कौशाम्बी : उत्तर प्रदेशातील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. अलाहाबादच्या नैर्ऋत्येस सु. ४५ किमी. वर यमुनेच्या काठी वसलेले आधुनिक कोसाभ म्हणजेच प्राचीन कौशाम्बी, असे अलेक्झांडर कनिंगहॅम व इतर पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे. प्राचीन हिंदू, जैन व बौद्ध वाङ्‍मयांत, कोरीव लेखांत व परकीय प्रवाशांच्या वर्णनांत तिची कौसंबी, किऔ-शँग-मि, कौशाभ्यपुर, कौशांबीपुर, कोसंब पट्टल, कौशाम्ब मंडल, वत्सपटन, भीम-की-गदा वगैरे भिन्न भिन्न नामांतरे आढळतात. पुरुरव्याचा दहावा वंशज कुशांब याने ही नगरी वसविली, असे पारंपरिक मत प्रचलित आहे. हस्तिनापूर वाहून गेल्यानंतर अर्जुनाचा आठवा वंशज निमिचक्र इथे रहावयास आला होता. पांडवकुलातील प्रसिद्ध राजा उदयन किंवा वत्सराज याची ही राजधानी होती, म्हणून त्यास वत्सपटन म्हणत. यूआन च्वांगने सातव्या शतकात या नगरास भेट दिली होती. तो तेथील दहापंधरा बौद्ध मठांचा व पन्नास मंदिरांचा उल्लेख करतो. 

प्राचीन कौशाम्बीचे अवशेष अलीकडे विस्तृतपणे झालेल्या उत्खननांत उपलब्ध झाले आहेत. १९३७ पासून इथे उत्खननास सुरुवात झाली. १९५० मध्ये अलाहाबाद विद्यापीठानेही येथे उत्खनन केले. त्यात सापडलेल्या अवशेषांवर सिंधू संस्कृतीची छाप दिसते, असे काही तज्ञांचे मत आहे. येथील प्राचीन किल्ल्याभोवती १२२ मी. रुंद व ८·५ मी. खोल खंदक होता. येथील अवशेष विविध प्रकारचे आणि विपुल असून स्थूलमानाने त्यांचा काळ इ. स. पू. सातवे शतक ते इ. स. पू. सहावे शतक असा ठरतो. इ. स. पू. सातव्या शतकातील १३ मी. उंचीचा, विटांचे आच्छादन असणारा मातीचा प्राकार, तसेच बुद्धकालीन राजांचा दगडी प्रासाद (हा उदयन राजाचा प्रासाद असावा, असे काहींचे म्हणणे आहे), घोषिताराम विहार व पुरुषमेधाकरिता बांधण्यात आलेली ‘श्येन चिति’ हे अवशेष अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. घोषिताराम विहारात ही वास्तू बुद्धाला दान दिल्याचा ब्राह्मी लिपीतील लेखही मिळाला आहे, तर श्येन पक्ष्यासारखी रचना असलेली श्येन चिती आपस्तंब शुल्ब सूत्रानुसार बनविलेली असून ती इ. स. पू. २०० च्या सुमाराची आहे. चितीत बळी दिलेल्या मानवाच्या कवट्याही सापडल्या आहेत. या अवशेषांव्यतिरिक्त मातीच्या मूर्ती, मृत्पात्रे, नाणी, साचे, मणी, बांगड्या, मुद्रा इ. अनेक वस्तू सापडल्या आहेत. त्यांच्या अभ्यासावरून त्या ताम्रपाषाणयुगीन असाव्यात, असा तज्ञांचा कयास आहे. भिन्न प्रकारच्या मुद्रा व मृत्पात्रे यांवरून येथील भिन्न भिन्न काळातील कलेची कल्पना येते. येथील एका मुद्रेवरील हूण राजांचे अभिधान व दुसऱ्या एका मुद्रेवरील तोरमाण हूण यांच्या उल्लेखावरून ही नगरी हूणांनी पादाक्रांत करून उद्ध्वस्त केली असावी, असे दिसते.

देव, शां. भा.