अक्रॉपलिस : मुळात ‘उंचावरील शहर’ या अर्थाचा ग्रीक शब्द. शहरातील उंच जागी बांधलेल्या तटबंदीच्या किल्लेवजा वास्तूसाठी नंतर तो रूढ झाला. देवदेवतांची मंदिरे, भांडागारे अशा वास्तूही अक्रॉपलिसमध्ये अंतर्भूत असतात. ग्रीसमध्ये अथेन्स, ऑलिंपिया, डेल्फॉय, एपिडॉरस, कॉरिंथ, डिलॉस वगैरे ठिकाणी असे किल्ले असले, तरी ’अक्रॉपलिस’ या विशेषनामाने प्रसिद्ध असलेला किल्ला अथेन्सचाच आहे. अभिजात ग्रीक वास्तूचे व मूर्तिकलेचे भग्न नमुने येथे आहेत. हे अक्रॉपलिस १५२ मी. व ३५० मी. अक्ष असलेल्या लंबवर्तुळाकृती पठारावर बांधले आहे. प्राचीन पिलॅस्‌झियन व मायसिनियन काळीही यावर बांधकाम झाले. पण आज अवशिष्ट स्वरूपात असलेल्या वास्तू मात्र सायमन व पेरिक्लीझ यांच्या काळात बांधल्या गेल्या. अथीनाच्या (अथेन्सची ग्रामदेवता) विविध रूपांच्या मूर्तींची [⇨ पार्थनॉन (४४७ ते ४३८ इ.स.पू.), ⇨ इरेक्थीयम (४२१ ते ४०६ इ.स.पू.), नायकी मंदिर (४२७ ते ४२४ इ.स.पू.)] मंदिरे व भव्य ‘प्रॉपिलीआ’ म्हणजे प्रवेशद्वारे (४३७ ते ४३२ इ.स.पू.) ह्या सर्वांची निर्मिती इक्टायनस, कॅलिक्राटीझ व नेसिक्लीझ या प्रसिद्ध ग्रीक वास्तूकारांनी केली. त्यावरील व त्यामधील शिल्पकाम तसेच देखरेख ⇨फिडीयस या मूर्तिकाराने केली. या वास्तूंसाठी डोरिकआयोनिकस्तंभरचनांचा वापर केला आहे. विविध अक्षीय व विखुरलेल्या वास्तूंतून व वास्तूंतील असमतेतून एकसूत्री समतोल व वास्तुप्रमाणे साधणारी महान वास्तुशिल्पीय रचना म्हणजे अक्रॉपलिस. तिच्या प्रवेशमंदिरातील चित्रशाळा, परिसरातील डायोनिशसचे खुले रंगमंदिर व संगीत-श्रोतृगृह (ऑडीऑन) या इतर उल्लेखनीय वास्तू होत.

भूकंपासारख्या नैसर्गिक कारणांनी व पर्शियनांच्या अत्याचारांनी यांची नासधूस झाली. यापैकी काही मूर्तींचे अवशेष लंडन, पॅरिस व अथेन्स येथील संग्रहालयांतून ठेवलेले आहेत.

दिवाकर, प्र. वि.

अक्रॉपलिस, अथेन्स.