उत्खनित घराच्या कोनाड्यातील (सेतूमधील) मृदूभांडे, महेश्वर. महेश्वर : मध्य प्रदेशातील एक पुरातत्त्वीय प्राचीन स्थळ. हे इंदूरपासून दक्षिणेस सु. ६५ किमी.वर नर्मदा नदीच्या काठी वसले आहे. तीर्थक्षेत्र म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. पश्चिम निमाड जिल्ह्यात खर्गोनच्या उत्तरेस ते ३८ किमी. वर असून याच तालुक्याचे प्रमुख स्थानक आहे. लोकसंख्या ११,५६६ (१९८१). महाभारत तसेच मत्स्म, पद्म इ. पुराणांत व बौद्ध वाङ्‌मय आणि पतंजली, कालिदास, राजशेखर, दण्डिन, मुरारी इ. संस्कृत लेखक-कवी यांनी आणि कोरीव लेखांत गौरवाने उल्लेखिलेले माहिष्मती म्हणजेच महेश्वर होय. इ. स. पू. सहाव्या शतकातील अवंती नामक जनपदाची ‘महिस्सति’ ही राजधानी होती, असा बौद्ध वाङ्‌मयातून उल्लेख आढळतो. शिवाय सांचीच्या स्तूपावरील एका दान लेखातही (इ. स. पू. पहिले शतक) महिस्सती असा उल्लेख आढळतो. ही नगरी पैठण ते उज्जशयिनीच्या राजमार्गावर असल्याचा उल्लेखही आहे. माहिष्मती व महेश्वर ही दोन्ही एकाच नगरीची नावे आहेत. यांबद्दल सुरवातीला विद्वानांत एकमत नव्हते. माहिष्मती हैहयवंशीय महिष्मान (हैहयचा वंशज) किंवा मुचकुंद (यदूचा मुलगा) या राजांनी वसविल्याचा उल्लेख मिळतो. या नगरीचा इतिहास इ. स. पू. पहिल्या शतकापासून तो आधुनिक काळापर्यंत सलग मिळतो. प्राचीन काळी ती मोठी व्यापारी नगरी होती. या नगरीच्या जवळच महेश्वरी नदी नर्मदेला मिळते. या संगमावर विठ्ठल, मांगेश्वर आमि ज्वालेश्वर-कालेश्वर ही मंदिरे उभारलेली आहेत. ही मूळच्या दहा ते तेरा शतकांतील मंदिरांवर नंतर बांधली असून. शेवटच्या दोन मंदिरांत इ. स. १५६५ व १५७० असे अनुक्रमे दोन शिलालेख आहेत. मंडनमिश्र व शंकराचार्य यांचा प्रसिद्ध शास्त्रार्थ इथेच झाल्याची आख्यायिका आहे. शिवाय मध्य प्रदेशातील ओंकारमांधाता व माण्डला ही स्थळेही संभाव्य माहिष्मतीच असावीत, असेही एक मत प्रचलित होते. १९५२–५३ मध्ये महेश्वरातील ज्वालेश्वर, मंडालखो व धनक्केडी या तीन स्थळी डेक्कन कॉलेज, पुणे या संशोधन संस्थेने महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे यांच्या सहकार्याने उत्खनन केले. या उत्खननात ताम्रपाषाणयुगापासून ते मध्ययुगापर्यंतचे विशेषतः मोगल-मराठा कालापर्यंतचे विविध प्रकारचे अवशेष उपलब्ध झाले. त्यांत प्रागैतिहासिक काळातील चारशे अश्मोपकरणे आणि पाचशे विविध नमुने आढळले. तसेच काही मणी व मृत्ना शिल्पे होती. येथील वस्ती सलगपणे एकाच ठिकाणी अथवा एकामागून एक अशा क्रमाने झाली नाही कारण इथे हर्ष व हर्षोत्तर काळ ते मध्ययुगाच्या परमार घराण्याच्या काळातील वस्त्यांचा काही एक पुरावा मिळाला नाही.

पहिली ताम्रमपाषाणयुगीन वस्ती, इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकात झाली. हे लोक महेश्वर जवळच्या नर्मदेच्या काठावरील नावडातोडीच्या समकालीन ताम्रपाषायुगीन लोकांप्रमाणेच रंगीत खापरे व गारगोटीच्या छिलक्यांची हत्यारे वापरीत असत. दुसरी वस्ती इ. स. पू. ३०० ते १०० या कालात झाली. उत्खननात मौर्यकालीन उत्कृष्ट झिलईची खापरे, आहत नाणी, हस्तिचिन्हांकित कांचेची मुद्रा इ. अवशेष मिळाले. इसवी सनाच्या प्रारंभी या तिसऱ्या वस्तीच्या थरात सापडलेल्या काही रोमन बनावटीच्या खापरांवरून येथील व्यापाऱ्यांचा रोमशी व्यापारी संपर्क असावा, हे ज्ञात झाले. चौथी वस्ती इ. स. पहिले ते पाचवे या शतकांत झाली. हे लोक उत्कृष्ट मणी वापरीत व मातीच्या मूर्ती बनवीत. कलचुरी वंशातील राजे माहिष्मति-पुखरेश्वर असे म्हणवून घेत, त्यावरून या भागावर कलचुरींचा अंमल प्रदीर्घ काळ असावा, असे दिसते. येथे सर्वांत शेवटची वस्ती पंधराव्या शतकानंतर झाली.

अकबराच्या वेळी (कार. १५५६–१६०५) येथे किल्ला बांधण्यात आला. होळकरांनी या गावास तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व दिले. इंदूरची अहिल्यादेवीने महेश्वर ही संस्थानची राजधानी करून इ. स. १७६७ पासून काही वर्षे इथे वास्तव्य केले आणि नदीकाठी घाट व मंदिरे उभारली. त्यांनी संस्कृत पाठशाला स्थानपन केल्या. अहिल्यादेवींची एक लक्षणीय छत्री अवशिष्ट आहे. ओबडधोबड दगडी वास्तू, मांडूचे सुलतान व होळकर यांची नाणी, बहुरंगी काचेच्या बांगड्या व काचेचा लेप दिलेली मडकी त्या काळात प्रचलित होती.

आधुनिक महेश्वर हे टुमदार छोटे शहर असून तेथे नगरपालिका व अन्य तालुक्याची शासकीय कार्यालये आहेत. हातमागाच्या साड्या व पितळेची भांडी यांकरिता हे प्रसिद्ध आहे. शाहरात प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांबरोबर संस्कृत पाठशाळाही आहे.

संदर्भ : 1. Sankalia, H. D. Subbarao, Bendapudi Deo, S. B. The Excavations at Maheswar and Navadatoli : 1952-53, Poona-Baroda, 1958.

            2. Shrivastav, P. N. Ed., Madhya Pradesh District Gazetteers : West Nimar, Bhopal, 1970.

            3. मिराशी, वा. वि. कलचुरी नृपति आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५६.

देगलूरकर, गो. बं.