अरिकामेडु : दक्षिण भारतात ⇨पाँडिचरीच्या दक्षिणेस सु. साडेतीन किमी. वर अरिकामेडु आहे. या ठिकाणी प्रथम १९३७ साली आणि नंतर १९४५ साली झालेल्या उत्खननांत अनेक रोमन नाणी आणि विविध बनावटीची मृत्पात्रे सापडल्यामुळे अरिकामेडु हे इसवी सनाच्या सुरुवातीस मोठे व्यापारी केंद्र होते असे निश्चित झाले. ग्रीक व रोमन प्रवाशांचे वृत्तांत आणि प्राचीन तमिळ वाङ्मय ह्यांतून दक्षिण भारताच्या रोमन व ग्रीक साम्राज्यांशी होत असणाऱ्‍या व्यापारी देवघेवीची कल्पना करता येते. दक्षिणेत अनेक ठिकाणी सापडलेल्या रोमन नाण्यांच्या स्वरूपात या देवघेवीचे प्रत्यंतर मिळते. पेरिप्‍लस ऑफ द एरीथ्रीअन सी ह्या पुस्तकात उल्लेखिलेले कोरोमांडल किनाऱ्‍यांवरील व्यापारी केंद्र पोडुके म्हणजे अरिकामेडु, असेही सिद्ध होण्याइतपत पुरावा आता उजेडात आलेला आहे.

 

भारतीय पुरातत्त्व-विभागातर्फे आर. ई. एम. व्हीलर यांनी १९४५ साली केलेल्या उत्खननांचा उद्देश रोमन सांस्कृतिक आणि व्यापारी संपर्काचे मूल्यमापन व रोमन पुराव्यांवरून भारतीय मृत्पात्रांचा कालखंड ढोबळ मानाने निश्चित करणे असा होता. त्यांनी केलेल्या उत्खननांत रोमन बनावटीच्या विविध मृत्पात्रांबरोबरच काही रोमन सम्राटांची नाणी, रोमन बनावटीचे काचेचे प्याले आणि मातीचे दिवेही सापडले आहेत. यांतील काही मृत्पात्रांवर रोमन कुंभारांच्या मुद्रांचे ठसेही होते. या रोमन मृत्पात्रांचा काळ इ. स. पू. पहिले शतक ते इ. स. चे पहिले शतक असा निश्चित असल्याने या अवशेषांबरोबर सापडलेली भारतीय बनावटींची काळी-तांबडी व पिवळसर रंगाने चितारलेली मृत्पात्रेही समकालीन ठरली. दक्षिण भारतात ब्रह्मगिरी व इतर ठिकाणी ही भारतीय मृत्पात्रे सापडल्याने त्यांच्या साहाय्याने उत्खननांत कालनिश्चितीस मोठी मदत झाली आहे.

संदर्भ : Wheeler, R. E. M. Ghosh, A. Deva, Krishna, ArikameduAn IndoRoman Trading Station on the East Coast of India(Ancient India No. 2, Archaeological Survey of India, 1946).

 

देव, शां. भा.