स्टोनहेंजस्टोनहेंज : इंग्लंडच्या विल्टशर परगण्यात सॅलिसबरीच्या उत्तरेस १३ किमी. वर नवाश्मयुगीन काळात तीन स्तबकांनी उभारण्यात आलेले मंदिर किंवा स्मारक किंवा वेधशाळा. या सु. ४०—५० वर्तुळाकार स्मारकांतील सर्वांत मोठे स्मारक ७.३ मी. उंचीचे असून त्याच्या प्रत्येक आधाराच्या स्तंभाचे वजन ५० टन आहे. त्यांचा काळ स्थूलमानाने इ. स. पू. १९०० या सु. ४०—५० वर्तुळाकार १४०० असून काही तज्ज्ञांच्या मते तो इ. स. पू. ३१०० पर्यंतही मागे जातो. पुरातत्त्वीय उत्खननानंतर (१९५० नंतर अनेक उत्खनने झाली ) पुरातत्त्ववेत्त्यांनी कालक्रमानुसार त्याचे तीन भाग पाडले असून अखेरच्या भागाचे आणखी टप्पे पाडले आहेत. त्यांचा काल इ. स. पू. २००० दिला आहे. स्मारकांच्या स्तंभांवर तुळया बसविलेल्या आहेत. याच्या आत घोड्याच्या नालेच्या आकाराची दगडी रचना व त्याच्या मध्यभागी असलेले स्थंडिल-स्तंभ हे या स्मारकाचे सर्वांत प्रगत रूप. प्रारंभी मातीचा एक वर्तुळाकृती तट किंवा ढीग होता. त्यात ५६ थडगी सापडली. यानंतर ‘ ब्ल्यूस्टोन ’ जातीच्या लहान दगडांची दुतर्फा रांग असलेला मोठा मार्ग तयार झाला. अवशेषांत सापडलेल्या खंजीरासारख्या काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आणि रचनेची पद्धत यांवरून या वास्तूचा मायसीनीच्या संस्कृतीशी संबंध सूचित होतो. या वास्तूंच्या प्रयोजनाबद्दल तज्ज्ञांत एकमत नाही आणि आज त्यांचे फक्त अवशेषरूप पाहावयास मिळतात.

संदर्भ : 1. Atkinson, R. J. C. Stonehenge, London, १९५६.

2. Chippin-dall, Christopher, Stonehenge Complete : Archeology, History, Heritage, London, १९८३.

3. Cohen, I. L. The Secret of Stone-henge, New York, १९८२.

माटे, म. श्री.