(१) टेओटीवाकान (मेक्सिको) येथील पिरॅमिड (२) कूफू, कॅफ्रे व मेंकुरे राजांची पिरॅमिडे, गीझा, इ.स.पू. २६७॰ ते २५९॰

पिरॅमिड : जगप्रसिध्द प्राचीन वास्तुरचना. विटांची अथवा दगडी बांधणीची, चौरस अथवा आयताकृती पाया व वर निमुळती होत जाणारी, पिरॅमिडे मेक्सिको, इटली, ग्रीस, थायलंड, ईजिप्त वगैरे विविध देशांत आढळतात पण सर्वांत प्राचीन व भव्य पिरॅमिडे फक्त ईजिप्तमध्ये असून त्यांतील लेख व विविध वस्तू यांमुळे त्यांना प्राचीन इतिहासात, तसेच वास्तूशास्त्रात एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ईजिप्तमध्ये पिरॅमिडला ‘मेर’ म्हणतात. पिरॅमिड हा इंग्रजी शब्द ‘पिरॅमिस’ या ग्रीक शब्दावरून रूढ झाला. त्याचा अर्थ गव्हाचा केक असा असून पिरॅमिडचा आकार केकसारखा असल्यामुळे तो रुढ झाला असावा. राजांच्या (फेअरो) दफनाशी संलग्न असणाऱ्या या वास्तूची प्राचीनता, रचना, अचूक बांधणी आणि आत मिळणारा ऐतिहासिक पुरावा ह्यांमुळे पिरॅमिड हे जगातील एक आश्चर्य मानले जाते. ईजिप्तमध्ये सु. ऐंशी पिरॅमिडे अवशिष्ट असून त्यांपैकी काही सुस्थितीत आहेत. अनेक पिरॅमिडे पूर्वी लुटली गेली आहेत. आत्मा हा शरीराशिवाय अलग राहू शकत नाही, या तत्कालीन समजुतीमुळे पिरॅमिडे बांधण्याची कल्पना रूढ झाली. बहुतेक फेअरोंनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या शवाची व्यवस्था व्हावी, म्हणून पिरॅमिडे बांधली. साहजिकच राजा-राणीची शरीरे ममीच्या स्वरूपात पिरॅमिडांमध्ये जतन करुन ठेवण्यात आली.

प्राचीन ईजिप्तच्या इतिहासातील तिसऱ्या-चौथ्या (इ. स. पू. २७२०–२५६०), सहाव्या (इ. स. पू. २४२०–२२९४) व बाराव्या (इ. स. पू. २०००–१७७७) राजवंशातील राजांनी पिरॅमिडे बांधली. सर्वांत जुने पिरॅमिड कैरोजवळ सकारा येथे असून ते झोसर (इ. स. पू. तिसरे सहस्रक) या तिसऱ्या वंशातील राजाने इ. स. पू. २८०० च्या सुमारास बांधले, तर अगदी अलीकडचे पिरॅमिड सूदानमध्ये मेरो येथे इथिओपियन राजाने इ. स. ३०० मध्ये बांधले. ईजिप्तमध्ये सुरुवातीस बांधलेल्या पिरॅमिडसदृश वास्तूंना ‘मस्ताबा’ म्हणत. झोसरने बांधलेल्या पहिल्या दगडी पिरॅमिडची उंची सुरुवातीस ८ मी. होती आणि आराखडा चौकोनी होता. त्याला ‘स्टेप पिरॅमिड’ असेही म्हणत. चौथ्या राजवंशाच्या काळात पिरॅमिडबांधकामात फार प्रगती झालेली दिसते. या काळातील कूफू, कॅफ्रे व मेंकूरे या राजांनी गीझा येथे बांधलेली पिरॅमिडे समतोल रचनाकौशल्याबद्दल व अचूक बांधणीसाठी प्रसिध्द आहेत. तिन्ही पिरॅमिडांमध्ये अश्मपेटिका सापडल्या असून त्या ग्रॅनाइट दगडाच्या बनविलेल्या आहेत. कूफूचे पिरॅमिड जगातील सात आश्चर्यांत गणले जाते. 

