रामांची ( विहारांची ) उभारणी झाली. कुशाणांच्या राजवटीत ( इ. स. पहिले ते तिसरे शतक ) संघोळ हे भरभराटीला आलेले व्यापारी केंद्र होते. येथे सापडलेल्या नाण्यांवरून आणि मुद्रांवरून धर्म आणि कला यांबाबतींतही त्यास महत्त्व होते, असे अनुमान केले जाते. येथील काही मुद्रांवर विष्णू , शिव यांच्या प्रतिमा असून महिषासुरमर्दिनीचे एक पक्वमृदा शिल्पही येथे मिळाले. इ. स. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात तोरमाणच्या नेतृत्वाखालील नृशंस हूणांनी हे गाव उध्वस्त केले असावे. सातव्या शतकात चिनी यात्रेकरू यूआनच्वांग ( ह्यूएनत्संग ) याने वर्णन केलेल्या शे-टो-टु-लु येथे दहासंघाराम होते पण ते त्यावेळी उध्वस्त झाले होते. तसेच थोडेच बौद्धजन येथे वास्तव्याला आहेत. जैसलमीरच्या राजपुत्रांनी येथे वस्ती केल्याचे आढळते.

या गावात किल्ला, त्याभोवतीचा खंदक, गावाभोवतीची मातीत बांधलेली संरक्षक भिंत, तिच्यापासून ६० मी. अंतरावरील स्तूप आणि विहार इ. वास्तंचे अवशेष उत्खननात आढळले आहेत. काळाच्या पडदयाआड गेलेले इतिहास-संपन्न असे हे गाव एकदम प्रकाशात आले ते १९८५ साली उत्खननात सापडलेल्या स्तूपावशेषांमुळे आणि विशेषतः त्याच्या सभोवतीच्या प्रदक्षिणापथाच्या कठडयावरील ( वेदिका ) शालभंजिकांच्या शिल्पांमुळे.

येथील १६ मी. व्यासाचा विटात बांधलेला स्तूप २.३५मी. उंचीच्या टेकाडावर आहे. तो १७ मी. चौकोनी अधिष्ठानावर असून बरीच पडझड झालेल्या अवस्थेत आहे. त्याचा पदविन्यास धर्मचकाच्या आकाराचा असून त्याची रचना, तीन एककेंद्री वर्तुळे {त्रिज्यांच्या साह्याने जोडलेली, अशा पद्धतीची आहे. येथे तुंबा आणि पहिले वर्तुळ यांच्यामध्ये १२ आरे, दुसऱ्या वर्तुळापर्यंत २४ आरे आणि तिसऱ्या वर्तुळाला जोडणारे ३६ आरे, अशी व्यवस्था आहे. हे सारे बांधकाम अर्थातच विटांचे आहे. या स्तूपात ठेवलेल्या अवशेष- पात्रात मानवी दात आणि अस्थी मिळाल्या. या पात्राच्या झाकणावर ‘उपासक अयभद्रस’ असे नाव कोरलेले आहे. अक्षरवटिकेवरून हे इ. स. पहिल्या शतकातील असावे.

या स्तूपाभोवती प्रदक्षिणापथाचा जो कठडा ( वेदिका ), होता त्याच्या सर्व भागावर उत्तम शिल्पे कोरलेली होती. ती एकूण ११७ होती पैकी ४ शिल्पे कोनस्तंभावर ( कोपऱ्याच्या खांबावर ), ५८ थबावर ( उभ्या खांबावर ), ७ व्दिमुखी स्तंभांवर, ३५ सूचींवर (आडव्या, दोन उभ्या स्तंभांना जोडणाऱ्या, पट्टिकेवर ) आणि १३ उष्णीषावर ( कठडयाच्या शीर्षस्थानी असलेल्या आडव्या पट्ट्यावर ) आहेत. ही सारी शिल्पे मथुराशैलीतील असली, तरी ती थोडया हलक्या प्रतीची, कमी उठावातील आणि कमी सफाईदार आहेत. शिल्पशास्त्राप्रमाणे येथील स्त्री-शिल्पे शालभंजिका या नावाने ओळखली जातात. यांनाच वृक्षिका वा यक्षी असेही संबोधिले जाते. अगदी बारीक अशा ठिपक्यांच्या तांबडया वालुकाश्मावर ही सर्व शिल्पे कोरलेली आहेत. यात दर्पणधारी ( आरशात पहाणारी ) यक्षी, नटी, सदयस्नाता (कर्पूरमंजिरी) आई व बालक, यक्षारोही, अशोकदोहद, मधुपानमग्ना, प्रसाधिका, दुग्धधारिणी, अलस्यकन्या, शृंगाररचयिता, पद्मगंधा, उपासिका, बासरी व मदयपात्रधारिणी अशा अवस्थांतील स्त्रियांची मोहक शिल्पे आहेत. संघोळ हे गाव ऐतिहासिक अवशेषाने समृद्ध असून उपरोल्लेखित स्त्री-प्रतिमांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. संघपूर या प्राचीन नावावरून बौद्धसंघाचे येथे प्राबल्य असावे, असे तज्ञांचे मत आहे.

संदर्भ : Gupta, S. P. Kushana Sculptures from Sanghol, A Recent Discovery, Vol. 1, New Delhi, 1985.

देगलूरकर, गो. बं.