कालिबंगा : राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यात घग्गर (प्राचीन सरस्वती) नदीच्या दक्षिणकाठी वसलेले हडप्पापूर्व व हडप्पाकालीन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ. ह्याचा विस्तार साधारणत: अर्ध्या चौ. किमी. एवढा असून त्यात दोन भिन्न काळ व संस्कृती दर्शविणारी वैशिष्ट्यपूर्ण टेकाडे आहेत. १९६१ नंतर केलेल्या विविध आणि विस्तृत उत्खननांत दोन्ही काळातील वस्त्यांचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. हडप्पापूर्व गावाभोवती कच्च्या विटांचा तट असून तेथील घरेही कच्च्या विटांचीच होती. काही ठिकाणी तर चुलखंडेही आढळली आहेत. मृत्पात्रांतील काही फिकट तांबड्या रंगाची व काळ्या नक्षीची मृत्पात्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ती पाकिस्तानातील कोटदिजी येथे सापडलेल्या मृत्पात्रांप्रमाणेच आहेत. हडप्पाकालीन ( सिंधू संस्कृतीकालीन) नगराचे बालेकिल्ला आणि नगररचना असे दोन अगदी स्पष्ट भाग दिसतात. नगरात सरळ व समांतर रस्ते, घरांसाठी चौथरे, तसेच गटारे वगैरे विविध प्रकारचे सर्व अवशेष जवळजवळ सिंधू  संस्कृतीप्रमाणेच आढळतात. ह्यांचा काल कार्बन १४ ह्या पद्धतीप्रमाणे इ.स.पू. ३७०० ते १७९० असा येतो. ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे हे एक भारतातील महत्त्वपूर्ण स्थळ आहे. भारतात अनेक संस्कृतींचे जे उत्खनित अवशेष मिळतात, त्यांमध्ये कालिबंगा या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष महत्त्वाचे आहेत.

कालिबंगा उत्खननातील एक दृश्य

पहा : हडप्पा.

संदर्भ : Archaeological Survey of India, Indian Archaeology–A Review, 1960 to 1968, New Delhi, 1969.

देव, शां. भा.