पर्सेपलिसः प्राचीन अवशेष.

पर्सेपलिस : इराणमधील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. फार्स प्रांतातील शीराझ गावाच्या ईशान्येस सु ५० किमी. वर ते वसले आहे. ते तख्त-इ-जमशीद या नावाने प्रसिद्ध असून डरायसच्या अकिमेनिडी साम्राज्याचे वसंत ऋतूतील राजधानीचे स्थळ होते. या ठिकाणी पुरातत्त्ववेत्त्यांनी अनेक उत्खनने केली. त्यांत मुख्यत्वेकरून इ. स. पू. सहाव्या शतकापासूनचे अवशेष आढळले. अवशेषांचे मुख्यतः वास्तू आणि वास्तुसंलग्न मूर्तिकला असे दोन भाग असून ते इतके एकजीव झालेले दिसतात, की येथील शिल्पे म्हणजे वास्तूचाच एक कलात्मक भाग वाटतो. डरायसने इ. स. पू. सहाव्या शतकात येथे हंगामी राजधानी केल्यानंतर पर्सेपलिसची भरभराट झाली. त्याने तेथे बालेकिल्लेवजा राजप्रासाद बांधला. इ. ए. एफ्. श्मिट यांनी केलेल्या उत्खननात अनेक स्तंभयुक्त वास्तू सापडल्या. हे येथील वास्तुबांधणीचे एक वैशिष्ट्य असून स्तंभांवर पन्हाळ्या आहेत. त्यांच्या वरच्या टोकावर पाठीस पाठ लावून बसलेले प्राणी दर्शविलेले आहेत. अशाच प्रकारचे स्तंभ सम्राट अशोकाच्या काळी भारतात होते. या वास्तूंचे दगड एकमेकांस विशिष्ट प्रकारांनी जोडलेले आहेत. स्वतंत्र शिल्पे आढळत नाहीत. मूर्तिकाम हे वास्तूंना बांधलेले भित्तिशिल्पांचे असल्याने मूर्तिविषयक  असणारे प्राणी, माणसे, लढाया, वेढे इ. चित्रणात व्यक्ती ताठ व आखडलेल्या स्थितीत आढळतात. एकूण मूर्तिकामात गतिमानता आणि विविधता यांचा अभाव असून तोचतोपणा दिसतो. इराणी सम्राटांनी बाहेरचे कलाकार एकत्र आणून ही काहीशी ओबडधोबड गौणशैली निर्माण केली असावी, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे येथील कला एकजिनसी वाटत नाही.

संदर्भ : Schmidt, E. F. Persepolis, London 1957.

देव, शां. भा.