ब्राँझयुगःकथिल व तांबे यांच्या मिश्रधातूंची -ब्राँझची उपकरणे व शस्त्रास्त्रे जगात जेव्हा प्रामुख्याने सर्वत्र प्रचारात आली, त्या युगाला पुरातत्वविद्या विषयात ब्राँझयुग ही संज्ञा देण्यात येते. ही संज्ञा क्रिश्चन जर्गन्सेन टॉमसन या डॅनिश तज्ञाने १८१९ मध्ये प्रथम वापरली आणि त्याने वस्तुसंग्रहालयातील पुरातत्वीय अवशेष अश्मयुग, ब्राँझयुग आणि लोहयुग या कालक्रमाने विभागून लावले. या युगाचा प्रारंभ नवाश्मयुगानंतर झाला तथापि दगडी उपकरणे व शस्त्रास्त्रेही या युगात मोठ्या प्रमाणात प्रचारात होती. ही उत्क्रांती जगभर टप्प्याटप्प्यांनी झाली. सर्वच प्रदेशांत ब्राँझयुगाची सुरुवात एकाच वेळी झाली, असे मानणेही चुकीचे ठरेल. सर्वसाधारणतः इ. स. पू. ४००० ते ३५०० दरम्यान ब्राँझयुगाला प्रारंभ झाला. मध्यपूर्वेत व भारतात या युगाचा कालखंड इ.स.पू. तिसरे सहस्त्रक असा साधारणपणे निश्चित करण्यात आला आहे परंतु यूरोपातील काही देशांत ब्राँझयुगाची सुरुवात यानंतर जवळजवळ एक हजार वर्षांनंतर झाल्याचा पुरावा मिळतो.

 

तांबे व कथिल यांचा मिश्रधातू म्हणजेच ब्राँझ होय. हे मिश्रण मुद्दाम करता येते. त्याचप्रमाणे काही वेळा हे दोन्ही धातू नैसर्गिक रीत्या एकत्र झालेले आढळून येतात. ब्राँझच्या उपलब्ध वस्तूंचे पृथकरण करून याबद्दल निष्कर्ष काढता येतात. ब्राँझयुगातील मानव फक्त ब्राँझच वापरीत होता, असे समजणे चुकीचे ठरेल. ब्राँझबरोबरच शुद्ध तांबे व दगडाची हत्यारेही मानव या युगात वापरीत होता.

ब्राँझचे अलंकृत भांडे,मेसोपोटेमिया, इ. स. पू. १२ वे ते १० वे शतक.

मध्य यूरोपातील ब्राँझयुगीन शस्त्रे : उजवीकडे -तलवारीची अलंकृत मूठ, डावीकडे - कुऱ्हाडवजा तलवार.

मिनोअन समाजातील बैलांवरील खेळ दर्शविणारी ब्राँझची मूर्ती, इ.स.पू. ३००० ते १०००.

ब्राँझ वा तांब्याच्या वापराची सुरुवात हा मानवी जीवनातील एक फार महत्वाचा टप्पा ठरला. प्राचीन अश्मयुगातील मानव असंस्कृत होता आणि अन्नोत्पादनाची कल्पनाही त्याला माहीत नव्हती. त्यामुळे जनावरांचे मांस मिळविण्यासाठी तो जनावरांच्या कळपामागोमाग भटकत असे, अन्नोत्पादनावर ताबा मिळविल्यानंतर नवाश्मयुगात मानव सुस्थिर जीवन जगू लागला. ब्राँझयुगातील मानवी समाजात प्रत्येक घटक अन्नोत्पादन करीत नव्हता काहीजण शेती, काहीजण लोहारकाम तर काहीजण कुंभारकाम वा सुतारकाम करीत असल्याने शेती उत्पादनावर भर देऊन जादा धान्य पिकवून या अन्नोत्पादन न करणाऱ्या घटकांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था समाजाला करावी लागली. विविध गरजा, तत्प्रावीण्यत्व, जादा धान्योत्पादन, जादा उत्पादलेल्या वस्तू देऊन त्यांच्या बदल्यात इतर वस्तू घेण्याची जरूरी व त्याकरिता वाहतुकीची साधने निर्माण करणे, ही सर्व ब्राँझयुगातील वैशिष्ट्ये समजली जातात. अशा तऱ्हेच्या नागरी अर्थव्यवस्थेचे स्वरूप भारतातील सिंधू संस्कृतीत पहावयास मिळते.

हिटाइट साम्राज्य काळात (सु.इ.स.पू.१८०० ते १६०० दरम्यान) आशिया मायरनमधील ओतशालातून लोखंड निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. तूतांखामेन (इ. स. पू. १३५२ – १३४३) याच्या थडग्यात काही लोखंडी वस्तू मिळाल्या आहेत. त्या हिटाइट राजांनीच दिलेल्या असाव्यात. हिटाइट साम्राज्याच्या अवनतीनंतर इ.स.पू. ११८५ च्या सुमारास मध्यपूर्वेत लोह धातूने ब्राँझ धातूची जागा घेतली. पुढे इ.स.पू. सातव्या शतकात हॉलस्टॅट (ऑस्ट्रिया) हे लोहवस्तू निर्मितीचे मोठे केंद्र बनले होते त्यावरून ब्राँझयुगाची समाप्ती होऊन लोहयुगाला प्रारंभ झाला होता, हे निश्चित.

संदर्भः 1. Childe, V. G. The Dawn of European Civilization, London, 1961.

          2. Ehrich, Robert W. Ed.Chronologies in Old World Archaeology, Chicago, 1965.  

          3. Ward, Anne Trans. &amp Ed. Charles-Picard, Gilbert, Larousse Encyclopedia of Archaeology,London, 1972.

देव, शां. भा.