मास्परो, गास्ताँ कामीय चार्ल्स : (२३ जून १८४६–३० जून १९१६). फ्रेंच पुरातत्त्वज्ञ आणि ईजिप्तविद्येचा गाढा अभ्यासक. मूळच्या इटालियन कुटुंबातील मास्परोचा जन्म पॅरिस येथे झाला. पॅरिसमध्ये त्याचे सर्व शिक्षण झाले. विद्यार्थिदशेत त्याने प्राचीन ईजिप्शियन भाषेचा अभ्यास केला. पुढे एकोल देस हॉत्स इतुदेश या शैक्षणिक संस्थेत त्याने अधिव्याख्याता म्हणून काही वर्षे (१८६९–७४) ईजिप्शियन भाषा शिकविण्याचे काम केले. पुढे त्याची कॉलजे द फ्रान्समध्ये ईजिप्तविद्या विषयाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८७४). ऑग्युस्त मार्येत निवृत्त झाल्यावर त्याची ईजिप्तमधील पुराणवस्तू संशोधनसेवा खात्याचा संचालक म्हणून नियुक्त झाली  (१८८०). १८८१ मध्ये त्याने डेर-एल्-बाहरी येथील प्राचीन राजघराण्यातील काही ममींचा शोध लावला. त्यानंतर त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने ईजिप्तमधील प्राचीन अवशेषांचे जतन आणि संशोधन करण्याची मोहिम हाती घेतली. त्याने उनस, दुसरा पेपी आणि तेती या राजांची पिरॅमिडे उघडली आणि अनेक अश्मपेटिका–लेख शोधून काढले. याच सुमारास ईजिप्तमध्ये अब्द-अल्-रसूल व त्याची कुटुंबीय मंडळी प्राचीन अवशेषांचा अवैद्य साठा आणि व्यापार करीत होती. त्यांचा हा साठा आणि गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे सु. ३४ राजांची मूल्यवान सामग्री त्यास मिळाली. याशिवाय काही गुप्त पुरातत्त्वीय स्थळांचा शोधही त्यास लागला. हे सर्व उपलब्ध पुरातत्वीय अवशेष त्याने कैरोत राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात जमा केले आणि सकाराजवळचे खंडित झालेले उत्खनन पुन्हा चालू केले. तसेच गीझाजवळच्या भव्य स्फिंक्समधील वाळू हलविण्यास प्रारंभ केला. हे काम १८६९ मध्ये सुएझ कालव्याच्या वेळी प्रथम सुरू झाले होते पण मध्यंतरी रेंगाळले होते. हे सर्व संशोधन व तत्संबंधीचे निष्कर्ष ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासाठी तो फ्रान्सला परत आला (१८८६). त्याने पुन्हा काही वर्षे (१८८६–८९) अध्यापन केले आणि ईजिप्शियन भाषेतील मजकुराचे भाषांतर केले. तीन वर्षानंतर तो लॉर्ड क्रोमरच्या निमंत्रणावरून पुन्हा ईजिप्तमध्ये आला. संचालकपदाबरोबर त्याच्या कडे नव्याने स्थापन झालेल्या वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षकपद देण्यात आले. त्याने या वस्तुसंग्रहालयासाठी एक मार्गदर्शिका लिहिली आणि तेथील अवशेषांची सूची तयार केली. त्याने विपुल लेखन केले. त्यासर्व ग्रंथांचे इंग्रजीत अनुवादही झाले. त्यांपैकी हिस्टरी ऑफ द एन्शन्ट पीपल्स : द क्लासिक ईस्ट (तीन खंड – १८९४–१९००), ईजिप्शियन आर्किआलॉजी (१८८७), पॉप्युलर टेल्स ऑफ एन्शन्सट ईजिप्त (१९१४), द रॉयल ममीज ऑफ डेर-एल्-बाहरी (१८८९), वगैरे ग्रंथ प्रसिद्ध असून ते ईजिप्तविद्येवरील अधिकृत ग्रंथ मानण्यात येतात.

अखेरच्या दिवसांत मास्परो नाईल नदीतील फायली बेटावरील प्राचीन वास्तू, कोरीव लेख आणि न्यूबिअन मंदिरे यांचा संपूर्ण वृत्तांत तयार करण्यात मग्न होता. कारण आस्वान धरणाखाली येथील अवशेष नष्ट होण्याची भीती उत्पन्न झाली होती. अवैध उत्खननाला प्रतिबंध करावा, यासाठी ही तो प्रयत्नशील होता. 

तो १९१२ मध्ये संचालकपदावरून निवृत्त झाला. पॅरिस येथे हृदयविकाराने त्याचे निधन झाले. 

संदर्भ : Dawson, W. R. Who Was Who in Egyptology, London, 1951.

देशपांडे, सु. र.