सरोवर वस्ती : अश्मयुगीन मानवाने प्रागैतिहासिक काळात उथळ सरोवरांचे काठ किंवा पाणथळ प्रदेशाभोवती केलेली वस्ती वा वसाहत. ही सामान्यतः मातीच्या ढिगाऱ्यावर (टेकाडावर) वा खडकावर केलेली असे. कधीकधी कृत्रिम टेकडी तयार करून त्यावर झोपडया बांधीत. यामुळे प्रागैतिहासिक मानवास विविध प्रकारचे अन्नसंकलन करणे सुलभ होई, विशेषतः मासे, दलदलींतील पाणकोंबडया, बदके वगैरेंची शिकार मिळत असे. शिवाय अवतीभोवतीची सुपीक जमीन पिकांसाठी उपलब्ध होई. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका आणि यूरोप या खंडांतील नवाश्मयुगीन, बाँझयुगीन तसेच लोहयुगीन काळातील अशा वस्त्यांचे प्राचीन अवशेष उपलब्ध झाले आहेत. याशिवाय पॅसिफिकमधील काही बेटांवर खाऱ्या पाण्याच्या सरोवरांभोवती कृत्रिम टेकाडे बांधून वसाहत केल्याचे काही अवशेष मिळाले. यूरोपमध्ये नवाश्मयुग व बाँझयुगातील सरोवर वस्त्यांचे अवशेष आढळले. यूरोपात विशेषतः जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, ग्रेट ब्रिटन आदी देशांत नवाश्मयुगातील सरोवर वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. स्वित्झर्लंड व जर्मनी यांतील नवाश्मयुगीन सरोवरीय वस्त्यांचा काल इ. स. पू. सु. २८०० असा कार्बन-१४ कालमापन-पद्धतीनुसार येतो तर इंग्लंडमधील ग्लॅडस्टनबरी व होल्डरनेस येथे सापडलेल्या वस्त्यांचे अवशेष इ. स. पू. ५० पूर्वीचे नसावेत, असा तज्ज्ञांचा कयास आहे. या वस्त्या लोहयुगीन असून त्यांना क्रॅनॉग म्हणतात. ‘क्रॅनॉग’ हा आयरिश शब्द असून त्याचा अर्थ सुरक्षिततेसाठी बांधलेली प्राचीन वसाहत होय. क्रॅनॉग ही इंग्लंडमधील लोहयुगीन सरोवर वस्ती इ. स. पू. पहिल्या शतकाच्या मध्यास केल्ट लोकांनी वसविली असावी, असा पुरातत्त्ववेत्त्यांचा तर्क आहे.

जर्मनीतील फेडरसी (Federsee) सरोवरीय वस्त्या नवाश्मयुग व बाँझयुग या दोन्ही कालखंडांतील आहेत, सरोवरात शेकडयांनी लाकडी ओंडके टाकून त्यावर फळ्या बसवून फळ्यांच्या जमिनीवर घरे बांधण्याचे तंत्र स्वित्झर्लंडमधील सरोवरीय वस्त्यांत दिसून येते. अशा घरांत फळ्यांच्या जमिनीवर चिखल थापून त्यावर चुलीची स्थापना करीत, असेही अवशेषांवरून दिसून आले आहे. त्यामुळे अग्नीचा संपर्क फळ्यांशी येत नसे. इंग्लंड-आयर्लंडमध्येही अशा वस्त्यांचे अवशेष तळ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अचानकपणे १९५२-५३ साली उघडकीस आले. या वस्त्या मुख्यत्वे लाकडांच्या घरांच्या असून सरोवरातील उथळ पाण्यावर वसलेल्या होत्या आणि मेढकोटांनी त्या संरक्षित केल्या होत्या. या वस्त्यांतील रहिवाशांचा एकमेकांशी छोटय छोटय लाकडी होडयांतून (Cahoes) दैनंदिन व्यवहार व जा-ये होत असे. अशा प्रकारचा पुरावा इतरत्र मिळालेला नाही. भारतात या तिन्ही युगांत कुठेही सरोवरीय वस्ती झाल्याचे पुरातत्त्वीय अवशेष आढळले नाहीत. स्विस पुरातत्त्वज्ञ फर्दिनांद केलर आणि डॅनिश पुरातत्त्वज्ञ क्रिश्चन टॉमसन यांचे या क्षेत्रातील योगदान प्रशंसनीय आहे.

संदर्भ : Childe, V. G. The Dawn of European Civilization, London, 1957.

देव, शां. भा.