पिरॅमिडची अंतर्गत रचना अनेक प्रकारची आहे. चौथ्या वंशातील राजांनी आकारात फेरफार करून, तसेच विटांऐवजी दगड वापरून लहान आकारांत अनेक पिरॅमिडे बांधली. तथापि प्रवेशव्दार, वीथी, आतील दालने व पिरॅमिडखाली उत्कीर्ण केलेल्या खोल्या ही सर्वसाधारणत: काही ठळक वैशिष्ट्ये सर्वत्र आढळतात. सर फ्लिंडर्झ पेट्री यांनी पिरॅमिडचे उत्खनन व अभ्यास करून त्याची काटकोनादी तपशीलांतील भौमितिक अचूकता सिध्द केली आहे. गीझा येथील कूफू राजाचे पिरॅमिड १२६ मी. उंच असून त्याने पाच हेक्टर क्षेत्र व्यापलेआहे. याच्या बांधणीत सु. पंचवीस लाख चिरे (शिळा) आहेत. प्रत्येक चिऱ्याचे वजन सु. २·५ टन असून पिरॅमिडचा गाभा चुनखडकांच्या चिऱ्यांचा, सैल जुळणी असलेला आहे. बाहेरील आवरण बारीक व घट्ट कणांच्या त्याच जातीच्या दगडांचे, घट्ट व सुतातील जुळणीचे आहे. या आवरणावर वर्षांनुवर्षे हवामानाचा परिणाम होऊन काही पडझड झाली आहे तथापि तो जेव्हा सुस्थितीत होता, तेव्हा तळाच्या चौरसाची बाजू २३० मी. लांब होती. तळ एका पातळीत असून पातळी जवळजवळ क्षैतिज, वायव्य कोपऱ्याकडून आग्नेय कोपऱ्याकडे केवळ सव्वा ते दीड सेंमी. कललेली आहे. चौरसांच्या बाजूंची लांबी सारखी आहे आणि कदाचित फरक आढळलाच, तर तो ‘५,००० त एक’ एवढा अनुल्लेखनीय आहे. बाजूतील कोन फक्त ३·५ फरकाने काटकोनात आहेत व फरक जास्तीतजास्त ५·५ एवढा आहे. पिरॅमिडमध्ये भुयारी मार्ग, थडग्याचे दालन वगैरे पोकळ भाग आहेत. आवरणातील चिऱ्यांच्या सांध्यांतील फटी अर्ध्या मिमी. हूनही कमी रुंद आहेत. बाहेरच्या चिऱ्यांची रचनाबांधणी केल्यानंतर त्यांचे सांधे व पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेले दिसतात. पाचव्या वंशातील राजांनी अबू सीर येथे पिरॅमिड बांधले, तर सहाव्या वंशातील राजांनी सकारा येथे बांधले. ही पिरॅमिडे लहान व काहीशी ओबडधोबड असली, तरी त्यांच्या आतील दालनांमधून हायरोग्लिफिक लिपीत मजकूर लिहून ठेवला आहे. त्यावरून तत्कालीन धार्मिक कल्पनांची, तसेच एकूण सामाजिक स्थितीची कल्पना येते. इ. स. पू. १७०० च्या सुमारास ईजिप्तमधील पिरॅमिडांची बांधणी जवळजवळ संपुष्टात आलेली दिसते. नंतरच्या राजांनी आपल्या प्रेतांकरिता शैलोत्कीर्ण गृहे खोदण्याची पध्दत सुरू केली.

संदर्भ : 1. Edwards, I. E. S. The Pyramids of Egypt, New York, 1975.

2. Mendelssohn, Kurt, The Riddle of the Pyramids, New York, 1974.

देव, शां. भा.