फ्लीट, जॉन फेथफूल : (? १८४७ – २१ फेब्रुवारी १९१७). ब्रिटिश सनदी अधिकारी आणि भारतातील शिलालेख आणि ताम्रपट यांचा मार्मिक अभ्यासक. वडील जॉन जॉर्ज व आई एस्टर. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये चिझिक येथे झाला. तेथील मर्चन्ट्स टेलर्स स्कूल आणि नंतर युनिव्हर्सिटी कॉलेज (लंडन) येथे शिक्षण. विद्यापीठात असताना त्याने संस्कृतचे अध्ययन केले. आय्. सी. एस्. (१८६५) नंतर १८६७ सालापासून पुढे तीस वर्षे त्याने साहाय्यक जिल्हाधिकारी, शिक्षण खात्यात निरीक्षक (१८७२), भारत सरकारचा पुरालिपिज्ञ (१८८३), जिल्हाधिकारी (१८८९), आयुक्त (१८९१) इ. विविध अधिकारपदांवर महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटकात म्हैसूर, विजापूर इ. ठिकाणी काम केले. संस्कृत व कन्नड भाषांप्रमाणे ज्योतिष या विषयाचे त्याचे ज्ञान अत्यंत सखोल होते. पाली, संस्कृ अँड ओल्ड कॅनरीज इन्स्क्रिप्शन्स (१८७८) हा पहिला ग्रंथ प्रकाशित करून महाराष्ट्र व कर्नाटकातील इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली माहिती त्याने उजेडात आणली. अचूक नोंद व तर्कशुद्ध विश्लेषण ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये होत. १८७२ साली सुरू केलेल्या इंडियन अँटेक्वेरि या नियतकालिकात त्याला फार रस होता व आपले बरेच लेख त्याने त्यातून प्रसिद्ध केले. १८८८ साली गुप्त सम्राटांचे लेख त्याने कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकेरमच्या तिसऱ्या खंडात प्रसिद्ध करून गुप्तसंवत् इ. स. ३१९-२० मध्ये सुरू झाला, असे सिद्ध केल्याने गुप्तांच्या इतिहासाच्या निश्चितीला फार मोठी मदत झाली. १८९६ मध्ये डायनॅस्टिज ऑफ क्रॅनरीज डिस्ट्रिक्ट्स (जुने बॉम्बे गॅझेटियर – खंड १, भाग १) हा ग्रंथ लिहून कर्नाटक-महाराष्ट्रावर राज्य करणारे लहानमोठे राजवंश व त्यांची कालगणना यांवर प्रकाश पाडला. या ग्रंथात पुराभिलेखात्मक त्याचप्रमाणे प्राचीन वाङ्‌मयीन पुराव्यांचा समन्वय त्याने साधला आहे. जर्नल ऑफ बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी, एपिग्राफिया इंडिका, इंडियन अँटिक्वेरी इ. सुप्रसिद्ध नियतकालिकांत अनेक लेख लिहून भारतीय पुराभिलेखांचा अभ्यास व भारतीय कालगणना यांच्या पुढील संशोधनासाठी भक्कम पाया उपलब्ध करून दिला. १८९७ साली सेवानिवृत्त झाल्यावरही इंग्लंडमध्ये त्याने आपले संशोधन व लेखन चालूच ठेवले. १९०७ साली तो रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड या संस्थेचा मानद सचिव झाला व याच संस्थेने १९१२ साली सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केला. त्याच्या निधनवर्षी म्हणजे १९१७ साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन अँटिक्वेरी या नियतकालिकात (४६ व्या खंडात) त्याच्यासंबंधी माहिती दिलेली आहे.

देव, शां. भा.