रूपड : विद्यमान रूपार. पंजाबमधील एक हडाप्पाकालीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले स्थळ व जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या २५,२४० (१९८१). रूपनगर या जुन्या नावानेही ते परिचित आहे. ते सांडपाण्याचे कूप, रूपड.चंदीगडच्या वायव्येस सु. ३५ किमी. वर व अंबालापासून उत्तरेस सु. १०० किमी. वर सतलजच्या डाव्या काठावर वसले आहे. येथे रेल्वे स्थानक असून रस्त्यांनी इतर शहरांशी ते जोडले आहे. या ठिकाणी १९५३ ते १९५५ दरम्यान झालेल्या उत्खननांत हडप्पा संस्कृतीच्या काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंतचे विविध अवशेष सापडले. यामुळे हडप्पा आणि नंतरची चित्रित राखी मृत्पात्रांची संस्कृती यांतील संबंधाचा महत्त्वाचा दुवा उपलब्ध झाला आहे. ही उत्खनने सु. १६ मी. उंचीच्या टेकाडावर करण्यात आली. हे स्थळ हिमालयाच्या पायथ्यानजीक, हमरस्त्यावर असल्यामुळे आणि येथे सतलज नदी पंजाबच्या सुपीक मैदानात प्रवेश करीत असल्यामुळे तेथे वारंवार वस्ती झाली. आणि ती परकीय आक्रमणात नष्टही झाली असल्यास शक्यता आहे कारण येथील स्तरांतील अवशेषांवरून वसाहतींचे सहा सांस्कृतिक कालखंड स्पष्ट होतात. हडप्पा संस्कृतीची वस्ती इ. स. पू. सु. २००० ते १४०० या काळात झाली. ब्राँझची हत्यारे, हडप्पासारखी रंगीत व उत्कृष्ट मातीची भांडी, स्टीअटाइटच्या मुद्रा व चर्ट दगडाची धारदार पाती त्यावेळी वापरात होती. इ. स. पू. सु.१००० ते ७०० या दुसऱ्या वस्तीच्या काळातील लोक हस्तिनापूर येथे सापडलेल्या काळ्या रंगात नक्षी काढलेल्या राखी रंगाच्या खापरासारखी खापरे, मणी व हाडांच्या पिना वापरीत असत. तिसरी वस्ती इ. स. पू. सु. ६०० ते ३०० या काळात सुरू झाला. नाणी आणि उत्कीर्ण लेख असलेल्या मुद्रा त्यावेळी प्रचलित होत्या. यानंतरची वस्ती इ. स. पू. २०० ते इ. स. ६०० या आठशे वर्षांत झाल्याचा पुरावा शुंगशैलीच्या मृण्‌मूर्ती, कुशाण व गुप्त राजांची नाणी आणि मुद्रा दर्शवितात. या आधीच्या काळात वास्तू बांधकामात मातीच्या कच्च्या व भाजलेल्या विटा यांचा वापर करीत पण इ. स. पू. २०० ते. इ. स. ६०० या शेवटच्या काळातील वास्तूंचा पुरावा मिळावा नाही. यानंतर इ. स. च्या ८०० ते १००० या काळात रूपडला उत्कृष्ट बांधलेली विटांची घरे अस्तित्वात होती. शेवटची वस्ती मोगल काळात झाली असे नाणी, लखौरी विटांच्या वास्तू आणि काचेच्या द्रवाचा लेप दिलेली मृदभांडी दर्शवितात. येथे सापडलेले बहुविध अलंकार मोहें-जो-दडो व हडप्पासदृश आहेत. यावरून सिंधू संस्कृती प्रथम उत्तरेकडील खोऱ्यांतून प्रसार पावली आणि सतलजच्या किनाऱ्यावने रूपड येथे अवतीर्ण झाली, असे अभ्यासक मानतात.

संदर्भ : 1. Sanklia, H. D. Prehistory and Protohistory in India and Pakistan, Bombay, 1962.

2. Sharma, Y. D. Lalit Kala, No.1-2, April 1955, March 1956.

देव, शां. भा.