सुक्तगेनडोर : सिंधू संस्कृतीचे अगदी पश्चिमेकडील शेवटचे ज्ञात ठिकाण. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात इराणच्या सरहद्दीजवळ कराचीच्या पश्चिमेस सु. ४८३ किमी.वर ते वसले आहे. याचा शोध १८७५ मध्ये मेजर ई. मोकलर याने लावला. त्यानंतर मकरान प्रांताच्या सर्वेक्षणाच्या वेळी जॉर्ज एफ्. डॉलेस याने या शहराचे १९६० मध्ये उत्खनन करून सिंधू संस्कृतीशी साम्य दर्शविणारे पुरावे निदर्शनास आणले. प्राथमिक उत्खननामध्ये सपाट दगडी ठोकळ्याने बांधलेली संरक्षक भिंत आणि विखुरलेले वास्तूंचे अवशेष या ठिकाणी मिळाले. शिवाय हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य दर्शविणारी खापरे, तांब्याच्या कुऱ्हाडी, मातीच्या बांगड्या हे पुरातत्त्वीय अवशेषही येथे सापडले आहेत. यावरुन हे ठिकाण सिंधू संस्कृतीचे पश्चिमेकडील सांस्कृतिक केंद्र असावे, असे ⇨ सर मॉर्टिमर व्हीलर या पुरातत्त्व संशोधकाचे मत आहे. अरबी समुद्रापासून केवळ ४९ किमी.वर असणारे हे ठिकाण प्राचीन काळी पूर्व-पश्चिम प्रदेशातील सागरी व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र होते.

भटकर, जगतानंद