टायरिन्झ : ग्रीसमधील अर्गोलिस येथील नवाश्मयुगीन व ब्राँझयुगीन अवशेषांचे प्रख्यात स्थळ. दंतकथेनुसार ते प्रॉयटसने वसविले असावे. येथील मायसीनियन संस्कृतीचा प्रासाद प्रथम हाइन्रिक श्लीमान या संशोधकाने १८८४–८५ मध्ये प्रथम उघडकीस आणला. त्यानंतर जर्मन पुरातत्त्वीय संस्थेने १९१२–१५ च्या दरम्यान तेथे आणखी उत्खनन केले. त्यानंतरच्या उत्खननांत नवाश्मयुगापासून (इ. स. पू. तिसरे-दुसरे सहस्रक) ते इ. स. पू. सहाव्या शतकापर्यंतचा सांस्कृतिक इतिहास उपलब्ध झाला. येथे विविध काळातील वस्त्यांच्या अनेक अवस्था आढळतात. नवाश्मयुगात या ठिकाणी दगडविटांचा बुरूज होता. इ. स. पू. दुसऱ्‍या सहस्रकात चाकावर मृत्पात्रे बनविणाऱ्‍या तसेच लहान लहान खोल्यांत राहणाऱ्‍या लोकांची वस्ती झाली. इ. स. पू. सु. १४०० मध्ये प्राचीनतम मायसीनियम राजवाडा बांधला गेला. भव्य प्रवेशद्वार व मोठे बुरूज हे याचे वैशिष्ट्य होते. त्यानंतर एका शतकाने पहिल्यापेक्षा विस्तृत राजवाडा बांधला गेला. इ. स. पू. १४०० च्या सुमारास आणखी एक प्रासाद व सध्या दिसणारा बालेकिल्ला अस्तित्वात असावा. उत्तुंग बुरूज, भव्य व मनोहर प्रवेशद्वार, विस्तृत कोठारे, सुंदर भित्तिचित्रे आणि शिल्पपट्टा यांमुळे या प्रासादाचे अवशेष विशेष महत्त्वाचे आणि लक्षणीय ठरलेले आहेत. भित्तिचित्रांत राण्या, दासी, रथ, शिकारी इत्यादींची चित्रणे आढळतात. त्यांवर मिनोअन शैलीची छाप दिसून येते. या प्रासादाचा लाकडी भाग इ. स. पू. बाराव्या शतकात जळून गेला. त्या आगीत बहुतेक महत्त्वाचा भाग नष्ट झाला.

 अक्रॉपलिसच्या भिंती, टायरिन्झ.

संदर्भ : Hall, H. R. The Civilization of Greece in the Bronze Age, London, 1928.

देव, शां. भा.